Devendra Shirurkar
हवामानबदलाच्या वावटळीत येत्या काळात शेती कशी तग धरेल? अचानक येणाऱ्या उष्णतेच्या लाटेला सामोरे कसे जायचे ? हे प्रश्न सध्या भारतीय शेतीसमोर आव्हान म्हणून उभे आहेत. अलीकडच्या काळात मार्च ते एप्रिल महिन्यात सतत येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे याकडे अधिक गांभीर्याने पहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञांनी काही सूचना शेतकऱ्यांना केल्या आहेत.
पिकाच्या दाणे भरण्याच्या आणि परिपक्व होण्याच्या अवस्थेत जर उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला तर पिकाचे दाणे लहान होतात. यामुळे सरासरी उत्पादनात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट येते. यावर्षी पंजाब,मध्य प्रदेश आणि अन्य गहू उत्पादक राज्यांतील गव्हाबाबत हीच समस्या पहायला मिळाली. सरकारने निकष शिथिल करून हा गहू विकत घेतला.
हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी एक सविस्तर अहवाल सादर केला. 'हिट वेव्ह २०२२ कॉजेस, इम्पॅक्ट अँड वे फॉरवर्ड फॉर इंडियन ॲग्रीकल्चर' असे या अहवालाचे नाव आहे.
यापूर्वीच्या उष्णतेच्या लाटेसारखीच २०२२ मधील उष्णतेची लाटही व्यापक होती. देशातील अनेक राज्यातल्या उत्पादनाला या लाटेचा फटका बसला. हवामान बदलामुळे यापुढील काळात अशा उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर तापमानवाढीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी या उपाययोजना अधिक लोकप्रिय व्हायला हव्यात, त्यांचा वापर अधिक मोठ्या प्रमाणावर करायला हवा, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.
ठराविक तापमानात पिकाचे कुठले वाण तग धरू शकते, याचा विचार करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली. याशिवाय वाढत्या तापमानात फळबागा जगवण्यासाठी जैविक अच्छादनाचा वापर करणे, गायी, म्हशींच्या शरिराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर थंड पाणी मारणे अशा प्राथमिक उपाययोजना करुन होणारे नुकसान टाळता येते असेही त्यांनी सुचवले आहे.
वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावरांची कातडी तापते. दूध उत्पादनात १५ टक्क्यांची घट होते. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते, मरतुकीचे प्रमाण वाढते, असे या अहवालात नमूद करण्यात आले.
धान्याबरोबरच उष्ण लाटेचा फलोत्पादनालाही मोठा फटका बसतो. डाळिंब, आंबा, लिंबू, आदी फळांबाबत मोहोर जळणे, जमिनीतील ओल घटने, फळकूज असे प्रकार दिसून येतात. तसाच प्रकार टोमॅटो, काकडी या भाज्यांबाबतही पहायला मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.