Mumbai News : गेल्या १३ दिवसांपासून खातेवाटपासंदर्भात सुरू असलेल्या वाटाघाटींना पूर्णविराम देत अखेर शुक्रवारी (ता. १४) मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. शिवसेनेच्या शिंदे गटाचा विरोध झुगारून अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते देण्यात आले आहे. तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना हटवून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वजनदार खाती मिळविण्यात नंबर पटकावला असून, शिंदे गटाकडील कृषी आणि भाजपकडील सहकार या खात्यांसह अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, वैद्यकीय शिक्षण व विशेष साह्य, अन्न व औषध प्रशासन, महिला व बालविकास, क्रीडा व युवा कल्याण, बंदरे आणि मदत व पुनर्वसन ही खाती मिळविली आहेत.
माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडील बंदरे विकास हे खाते संजय बनसोडे यांच्याकडे, तर भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे वजनदार खाते देण्यात आले आहे. राज्यातील सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाला.
नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे गट अस्वस्थ झाला होता. शिवसेनेतून बाहेर पडताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आमची अडवणूक केली, त्यामुळे आम्ही सत्तेत राहू शकत नाही. असे कारण देत भाजपशी हातमिळवणी केली. मात्र अवघ्या एक वर्षानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची धुरा आली आहे.
अर्थमंत्रिपदावरून तिढा वाढल्याने पवार यांनी दोन दिवसांपूर्वी रातोरात दिल्ली दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अर्थमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदांचा तिढा सोडवून घेतला होता. अखेर अधिवेशनाच्या दोन दिवस आधी खातेवाटप करण्यात सरकारला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या खातेवाटपाला राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिली.
नव्या खातेवाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), मदत व पुनर्वसन, मृदा व जलसंधारण, अल्पसंख्याक व औकाफ ही खाती अन्य मंत्र्यांकडे देण्यात आली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील वित्त व नियोजन हे एकमेव खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आले. गिरीश महाजन यांच्याकडे असलेल्या तीन खात्यांपैकी वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण ही खाती काढून मंगलप्रभात लोढा यांच्याकडील पर्यटन हे खाते देण्यात आले आहे.
धनंजय मुंडे कृषिमंत्री
गेल्या वर्षभरात अनेक कारनाम्यांमुळे चर्चेत असलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना हटवत धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मुंडे हे महाविकास आघाडीत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सरकारविरोधात शेतीच्या प्रश्नांवरून रान उठविले होते.
मागील वर्षी आलेल्या सोयाबीनवरील गोगलगाय किडीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला मदत देण्यास भाग पाडले होते. सत्तार यांनी गेल्या वर्षभरात कृषी विभागाचा कार्यभार हाकला खरा, पण ते वादग्रस्त ठरले.
सिल्लोड महोत्सवातील तिकिटे खपवणे, खासगी पथकांकरवी बियाणे व खते विक्रेत्यांवर छापे टाकणे, टीईटी प्रकरण, वादग्रस्त वक्तव्ये अशा अनेक कारणांनी ते चर्चेत राहिले. सत्तार यांच्याकडील कृषी खाते काढले असले, तरी त्यांच्याकडे पणन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सावे यांच्याकडे गृहनिर्माण
राज्यात वजनदार असलेल्या सहकार खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे बडे देते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी असली, तरी त्यांना त्यात फारसे काही करता आले नव्हते. सहकार कायद्यातील किरकोळ दुरुस्त्या वगळता महत्त्वाची कामे करता आली नव्हती.
खातेवाटप असे ः
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार
उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन
छगन भुजबळ : अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव वळसे-पाटील : सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण व विशेष साह्य
चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित : आदिवासी विकास
गिरीश महाजन : ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड : मृद् व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे : कृषी
सुरेश दगडू खाडे : कामगार
संदीपान आसाराम भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रवींद्र सामंत : उद्योग
प्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा आत्राम : अन्न व औषध प्रशासन
अतुल सावे : गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क
अदिती तटकरे : महिला व बालविकास
संजय बनसोडे : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता
अनिल पाटील : मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
भाजपकडील गेलेली खाती
वित्त, अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, सहकार, महिला व बालकल्याण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण.
शिवसेनेकडील (शिंदे गट) गेलेली खाती
कृषी, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक व औकाफ, बंदरे व खनिकर्म, अन्न व औषध प्रशासन.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.