जळगाव: जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी आजपासुन (ता. २८) पासून सुरू होणार आहे. हौशे-गवशे व नवश्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरवात होणार असून, प्रत्येक तहसील कार्यालयात गजबज वाढणार आहे. ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यात जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही निवडणूक लढविण्यास गावातीलच इच्छुक असतात. तरुणांमध्ये निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत, तर स्वतंत्रपणे लढविल्या जातात. नंतर राजकीय पक्षात प्रवेश केला जातो.
या ग्रामपंचायतींच्या होतील निवडणुका
भादली खुर्द, भोलाणे, देऊळवाडे, घार्डी-अमोदा खुर्द, जळके, किनोद, कुवारखेडे, सावखेडा खुर्द, सुजदे, वराड खुर्द व बुद्रुक, वसंतवाडी, विदगाव, अशा १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. बाराही ग्रामपंचायतीत एकूण ११ हजार ९२९ मतदार आहेत.
तहसील कार्यालयात स्वीकारले जातील अर्ज
जळगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारपासून जळगाव तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू होईल. २ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ग्रामपंचायतीनिहाय अर्ज स्वीकारले जातील. ५ डिसेंबरला छाननी होईल.
...असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र दाखल करणे : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
नामनिर्देशन पत्रांची छाननी : ५ डिसेंबर
माघारीची अंतिम मुदत : ७ डिसेंबर
चिन्हवाटप : ७ डिसेंबर
मतदान : १८ डिसेंबर
मतमोजणी : २० डिसेंबर
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
अमळनेर- २४, भडगाव- ६, भुसावळ- ६, बोदवड- ५, चाळीसगाव- १६, चोपडा- ५, धरणगाव- ७, एरंडोल- ६, जळगाव- १२, जामनेर- १२, मुक्ताईनगर- २, पारोळा- ९, रावेर- २२, यावल- ८, अशा एकूण १४० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
जळगाव तालुक्यात १८ डिसेंबरला १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. त्यात १२ लोकनियुक्त सरपंचपदासाठी, तर ९२ जागा सदस्यपदासाठी, अशा एकूण १०४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या सोमवारी (ता. २८)पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.