Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३९ फूट ६ इंचावर पोहोचली आहे. तर धोका पातळीसाठी फक्त चार फुटांची गरज असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याचबरोबर हवामान खात्याकडून २६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुढचे काही दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर वैभववाडी गगनबावडा कोल्हापूर आणि गडहिंग्लज आजरा सावंतवाडी या दोन्ही महामार्गवर पाणी आल्याने दोन्ही राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील ५५ मार्गांवर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांचा एकमेकांशी असणारा थेट संपर्क तुटलेला आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्याला महापुराच्या धोक्याने पूरप्रवण भागातील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांनीही साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशान सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
आज (दि. २४) धरण जवळपास ९० टक्के भरले असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सात फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. दरम्यान काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ होत आहे. घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाने भात लावणीच्या कामांना मोठा वेग आला आहे.
पालकमंत्री घेणार परिस्थितीचा आढावा
कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी व सद्यस्थिती बाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत आज (ता.२४) सायंकाळी ६.३० वा. वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.