Monsoon Update
Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : शेतकऱ्यांनो, बनावट हवामान तज्ज्ञापासून सावधान !

टीम ॲग्रोवन

स्नेहल माने

मंडळी तुम्ही स्वदेस (Swades) बघितलाय का ? त्यात एक सीन आहे. अमेरिका रिटर्न शाहरुखला (Sharukh Khan) गावचा सरपंच विचारतो की तुझी नासा (Nasa) नेमकं काय काम करते ? त्यावर शाहरुख गावकऱ्यांना सांगतो की, नासा सॅटेलाईट (Satellite) बनवते, त्याचा उपयोग पाऊस हवामान याच्या माहितीसाठी करतात.(India Meteorological Department) त्यातलाच एक उपटसुंभ म्हणतो हे तर काम आमचा सहदेव पण करतो. सहदेव येतो, आभाळाकडं बघतो आणि म्हणतो, आसमान साफ है, दो दिन तक बादल नजर नही आएंगे. यावर शाहरुख हसून म्हणतो, में भी यही करता हूं .

मंडळी पिक्चर बघताना आपण कदाचित हसलो ही असू. पण अगदी हेच आपल्या आजूबाजूला सुद्धा घडतंय. सहदेव सारखे स्वयंघोषित हवामान तज्ञ आपल्या आजूबाजूला दिसतील. कोरोना नंतर तर यांचा यांचा सुळसुळाट सुरू झालाय. युट्युबवर व्हिव्ज मिळवण्याच्या हव्यासापोटी हे तज्ञ अमुक एका ठिकाणी पाऊस पडेल तमुक एका ठिकाणी पाऊस पडेल असं सांगतात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. त्यांच्या या माहितीवर विश्वास ठेवावा का? व्हाट्सएप युनिव्हर्सिटी मध्ये फिरणाऱ्या अशा मॅसेजवर विश्वास ठेवावा का?

कोरोना आल्यावर सगळं जग बंदिस्त झालं. सगळ्या लोकांकडे वेळच वेळ होता. जोडीला मोबाईल फोन होते. याच काळात बरेच लोक युट्युबवर आले. ज्याच्याकडे जे स्किल होत, त्याने त्याने ते स्किल दाखवायला सुरुवात केली. लोकही मनोरंजन म्हणून असे व्हिडिओ बघू लागले.

याच दरम्यान शेतीशी संबंधित व्हिडिओ तयार होऊ लागले. आणि यातून तयार होऊ लागले स्वयंघोषित तज्ञ. हे लोक हवामानाची माहिती देऊ लागले. या लोकांच्या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्हिव्ज मिळू लागले. कोणताही शास्त्रीय आधार न घेता हे तज्ञ हवामानाचे अंदाज जाहिर करू लागले. शेतकऱ्यांनाही आपल्याच भाषेत सांगणाऱ्या लोकांकडून माहिती घेताना सोयीचं वाटू लागलं. आता या स्वयंघोषित तज्ञांच्या बातम्या होऊ लागल्या. अशीच एक बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. बातमीचं टायटल होतं "जानेवारीपर्यंत पावसाचा मुक्काम वाढणार: भारतीय हवामान विभागाचा इशारा"

यावर हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने आक्षेप घेतला. संबंधित बातमी धादांत खोटी असल्याचं हवामान विभागाने सांगितलं. याविषयी भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस घोसाळीकरांनी ट्विट करत या तज्ञाचा दावा फेटाळून लावला. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, " मीडियाने शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी अशा तथाकथित स्वयं दावा केलेल्या तज्ञांकडून पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती प्लीज़ काटेकोरपणे टाळली पाहिजे. हे खोटे दावे आहेत, त्यांचा कोणताही वैज्ञानिक बेस नाही.

