Village
Village  Agrowon
ताज्या बातम्या

गावठी नाटकाची चित्तरकथा !

बालाजी सुतार

याल तर हसाल, न याल तर फसाल! समस्त ग्रामस्थ बंधूंना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आज रात्रौ ठीक आठ वाजता बाजाराच्या भव्य पटांगणावर सादर करीत आहोत, तीन अंकी कौटुंबिक, सामाजिक आणि सनसनाटी राजकीय नाटक - सरपंचाचा हात, गावाचा घात..अर्थात तूच माझी मंजुळा” - एक माईकबहाद्दर दिवसभर माईकचं दांडकं समोर ठेवून अशी ठणठणीत ‘ज्याहिरात’ करत बसायचा. शनिवार असे. आसपासच्या बारक्या बारक्या गावातले, वाड्या-वस्तीवरचे लोक बाजारासाठी आलेले असायचे.

बघता बघता नाटकाची खबर पंचक्रोशीत चौफेर पसरायची. गावात अनेक गणेश मंडळं ‘बसायची’. गाव आकाराने बारकं; पण पार्टीबाजीचा अतोनात शौक असलेलं. त्यामुळे गावातल्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात ‘सत्ताधारी’ आणि अशी विभागणी व्हायची. दोन्ही पार्ट्या अत्यंत आडमुठ्या असल्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात आपोआपच रंग भरायचा. काही मंडळं सत्तापक्षाची, काही विरोधकांची. गणेशोत्सव जवळ आल्यावर कार्यकारिणी निवडून लगेचच नाटकाचं पुस्तक हुडकण्याचं काम हाती घेतलं जायचं. हे पुस्तक आणण्यासाठी दोनेक जणांची एक ‘कमिटी’ जवळच्या शहरात जायची.

तिथे सार्वजनिक पैशातून शिनिमाबिनिमाची चैनचमन करून झाल्यावर पुस्तकांची दुकाने धुंडाळून यंग्राट शैलीतली एक दोन पुस्तकं घेऊन यायची. एक गरीब नायक, सरपंच किंवा पाटील किंवा असाच कुणी राजकारणी खलनायक, एक हिरोईन, एक-दोन खलनायकाचे चमचे, एखादा आडवी टोपी आणि धोतर-बंडी घातलेला घरगडी एवढी पात्रे या नाटकांत हमखास असायची. खटकेबाज संवाद, काठ्या-कु-हाडींच्या दणकेबाज हाणामा-या आणि नायक-नायिकेचं अतोनात रांगडं प्रेम.

सबंध नाटकभर अनंत कटकटी झाल्यानंतर आणि शेवटच्या हाणामारीत खलनायकाचा काटा काढल्यानंतर हे प्रेम यशस्वी व्हायचं आणि नाटक संपायचं. पुढे चार आठ दिवस नाटकातले वीर गावभर छाती काढून हिंडत. गावातले लोकही त्यांच्या काळातल्या जुन्या नाटकांच्या आठवणी काढून तुमचं नाटक चांगलंच झालं, पण आमच्या येळच्या नाटकाची सर न्हाई बरं का असं सांगून त्यांना कौतुकानं चहा पाजायचे. नाटक निवडलं की दुसरं काम डायरेक्टर हुडकून काढण्याचं.

हे गावात तीन-चार हुकमी डायरेक्टरं असायची. त्यातला कुठल्यातरी वावरा-बांधाच्या किंवा ऐन पेरणीच्या टायमाला सत्ताधारी लोकांनी ‘सोसायटी’ मंजूर न केल्याच्या खाजगी भानगडीमुळे या पार्टीतून तिकडे गेलेला कुणीही एखादा आपणहून हे काम अंगावर घ्यायचा. एखाद्या राष्ट्रीय पक्षाची तिकीटवाटपाची बैठक व्हावी तशा थाटात एके दिवशी तमाम नटवर्य आणि डायरेक्टर यांची पात्र वाटपाची बैठक व्हायची.

