Maharashtra Budget Session 2023 : खतासाठी जातीवरून विधानसभेत खडाजंगी

रासायनिक खते खरेदी करताना जात नमूद करावी लागत असल्याचा मुद्दा विधानसभेत कामकाजाच्या मुद्द्याद्वारे उपस्थित झाला.
Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023Agrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Maharashtra Budget Session 2023 मुंबई : रासायनिक खते (Chemical Fertilizer) खरेदी करताना जात नमूद करावी लागत असल्याचा मुद्दा विधानसभेत कामकाजाच्या मुद्द्याद्वारे उपस्थित झाला. या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हा किरकोळ मुद्दा असून, राईचा पर्वत करू नये, असे म्हणताच काँग्रेसच्या नाना पटोले आणि मुनगंटीवार यांच्यात तूं-तूं मैं मैं झाली.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हस्तक्षेप करत खतासाठी जात नमूद करावी लागणारा कॉलम काढण्याची विनंती केंद्र सरकारला करू, असे आश्‍वासन दिले.

प्रश्‍नोतराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रासायनिक खते खरेदी करताना जात विचारून ती ई-पॉस मशिनमध्ये नमूद केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. मुळात आमची शेतकरी हीच जात आहे.

पोटाला जात नसते. मग खत खरेदी करताना जात का सांगावी लागते, असा प्रश्‍न उपस्थित करत सरकारने याबाबतचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. रासायनिक खते खरेदी करताना जात नमूद करावी लागत असल्याने शेतकरी खूप संतापला आहे. हे नेमके कुणाच्या आदेशाने झाले याचे स्पष्टीकरण द्यावे.

ई-पॉस मशिनवर सॉप्टवेअर अपडेट झाल्यानंतर त्यावर जात हा कॉलम वाढला आहे. त्यात आधार, पॅन नंबरसह जात नोंदवावी लागते. यामध्ये कुणाला बळीचा बकरा करू नये. सरकारने या प्रकरणाचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनीही हा मुद्दा उपस्थित करत सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आल्याने जात नमूद करावी लागते. हा बदल केवळ सांगली जिल्ह्यापुरता नव्हे तर संपूर्ण राज्यात केलेला आहे.

केंद्र सरकारच्या आदेशाने राज्य सरकारने हा बदल केला आहे. हा आदेश कुठल्या स्तरावर देण्यात आला आहे. हा आदेश देण्याचे कारण काय? पुरागोमी महाराष्ट्रात जात संपवत असताना तुम्ही जात पुन्हा अधोरेखित करून ती वाढवत आहात का,’ असा सवाल केला.

Maharashtra Budget Session 2023
Ajit Pawar : धान खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा

या चर्चेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करत ‘ही चूक असेल तर त्याचे उदात्तीकरण करू नये. हे माझे खाते नाही. तरीही इतकेच सांगतो, की चूक झाली असेल तर ताबडतोब दुरुस्ती झाली पाहिजे.

केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी जात नाही तर खत नाही असा कुठलाही आदेश काढलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. ई-पॉस या मशिनवर पोत्यांची संख्या द्यावी लागते. त्यात जात का विचारली आहे, हे आम्ही केंद्र सरकारला विचारले आहे. ती दुरुस्त केली जाईल.’

Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023 : दुग्ध व्यवसायाकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष

नाना पटोले- मुनगंटीवार यांच्यात वाद

पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘राईचा पर्वत’ असा उल्लेख केल्याने नाना पटोले यांनी त्याला आक्षेप घेतला. ‘आम्ही राईचा पर्वत करत आहोत असे वक्तव्य विद्वान मंत्री मुनगंटीवार यांनी केले.

यांचा शेतीशी संबंध आहे की नाही माहीत नाही. खत देण्यासाठी जात विचारली जात जाते. तुम्ही शेतकऱ्याची जात विचारता आणि आम्हाला पुन्हा राईचा पर्वत केला असे म्हणता?’ यावर मुनगंटीवार यांनीही तावातावाने प्रत्युत्तर दिले.

या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत नाना पटोले यांनी स्पष्टीकरणावर हरकतीचा मुद्दा मांडायला हवा होता, असे सांगत ‘राईचा पर्वत’ हा शब्द असंसदीय नाही. त्यामुळे त्यावर चर्चा नको, असे सांगत पटोले यांना रोखले.

तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याने ही अवस्था : मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देताना विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, की खत घेताना जातीचा उल्लेख केला जातो ते डीबीटी पोर्टल केंद्र सरकारचे आहे. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारला आम्ही कळवू.

आपण शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळे ते बोलत आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे, असा टोला लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com