Nagpur News : पीक उत्पादकता वाढीला चालना मिळावी याकरिता स्पर्धा, गावनिहाय ब्रॅण्ड अशा अनेक संकल्पना राबवीत येत्या तीन वर्षांत दत्तक गावांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रस्तावीत आहे. त्याकरिता कृषी संलग्नीत विविध विभागांचे सहकार्य घेण्यात येत आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील कमी लोकसंख्या व कमी उत्पादकता असलेल्या गावांची याकरिता निवड करण्यात आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली. सालईमेंढा (जि. नागपूर) येथे दत्तक गाव योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आले असता त्यांनी ‘ॲग्रोवन’सोबत संवाद साधला.
डॉ. गडाख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील बहुतांश गावात पारंपरिक पिके घेतली जातात. त्याची उत्पादकता आणि पर्यायाने उत्पन्न कमी आहे. यामुळे अर्थकारणाला गती मिळत नसल्याने कृषी विद्यापीठाने दत्तक गाव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कमी लोकसंख्या आणि कमी उत्पादकता असा निकष गावे निवडण्यामागे लावण्यात आला.
त्याकरिता अशा गावांचा बेसलाइन सर्व्हे विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून करण्यात आला. त्याआधारे सिंचन व्यवस्था काय, गावातील एकूण कुटुंब, शेतमजूर, शासकीय व खासगी नोकरी करणारे, प्रक्रिया उद्योग, यांत्रिकीकरण, पशुपालन, शेतकरी गट याची माहिती संकलित करण्यात आली. उपलब्ध संधी, आव्हान हे देखील शोधण्यात आले.
कृषी विद्यापीठच नाही तर इतर संलग्नित विभागाचे सहकार्य या उपक्रमात घेतले जात आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी, रेशीम, दुग्ध व्यवसाय, खादी व ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, बॅंका, महाबीज, राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, केव्हीके, कृषी विभाग, निविष्ठा कंपन्या व इतर यंत्रणांचा समावेश आहे. या गावात आठवडाभरात उपक्रम राबविले जातील. त्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी दर मंगळवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे.
शेतीमाल उत्पादकतावाढीला प्रोत्साहन मिळावे याकरिता एक एकरात पीक स्पर्धा घेतली जाईल. यातील पहिल्या तिघांना बक्षीस देण्याचे प्रस्तावीत आहे. यांत्रिकीकरणाला चालना मिळावी याकरिता दत्तक गावात कंपन्यांच्या सीएसआर निधीतून अवजार बॅंक उभारण्याचाही विचार आहे.
शेतीकामाला लागणारी अवजारे या ठिकाणी भाडेतत्त्वावर उपलब्ध होतील. पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा याकरिता सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन दिले जाईल. फळबाग लागवड, प्रक्रिया उद्योग तसेच गावनिहाय ब्रॅण्डचा देखील यात विचार आहे. तीन वर्षे ११ गावांमध्ये ही योजना राबविल्यानंतर विदर्भातील २७ तालुक्यांतून एका गावाची त्यापुढील टप्प्यात निवड केली जाईल.
...अशी आहेत दत्तक गावे
मुरादपूर (बुलडाणा), मोहमदपूर (यवतमाळ), दिघी (वर्धा), चेलका (अकोला), शेलगाव घुगे (वाशीम), आसोना (अमरावती), किनगीपार (गोंदिया), पापडा खुर्द (भंडारा), नाचनभट्टी (चंद्रपूर), हिरापूर (गडचिरोली), सालईमेंढा (नागपूर)
गावात उत्पादित शेतमालाला खरेदीदार कसे उपलब्ध होतील, उत्पादकता दुप्पट झाल्यास उत्पन्न ३३ टक्के वाढेल, उत्पादन खर्च ५० टक्के कमी झाल्यास त्याद्वारेही ३३ टक्के उत्पन्न वाढणार आहे. ग्रेडिंग, प्रक्रिया यातूनही ३३ टक्के उत्पन्नात वाढ होईल. अशाप्रकारची व्यवस्था या दत्तक गावांमध्ये निर्माण केली जाणार आहे.- शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.