मंडळातल्या मुख्य लोकांचा कल बघून डायरेक्टरसाहेब त्यांना मुख्य मुख्य पात्रांच्या भूमिका देऊन टाकायचे. यात ठराविक दमदार पात्रावर नजर ठेऊन असलेले काही जण नाराज होऊन वशिलेबाजीचा आरोप करत निघून जायचे. निघून गेले म्हणून ते गप्प बसायचे नाहीत. त्यातले काहीजण लगोलग या पार्टीला सोडचिठ्ठी देऊन त्या पार्टीच्या मंडळांत सहभागी होऊन तिकडे काही पात्र मिळवायचा प्रयत्न करायचे.

तर काहीजण तिकडूनही इकडे फिरून यायचे. हा सगळा प्रकार साग्रसंगीत पार पडल्यानंतर एका दिवशी नारळ फोडून तालमींना जोशात सुरुवात व्हायची. त्या जोशात व्हायचं मुख्य कारण म्हणजे अर्धेअधिक कलावंत आणि अधिकृत डायरेक्टराशिवाय तालमीदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून येणारे गल्लीतले अनेक रिकामटेकडे स्वयंघोषित डायरेक्टर हे लोक अत्युच्च श्रेणीचे गांजेकस असत. तालमीच्या खोलीत गांजाचे एक बारके गाठोडेच कायमस्वरूपी ठेवलेले असे.

एखाद्या निर्व्यसनी डायरेक्टरांनी याला विरोध केलाच तर त्यांचीच उचलबांगडी करून नवा डायरेक्टर नेमायला मंडळी अजिबात हयगय करत नसत. त्यामुळे मूग गिळून डायरेक्टर गपगुमान तालमी घ्यायचे. पावसाळा असे. भुरभुरणारी पावसाळी संध्याकाळ रात्रीच्या कुशीत शिरू लागली की रानामाळातून येऊन, जेवणीखाणी उरकून एकेकजण तालमीच्या खोलीत यायचा. काही जातिवंत लोकांकडे स्वत:ची खास चिलीम छापीसकट असायची.

मग त्या छंदीफंदी लोकांचा एकेक राऊंड झाला की तालमीला सुरुवात व्हायची. या तालमी मध्यरात्रीपर्यंत आणि महिना-दीडमहिना चालायच्या. मग कधीतरी वैतागून गेलेला डायरेक्टर उद्या रंगीत तालीम होईल अशी घोषणा करायचा. गांजाच्या तारेतली तमाम नटमंडळी याला समर्थन द्यायची. रंगीत तालीम व्हायची आणि एक-दोन दिवसात बाजाराच्या दिवशी म्हणजे शनिवारीरात्री ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्यांचं स्टेज तयार करून बाजाराच्या भव्य पटांगणात ते सुपरहिट नाटक पार पडायचं.

अर्थात ते सुखासुखी पार पडायचं असं नाही. नाटक ऐन रंगात आलेलं असताना विरोधी पार्टीचे लोक मधूनच उठून नाग निघाला..नाग निघाला.. असा गलका करायचे. अर्धअधिक पब्लिक उठून सैरावैरा धावायला सुरु करायचं. झोपलेली पोरंबाळं उठून ठो ठो बोंबलायला सुरु करायची. मग स्वयंसेवक चौफेर पळापळी आणि दमबाजी करून पब्लिकला पुन्हा स्थानापन्नव्हायला भाग पाडायचे.

पुन्हा नाटक सुरु झालं की काही मंडळी फर्लांगभर अंतरावर असलेल्या लाईटच्या डीपीवर जाऊन तिथले फ्युज काढून सबंध गावाची लाईट घालवायची. मग नाटकवाले लोक जाऊन पुन्हा फ्युज बसवून पुन्हा नाटक सुरु. असल्या कैक गंमती. एका वर्षी एका नाटकात शेवटच्या अंकाच्या शेवटी हिरो-व्हिलन यांच्यात तुफान खडाजंगी झाली. भोयाच्या कढईत लाह्या फुटाव्यात तसे खटकेबाज सवांद घडून अतोनात वादावादी झाली.

मग भांडण कु-हाडींवर येऊन सरतेशेवटी नाटकासिनेमातल्या अखिल भारतीय कायद्यानुसार पोलिसांची एन्ट्री झाली आणि त्यांनी गचांड्या देत व्हिलन स्टेजवरून पडद्यामागे नेला. आता स्टेजवर फक्त शूरवीर नायक आणि अल्लड नायिकेच्या भूमिकेतला एक निबर बाप्या. ते एकमेकांना मिठीत घेऊन स्थिर झाले की पडदा पडणार आणि नाटक संपणार. या टप्प्यावर दाटून आलेल्या प्रेमावेगाने लाडके असं म्हणत नायक नायिकेच्या दिशेने सरकला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. ही मिठी तिरकस पोझमधली होती.

म्हणजे दोघांचीही तोंडे समोरच्या प्रेक्षकांना दिसावीत अशा पद्धतीने हे मिठीचं आसनडायरेक्टरांनी घालून दिलेले होते. तर तत्सम घट्ट मिठीयुक्त अवस्थेत हिरो आणि हिरोईन स्थिर उभे असताना एक चमत्कार घडला. एकाएकी हिरोईनच्या नाकपुडीपुढे एक मोठ्ठा फुगा उत्पन्न झाला. स्टेजच्या समोरच्या बाजूने हजार पावरच्या लाईटचे तीन मोठे फोकस लावलेले होते आणि त्या फोकसवर अनुक्रमे लाल, पिवळं आणि निळं बेगड लावलेलं होतं. डायरेक्टरांच्या दिग्दर्शनाबरहुकूम लाईटम्यान ; खटाखटा बटणे दाबून झपाझपा लाल, पिवळे, निळे प्रकाशझोत त्या जोडप्यावर सोडत होता.

नाकासमोर प्रकट झालेला फुगा त्या त्या प्रकाशावेळी त्या त्या रंगाचा दिसत होता. मिठीत हात अडकल्यामुळे हिरोईनला हाताने नाक पुसता येईना. स्टेजसमोरचं पब्लिक एकाएकी खदाखदा हसायला लागलं. खालून काहीजण नाक पूस बे, साडीवर पडतंय बघ आता.. असं ओरडायला लागले तेव्हा जवळ जवळ टेनिसबॉलएवढ्या आकाराचा तो इस्टमनकलर फुगा इतरांच्याही दृष्टोत्पत्तीस पडला. तिन्ही अंकांत मिळून दोन अडीच तास केलेलं उत्कटबित्कट प्रेम विसरून झटक्यात हिरोने त्या प्रेमिकेला लांब ढकलून दिलं.

त्या ढकलण्याच्या हिसक्याने हिरोईनच्या कमरेपर्यंत आलेला छानदार बायकी केसांचा टोप सटकन निसटून खाली जमिनीवर पडला. त्या अवकाशात तेवढ्यातल्या तेवढ्यात अवधान राखून हिरोईनने नाक वर ओढून तो सबंध पदार्थ पुन्हा नाकाच्या आत बंदोबस्ताने माघारा घेतला.

हिरो लांब सरकून आपल्या सद- यावर हा फुगा कुठे चिकटला आहे का ते हैराण होऊन पाहत होता आणि इतका वेळ झकास ‘इन’ केलेला सदरा प्यान्टीतून बाहेर काढून झटकत होता. ऐन परगावी गेल्यावर पैशाचं पाकीट हरपल्यावर व्हावा तसा चेहरा करून हिरोईन केसांचा टोप उचलून पुन्हा टकु-यावर बसवत होती आणि आरतिच्याबायलीहिरोनीच्यामी असं म्हणत स्टेजजवळचं पब्लिक खो खो हसत होतं.

शेवटी एका स्वयंसेवकाने धडाधडा स्टेजवर चढून पडद्याची दोरी ओढली आणि या नाटकाच्या चित्तरकथेवर पडदा टाकला. आता घराघरावरच्या डिशांतून टीव्हीचं आक्रमण पार स्वैपाकघरांपर्यंत झालं आणि आणि असल्या प्रतिवार्षिक धमालींना गाव मुकलं. गावं आता अनेक अर्थांनी मुकी झाली आहेत, त्यातलीच हीसुद्धा एक गोष्ट.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT