Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : द्राक्ष पंढरी गारपिटीने उद्ध्वस्त

Hailstorm : कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालाच्या माहितीनुसार १२९५ हेक्टर क्षेत्रावर पूर्णतः बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik Weather Update : जिल्ह्यात निफाड व दिंडोरी तालुक्यांत सर्वाधिक द्राक्ष लागवडी (Grape Cultivation) असून, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक म्हणून या भागातील देशभरात ओळख आहे. मात्र निसर्गाची अवकृपा होऊन सुरुवातीपासून निफाड तालुक्याला फटका बसला.

तर आता रविवारी (ता. १५) दिंडोरी तालुक्यातील ९ महसूल मंडलांमध्ये ३७ गावे गारपिटीच्या तडाख्यात सापडली आहे. कृषी विभागाच्या (Agriculture Department) नुकसानीच्या प्राथमिक अहवालाच्या माहितीनुसार १२९५ हेक्टर क्षेत्रावर पूर्णतः बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

त्यामध्ये एकरी सरासरी ५ लाखांचे नुकसान असून, १६१ कोटींवर द्राक्ष माल मातीमोल झाल्याने द्राक्ष पंढरी उद्ध्वस्त झाल्याची भीषण परिस्थिती शेतकऱ्यांनी सांगितली.

रविवारी (ता. १५) दुपारी अचानक वातावरण तयार झाले आणि चार वाजल्यानंतर तुफान गारपीट सुरू झाली. पुढील दीड तासात सर्वत्र गारांचा सडा पडून खच साचला होता.

गारपिटीच्या तडाख्यात सोन्यासारखा द्राक्ष माल घायाळ झाला. सर्वत्र बागांमध्ये तुटून पडलेल्या पानांचा आणि द्राक्ष मण्यांचा सडा पडला होता. हे नुकसान पाहून अनेकांचा रक्तदाब वाढला, तर अनेकांना धडकी भरली होती.

त्यामुळे बागांत जाऊन नुकसान पाहण्याची हिंमत कोणलाच उरली नव्हती. संकटांवर मात करून उभे केलेले द्राक्षवैभव मातीमोल झाल्याने कुणाचे १००, तर कुणाचे ६०० क्विंटल द्राक्ष खराब झाले आहेत.

तर दुसऱ्या दिवशी पुन्हा वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाल्याने येथे आता भयाण शांतता पसरली आहे. ही परिस्थिती कातरत्या आवाजात सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येते.

पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ करून पिकवलेले पीक डोळ्यांदेखत नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने अबालवृद्ध शोकसागरात आहेत.

दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये गारपिटीचा मोठा पट्टा तयार झाला होता. मात्र त्यापैकी कुर्नोली परिसर गारपिटीचा हॉट स्पॉट ठरला आहे. आता बागेतील द्राक्षमणी व घडांना गारांचा मार लागल्याने मणी ठेचून माल मातीमोल झाला आहे.

मण्यांमधून रस बाहेर पडत असून, घुमतारे फिरू लागले आहेत. द्राक्षघड खराब होऊन त्याच्या मध्यभागी बुरशी येऊ लागली आहे. अनेक बागांत वेलींवर माल दिसतोय, मात्र तापमान अधिक असल्याने येत्या दोन दिवसांत माल सडून जाईल, अशी भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

चालू हंगामात निर्यातक्षम द्राक्ष माल तयार होईपर्यंत निसर्गाने साथ दिली. मात्र अंतिम काढणीच्या काळात या निसर्गाने शेतकऱ्यांना आता उद्ध्वस्त केले आहे. काढणी झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात द्राक्षांची उपलब्धता कमी असल्याने दर चांगले राहिले. मात्र नंतर परत आवक वाढल्याने दरात घसरण झाली होती.

त्यातच अंतिम टप्प्यात आता दर वाढू लागले असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठा दणका दिल्याने सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. कुठलाही व्यापारी, निर्यातदार, प्रक्रिया उद्योजक ही द्राक्षे घेण्यासाठी फिरकत नसल्याची वेदनादायी कहाणी या भागातील शेतकऱ्यांना सांगितली.

३७ वर्षांनंतर गारपिटीच्या तडाख्यात बागा नेस्तनाबूत

येथील ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक शेतकरी विलास पाटील यांनी सांगितले, की १९८६ मध्ये अशी गारपीट झाली होती. त्यानंतर अशी भयाण परिस्थिती कधीच आठवत नाही. मात्र आता तब्बल ३७ वर्षांनंतर मोठे अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे.

नुकसानग्रस्त गावे

जानोरी, जऊळके दिंडोरी, मोहाडी, कोऱ्हाटे, पालखेड बं., जोपूळ, धामणवाडी, लोखंडेवाडी, जऊळके वणी, चिंचखेड, खडकसुकेणे, कुर्णोली, पिंपळनारे, रामशेज, अक्राळे, निळवंडी, परमोरी, ओझरखेड, दिंडोरी, पिंपळगाव के, राजापूर, मातेरेवाडी, म्हेळुस्के, कादवा म्हाळुंगी, वरखेडा, आंबेवणी, घोडेवाडी, सोनजांब, लखमापूर, फोफशी, दहेगाव, वागळूद, गोंडेगाव, बोपेगाव, खेडगाव, तिसगाव, मावडी.

आदल्या दिवशी ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे व्यवहार झाला होता. निर्यातदार दुसऱ्या दिवशी काढणीसाठी येणार होते. मात्र गारपिटीने मालाची प्रतवारी गेली. आता फक्त नावाला वेलीवर द्राक्षे दिसत आहेत. मात्र कुणीही हा माल घेणार नाही. साधा बेदाणा करण्यासाठीसुद्धा नेत नाहीत. आमच्याकडे लेट बागा घेऊन शेतकरी नियोजन करतात. मात्र आता काहीच हाताशी राहिलेले नाही.

- विलास पाटील, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी, मोहाडी, ता. दिंडोरी

दोन दिवसांपूर्वीच निर्यातक्षम मालाचा रेसिड्यू फ्री रिपोर्ट प्राप्त झाला होता. उच्च प्रतवारी व गुणवत्तापूर्ण मालाची काढणी सुरू होणार होती. तोच गारपीट झाल्याने काही क्षणांत ६०० क्विंटल लाखो रुपयांचा माल शून्य रुपयांचा झाला. खराब माल बागेबाहेर काढायला सुद्धा महाग झाला आहे. आता घरातून पुन्हा पैसे घालावे लागतील. परिस्थिती एकदम भयानक आहे.

- खंडेराव झोमन, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी, कुर्नोली, ता. दिंडोरी

काही ठिकाणी द्राक्ष माल पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे तो कोणी नेत नाहीत. मात्र काही ठिकाणी हे नुकसान लगेच दिसून येणार नाही; तर पुढील काही दिवसांत सड होऊन एकही घड काढणीयोग्य नसेल. त्यामुळे शासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे; तरच द्राक्ष उद्योग जगेल, अन्यथा या बागांवर कुऱ्हाड लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल.

- सुरेश कळमकर, संचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT