Barsim Crop : बरसीम चारा पिकाची लागवड

बरसीम हे रब्बी हंगामातील प्रमुख द्विदलवर्गीय चारा पीक आहे. दुग्ध व्यावसायिकांसाठी द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा सतत भेडसावणारा प्रश्‍न असतो.
Barsim Crop
Barsim CropAgrowon

बरसीम हे रब्बी हंगामातील (Rabbi Season)प्रमुख द्विदलवर्गीय चारा पीक (Dicotyledonous Fodder Crop)आहे. दुग्ध व्यावसायिकांसाठी द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा सतत भेडसावणारा प्रश्‍न असतो. त्यासाठी बरसीम घास हे रब्बी हंगामात ४ ते ५ कापण्या देणारे, कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथीवर्गीय चारा पीक आहे.

बरसीम हे मेथीप्रमाणे दिसणारे, मात्र लसूणघासाइतक्या उंचीचे पीक आहे. काही भागांत या पिकास ‘घोडा घास’ असेही म्हणतात. या पिकाचा चारा रुचकर, पालेदार लुसलुशीत, सकस व चविष्ट असतो. या चाऱ्यामध्ये जवळपास १६ ते १८ टक्के प्रथिने असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या प्रकृतीला मानवतो. दूध उत्पादनात वाढ होते. या पिकाच्या ४ ते ५ कापण्या होतात. भरपूर हिरवा चारा उपलब्ध होत असल्याने हे पीक अनेकार्थाने फायदेशीर ठरते.

Barsim Crop
Crop Insurance : पीकविमा तक्रारींसाठी संपर्क क्रमांक जाहीर

जमीन : मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार गाळाची उत्तम प्रतीची जमीन आवश्यक. आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम पिकाची वाढ होत नाही.

हवामान : या पिकास थंड व कोरडे हवामान आवश्यक आहे. उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल नाही. जितका थंडीचा कालावधी जास्त तेवढ्या कापण्या अधिक मिळतात.

पूर्वमशागत : एकदा खोल नांगरणी करून २ ते ३ वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. पेरणीसाठी सपाट ५ बाय ३ मीटर आकाराचे वाफे तयार करावे.

पेरणी : पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी लवकर केल्यास थंडी कमी असल्याने उगवण व्यवस्थित होत नाही. सुरुवातीची वाढ जोमदार होत नाही. उशिरा पेरणी केल्यास शेवटच्या कापण्या मार्च अथवा एप्रिल महिन्यात येतात. थंडीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बरसीमचे बी १० लिटर पाण्यात १०० ग्रॅम मीठ टाकून तयार केलेल्या द्रावणात टाकावे. त्यात पोचट व हलके बी तरंगून वर येते. असे तरंगणारे बी व केरकचरा काढून टाकावा.

रायझोबिअम जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी चोळावे.

सुधारित जाती : वरदान, मेस्कावी, जे. बी-१, एच. बी-१४६ इ.

खत व्यवस्थापन : पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र (४४ किलो युरिया), ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट), ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) मिश्रण करून पेरणीपूर्वी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : या पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी घ्यावे. सुरुवातीच्या दोन आठवड्यांमध्ये एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत : एक खुरपणी व एक कोळपणी करून शेत ताणविरहित ठेवावे.

कापणी : हिरव्या चाऱ्यासाठी बरसीमची पहिली जावळ कापणी साधारणतः पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे ऑक्टोबरमध्ये पेरणी केल्यास बरसीमद्वारे ४ ते ५ कापण्या घेणे शक्य होते. पेरणीस उशीर झाल्यास ३ ते ४ कापण्या मिळतात.

उत्पादन : योग्य व्यवस्थापन केल्यास बरसीम पिकाचे ४ ते ५ कापण्यांद्वारे हेक्टरी ६०० ते ८०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

देवानंद राऊत, ७०२०५३२८२०

(विषय तज्ज्ञ -पशुसंवर्धन, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com