नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाने (Climate Change) केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील हवामान संस्थांसाठी हवामानाच्या तीव्र घटनांचा अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे, असे मत भारतीय हवामान खात्याचे (Indian Meteorological Department) (आयएमडी) संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी रविवारी (ता.७) व्यक्त केले. जगभरातील हवामान संस्था (Weather Organization) निरीक्षण वाढविण्यावर तसेच हवामान अंदाजाच्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष्य केंद्रित करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. देशात मॉन्सूनचा कोणताही विशिष्ट ट्रेंड दिसत नसला तरी हवामान बदलामुळे हलक्या पावसाच्या घटना कमी होऊन मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) घटनांत वाढ झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Heavy Rain Happens Due To Climate Change)
ते म्हणाले, की हवामान बदलामुळे वातावरणातील अस्थिरता वाढल्याने मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसारख्या घटनांत वाढ झाली आहे. अरबी समुद्रातील चक्रिवादळांची तीव्रताही वाढत असून प्रतिकूलता वाढत असल्याने हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आव्हान निर्माण होत आहे. हवामान बदलामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्याच्या हवामान संस्थांच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. रडार, उपग्रह, स्वयंचलित हवामान केंद्रे व पर्जन्यमापकांमध्ये वाढ करून मदतीने हवामान खाते निरीक्षण वाढवीत आहे. संगणकीय प्रणाली, निरीक्षण, मॉडेलिंगमध्ये सुधारणा झाल्याने गेल्या पाच वर्षांत अतिवृष्टी, उष्णतेच्या व थंडीच्या लाटा तसेच धुक्याचा अंदाज ३० ते ४० टक्क्यांनी अधिक अचूकपणे वर्तविता येत आहेत.
मॉन्सूनचा १९०१ पासूनचा डेटा उपलब्ध आहे. उत्तर, पूर्व व ईशान्य भारतातील पावसात घट झाली असून पश्चिम राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात मात्र पाऊस वाढला आहे. तरीही संपूर्ण देशाचा विचार करता मॉन्सूनचा महत्त्वपूर्ण असा ट्रेंड दिसत नाही. मॉन्सून स्वैर असून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, मेघालय व नागालॅंड आदी राज्यांत १९८९ ते २०१८ या ३० वर्षांच्या काळात नैऋत्य मॉन्सूनच्या पावसात लक्षणीय घट झाल्याची माहिती केंद्र सरकारने नुकतीच संसदेत दिली होती. त्यावर विचारल्यानंतर मोहपात्रा म्हणाले, की पावसाच्या १९७० पासूनच्या नोंदीनुसार हलक्या पावसाच्या घटना कमी झाल्या असून अतिमुसळधार पावसाच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसते.
पंचायत स्तरापर्यंतचा अंदाज देणार
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढते. भारतासह उष्ण कटिबंधातील देशात हा कल आढळतो. मात्र, हवामान बदलामुळे मुसळधार पावसाच्या घटनांत वाढ झाल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. असेही त्यांनी सांगितले. हवामान बदल ही एक वस्तुस्थिती असून आपण त्यानुसार आपल्या सर्व कृतींचे नियोजन करायला हवे. सध्या जिल्हा व तालुका स्तरापर्यंत हवामान अंदाज दिला जात असून आगामी काळात पंचायतस्तर व शहरांतील विशिष्ट ठिकाणांचाही अंदाज दिला जाईल, असेही मोहपात्रा म्हणाले.
नदीचा प्रवाह बदलल्याने धोका
उत्तराखंडमधील पिठोरगड जिल्ह्यात गोरी नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे बदलला असून त्यामुळे नदीजवळच्या तब्बल बारा गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला मदतीची विनंती केली आहे. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहत असून तिच्या बदललेल्या प्रवाहापासून घरे अवघ्या ३०० मीटरवर आहेत. २०१७ मध्ये तर पुरामुळे नदीचा प्रवाह घरांपासून अवघ्या १०० मीटरवर आला होता. या पुरामुळे दहा एकर जमीन वाहून गेली होती. त्यामुळे, नदीकिनारी संरक्षक भिंत उभारण्याचा गावकऱ्यांची मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.