दुर्दैवाने हे वारंवार घडत आहे. ते माझ्या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. "

पण मंडळी प्रकरण एवढ्या पुरतंच मर्यादित नाहीये. तुम्हाला हल्ली हल्ली घडलेला किस्सा सांगते. सांगली पट्ट्यात राहणाऱ्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याशी बोलताना कळलं की, युट्यूबवर एका हवामान तज्ञाने दिलेल्या पावसाच्या बातमीमुळे त्याच्या अख्या फळ बागेचं नुकसान झालं. मोठा पाऊस होणार म्हणल्यावर या शेतकऱ्याने द्राक्ष बाग व्यापाऱ्याला कमी पैशात विकली. आणि नंतर तर पाऊस झालाच नाही. यावर मी त्या शेतकऱ्याला विचारलं की बाबा रे तुम्ही भारतीय हवामान विभागाचे अंदाज का नाही बघत. तर तो शेतकरी हताश होऊन म्हणतो, मॅडम एवढं इंग्रजी आम्हाला आलं असतं तर कशाला इथं राहिलो असतो.

वर तो वृत्तपत्रात छापून येणाऱ्या बातम्यांविषयी सांगतो की, अगदी भडक भडक मथळे दिलेल्या बातम्या काही वृत्तपत्रात छापून येतात. ते वाचूनही आमची गाळण उडते. आज अमुक एका भागात मुसळधार पाऊस असं म्हणत आलेल्या बातम्या वाचून चौथ्या पाचव्या दिवशी बघतो तर आभाळ कोरडचं असतं. आता या शेतकऱ्याच्या बोलण्यात तर तथ्य होतं. हवामान विभागाने आपल्या वेबसाईटवर दिलेली माहिती तांत्रिक असते. ती मराठीतही उपलब्ध आहे. मात्र आपल्याकडील बहुतांश शेतकऱ्यांना अक्षर ज्ञानही नाहीये. त्यांनी हवामानाची माहिती मिळवावी कशी याबाबत मी भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेच्या एका अधिकाऱ्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला. पण ते मिटिंग मध्ये असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालंच नाही.

आता यावर माहिती मिळवली पाहिजे म्हणून कृषी क्षेत्रात 13 वर्ष अनुभव असणाऱ्या एका पत्रकारांना फोन केला. पण नाव न सांगण्याच्या अटीवरच माहिती देतो असं ते म्हणाले. ते सांगतात, मॅडम मान्सूनच्या अंदाजाचे बरेच मॉडेल्स आहेत. आज हवामान विभागाकडे हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी हजारो कोटींची यंत्रसामग्री आहे. अगदी त्याचप्रमाणे हवामानाच्या अंदाजासाठी जी गणितीय आकडेमोड करावी लागते त्यासाठी 10 ते 20 वर्षांचा अनुभव असणारी तज्ञ मंडळी आहेत.

हवामान खात दररोज अंदाज जाहिर करतं. ही माहिती घेऊन एखादा प्रशिक्षित व्यक्ती हवामानाचे अंदाज जाहिर करू शकतो. पण त्यासाठी सुद्धा बऱ्याच वर्षांचा अनुभव गाठीशी हवा असतो. आता अगदी मोबाईल फोनवरही तुम्हाला हवामानाची माहिती उपलब्ध होते. पण ही माहितीही दर दिवशी बदलत असते. आणि अशा ऍपचा आधार घेऊन पुढच्या सहा सात दिवसाची माहिती सांगणं चुकीचं आहे.

मी एका युट्युब चॅनेलवर स्वयंघोषित हवामान तज्ञाची अंदाज सांगायची पद्धत बघितली, तर हा माणूस सरळ सरळ लोकांना फसवत होता. त्याने त्याच्या स्क्रीनवर विंडी नावाचं ऍप सुरू करून व्हिडिओ बनवला होता. बघणाऱ्याच्या लक्षात येऊ नये म्हणून ते ऍप झुम केलं होतं. या लोकांचे आर्थिक लागेबांधेही असतात. एखाद्या खत उत्पादक किंवा बियाणांच्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना हवे तसे अंदाज सांगायचे. पण असल्या भोंदू लोकांमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर गंडांतर येऊ शकतं. शेतकऱ्यांचा जीव हकनाक जाऊ शकतो.

शेतकऱ्यांनी पुढं येऊन या भोंदू हवामान तज्ञांची पोलखोल केली पाहिजे. त्यांचा अंदाज बांधण्याचा सोर्स, त्यासाठी कोणती यंत्र वापरली, त्यांचं शिक्षण विचारलं पाहिजे.

हवामान विभागाने चुकीची माहिती दिली म्हणून आमचं नुकसान झालं अस म्हणत त्यांच्यावर बऱ्याच केसेस झाल्या. अगदी त्याच पद्धतीने या भोंदू लोकांचे अंदाज खोटे ठरले की त्यांच्यावरही केसेस व्हायला हव्यात. तसेच त्यांच्यामुळे छद्म विज्ञानाचा प्रसार होतोय म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई करावी. राज्य सरकारने यात लवकरात लवकर लक्ष घालण्याची गरज असल्याचं ही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

मंडळी हे झालंच.. पण याला चाप बसावा आणि शेतकऱ्यांना सोप्या भाषेत माहिती मिळावी म्हणून हवामान विभाग काही करू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही मयुरेश प्रभुणे यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते सांगतात, ओडिशा राज्यातील हवामान विभागाने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. हा विभागामार्फत तेथील स्थानिक आणि शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत हवामानाची माहिती शूट करून राज्य सरकारला दिली जाते. मग सरकार हा व्हिडिओ त्यांच्या वेबसाईटवर अपडेट करते. तसेच वेगळे ग्रुप्स बनविले आहेत त्याच्या माध्यमातून रोजच्या रोज काही पोस्ट सर्क्युलेट केल्या जातात.

असाच उपक्रम महाराष्ट्रात राबविण्याची आवश्यकता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हवामानाची माहिती अगदी सोप्या पद्धतीत माहिती मिळेल. जर हा उपक्रम राबविला तर शेतकरी इतरत्र जाण्याची शक्यताही कमीच आहे.

पण मंडळी असा उपक्रम शक्य आहे का ? तर नाही. याचं पहिलं कारण म्हणजे हवामान विभागात मराठी म्हणजे स्थानिक भाषा बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे मराठीत असे व्हिडिओ बनविण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज आहे. त्यात आणि हवामान विभागाच्या सोशल वेबसाईट जसं की, ट्विटर फेसबुक हल्ली हल्ली अपडेट व्हायला लागल्या आहेत. अद्यापही त्यावर मरणकळा आहेच. अशात या स्वयंघोषित हवामान तज्ञांच्या छद्म विज्ञानाला आळा कसा बसणार हा मोठा प्रश्नच आहे.

मध्यंतरी पुण्यात मोठा पाऊस होणार असं वक्तव्य हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी केलं होतं. पण तुरळक पाऊस पडला आणि नंतर मी असं म्हणलोच नाही असं म्हणत मोठा वाद रंगला.. हे सगळं त्यांच्या मराठी आणि हिंदीच्या घोळामुळे झालं.

आयएमडी ही केंद्र सरकारची संस्था आहे. मात्र राज्यात रिजनल मेटेरॉलॉजी डिपार्टमेंट सुद्धा आहेत. त्याठिकाणी स्थानिक भाषा येणाऱ्या तज्ञांची नियुक्ती करता येऊ शकते. पण मंडळी तुम्ही घाबरू नका. तुम्ही जिथे कुठे हवामानाचे अंदाज बघता ते अंदाज नेमके कोणत्या शास्त्रीय आधारावर बांधण्यात आलेत ते पाहा, तसे प्रश्न त्या व्यक्तीला विचारा, आणि मगच कृती करा. तुम्हाला हवामानाचे अपडेट्स सोप्या भाषेत हवे असतील तर ऍग्रोवनच्या युट्युब चॅनेलवर ही तुम्ही ते बघू शकता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT