Save Soil : क्रिस्टीन जोन्स यांचे ‘जमीन वाचवा’ अभियान

चंद्रशेखर भडसावळे यांनी मला ट्रेसी फ्रिच यांनी एका मासिकासाठी क्रिस्टीन जोन्स यांच्या मुलाखतींवर आधारित लेख अभ्यासासाठी दिला. यातील महत्त्वाचे मुद्दे सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आजचा लेख लिहिला आहे. शेतकऱ्यांनी आपापसांत चर्चा करून आपला कृषिविकास करून घेणे आवश्यक आहे.
Save Soil
Save SoilAgrowon

क्रिस्टीन जोन्स (Christine Jones) या ऑस्ट्रेलिया देशातील नागरिक आहेत. शालेय काळात त्यांना अर्थशास्त्रातील उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. परंतु पदवीनंतर त्यांना वस्त्रोद्योगात (Textile Industry) अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पुढे याच उद्योगात नोकरी करीत असता त्यांनी लोकरीवर संशोधन केले. लोकर पूर्ण लांबीत एक सारख्या जाडीची हवी, धाग्याची योग्य ताकत हवी, तरच ती विणणे शक्य होते. हे काम करीत असताना त्यांना असे दिसून आले, की लोकर चांगल्या प्रतीची पाहिजे असेल तर मेंढ्यांना उत्तम प्रतीच्या गवताळ कुरणात चरायला मिळाले पाहिजे.

या अभ्यासातून त्यांनी पुढे जमीन सुपीकता (Soil Fertility), पीक उत्पादन (Crop Production) आणि ते सेवन करणाऱ्या प्राणीवर्गाचे आरोग्य या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली. पुढील काळात त्यांनी वनस्पती आणि जमिनीतील सूक्ष्मजीव यांच्या संबंधांचा अभ्यास केला. पुढील संपूर्ण आयुष्यात जैववैविध्य, कर्बाचे स्थिरीकरण, अन्नद्रव्यांची चक्रीय वाटचाल, पाणी व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासात व्यतीत केले. या शास्त्राच्या विस्तारात जगभर फिरून शेतकऱ्यांचे प्रबोधन त्यांनी केले. शून्य मशागत शेती पद्धतीचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांना परिस्थितीकी तज्ज्ञ (इकॉलॉजिस्ट) म्हटले जाते.

क्रिस्टीन जोन्स यांच्या अभ्यासातील नोंदी ः

१) कर्ब चक्रात कर्ब घन, वायू आणि द्रवरूप अशा तीनही प्रकारांत असतो. यापैकी आपल्याला घन व वायुरूप माहिती आहे. द्रवरूप फारसे कोठे चर्चेत नाही. प्रकाश संश्‍लेषणात तयार झालेल्या साखरेपैकी काही साखरेचा भाग द्रवरुपात जमिनीतील स्थिर अन्नपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूसाठी सोडतात. हा जमिनीत स्थिर होऊ शकत नाही. गरज असणाऱ्या जिवाणूंना कार्यरत करण्यासाठी या कामापुरताच मुळातून स्राव सोडला जातो. असा माझा अभ्यास सांगतो.

Save Soil
Soil Health : मातीचे आरोग्य का जपले पाहिजे?

२) सर्व ऊर्जा संक्रमणाचा मूळ स्रोत सूर्य आहे. सूर्यप्रकाशातील ऊर्जा वनस्पती ग्रहण करतात. पुढे हीच ऊर्जा वनस्पती वाढीसाठी, त्यानंतर वनस्पतीकडून प्राणीवर्गासाठी मिळत राहते (सूक्ष्मजीवासह). जमिनीचे परीक्षण करून आपण फक्त उपलब्ध अन्नद्रव्य मोजतो. उपलब्ध अवस्थेत नसणारी अन्नद्रव्ये मोजली जात नाहीत. वेगवेगळ्या सूक्ष्मजीवाकडून उपलब्ध साठ्यात अन्नद्रव्ये आणली जातात. हा स्थिर साठा खूप मोठा असतो. तर उपलब्ध साठा त्यावेळच्या पिकाच्या गरजेइतकाच असतो. त्यामुळे माती परीक्षणातून खत मात्रा हे तंत्र चुकीचे ठरते असे मी बऱ्याच वेळा लिहितो, त्याला दुजोरा मिळतो.

३) भरपूर खते, भरपूर मशागत, पाणी वापरून सातत्याने पिके घेत राहिल्यास १० ते १५ वर्षांनंतर जमिनीत सेंद्रिय कर्बाचा साठा संपल्याने पिकाला दिलेली अन्नद्रव्ये सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थितीने पिकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जमिनीचे आरोग्य धोक्यात आल्याने अशा परिस्थितीत उत्पादन घटत जाते. आज सर्वत्र जमिनीची अशीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत जमिनीत सेंद्रिय कर्ब उपलब्ध करून देण्याचे सोपे मार्ग न सांगता आपण पारंपरिक शेणखतालाच कवटाळून बसलो आहोत. या मताला त्यांच्या मुलाखतीत दुजोरा मिळतो.

४) आपली संबंधित शेती ही जमिनीत भरपूर सेंद्रिय कर्ब सहज आणि फुकटात मिळवून देण्याचे काम करते. त्यांचे म्हणणे आहे, की जमिनीची कणरचना हा सुपीकतेचा संबंधित प्रमुख गुणधर्म आहे. निचरा शक्ती आणि जलधारण शक्ती ही कणरचनेशी संबंधित आहे. सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या डिंकासारख्या पदार्थातून ती तयार होत असते. सुधारित शेती पद्धतीत कणरचना मोडण्याचा वेग जोडण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. आपली संवर्धित शेतीही कणरचना सुधारणेचे काम करते.

Save Soil
Soil Health : ओळखा जमिन क्षारपड होण्याची कारणे ?

५) जमीन उघडी राहण्यापेक्षा उघड्या ती एकदल, द्विदल अशा विविध प्रकारच्या वनस्पतींनी अच्छादित असणे जास्त चांगले. यामुळे या खताची कार्यक्षमता सुधारते. रोग, किडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळते. आपले संवर्धित शेतीत तण व्यवस्थापन यासाठीच आहे. पारंपरिक ताग, धैंचा लागवड न करता आपोआप येणारे तण येथे उत्तम काम करते. यातून रोग, किडी कमी होतात, हा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी कळविला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की आपण जितके जास्त तण नियंत्रण करू तितके तण नियंत्रणाचे काम वाढत जाईल. त्यांचे म्हणणे आहे, की आच्छादन वनस्पतीचे मोनोकल्चर नको. यात जैव वैविध्य असेल तितके चांगले. या तत्त्वांचे पालन आपण संवर्धित शेतीत करीत आहोत.

६) आच्छादनाचे प्रचंड फायदे आहेत. उघड्या जमिनीतून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाण्याचे प्रमाण आच्छादित जमिनीच्या तुलनेत खूप जास्त असते. पाण्याची कार्यक्षमता आच्छादनामुळे २० टक्क्यांपर्यंत वाढविता येते. हा त्यांचा संदर्भ तण व्यवस्थापनामध्ये आपण अभ्यासला आहे. आपल्याकडे अवर्षणप्रवण क्षेत्र भरपूर आहे. तसेच एकूण शेतीच्या ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. इथे जलसंवर्धनाला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे अशा क्षेत्रात मुख्य व मिश्रपीक घेतले जाते. पाऊस लवकर गेला तर मुख्य पीक धोक्यात येते. तसेच दोन पावसांत मोठा खंड पडल्यास सर्व पिके धोक्यात येतात. मिश्रपीक न घेता मुख्य पीक आपले आणि आच्छादन पीक जलसंवंधर्नासाठी असा फरक करणे गरेजेचे आहे.

७) मिश्रपीक काढल्यानंतर जमीन उघडी पडते, भेगाळते, मग शेतकरी सतत कोळपणी करून भेग बुजविण्याचे काम करतो. मुख्य व मिश्रपीक घेण्यात संपूर्ण जमिनीची मशागत, कोळपणी, भांगलणी करावी लागल्याने या पिकातून किती पैसे मिळतात आणि किती खर्च होतात, यावर संशोधन होण्याची गरज आहे. कमीत कमी खर्च जास्त किंवा समाधानकारक उत्पादन आणि उत्पन्न तसेच दिवसेंदिवस जमिनीच्या सुपीकतेत फुकटात वाढ हे आपले सूत्र त्यांच्या विचारांशी मिळते जुळते आहे.

Save Soil
Soil Fertility : जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढवा...

८) आच्छादित जमिनीमध्ये मूलस्थानी जलसंवर्धन उत्तम होते. उघड्या जमिनीतून पाणी लगेच आडवे वाहू लागते. कोळपणी करून हलवून सैल केलेली जमीन पाणी आणि वाऱ्याने मोठ्या प्रमाणात धुपून जाऊ शकते. यामुळे होणाऱ्या नुकसानीचे मोजमाप केले जात नाही. त्यांचे म्हणणे आहे, की नत्रयुक्त खताचा जितका जास्त वापर कराल तितका जमिनीतील जास्त सेंद्रिय कर्ब संपून जाईल. पुढे कितीही जास्त नत्रयुक्त खते दिली तरी त्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळेल.

हरित क्रांती चालू केल्यानंतर शिफारशीत मात्रेच्या दीडपट ते दुप्पट खत मात्रा अनेक शेतकऱ्यांनी वाढविली आहे. तरीही उत्पादन पूर्वीइतके आता मिळत नाही. हा सर्वांचाच अनुभव आहे. यावर वेगवेगळ्या सुधारित संसाधनांचा वापर करून खर्च वाढविण्यापेक्षा सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात राखणे शेतकऱ्यांना शिकविणे गरजेचे आहे. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाअभावी सेंद्रिय कर्बाचे शेतीत असणारे महत्त्व शेतीत कधीच शेतकऱ्यांपर्यंत आणले गेले नाही. या त्रुटीला वरील संदर्भात दुजोरा मिळतो.

जमिनीतील उपयुक्त बुरशीचे प्रमाण ः

डॉ. डेव्हीड जॉन्सन लिहितात, की जमिनीमध्ये जिवाणूंच्या तुलनेत बुरशीचे प्रमाण जास्त पाहिजे. जमीन सुपीकता आणि पीक उपादनासाठी गरजेचे आहे, असा फक्त उल्लेख आहे. या मागील विज्ञान लक्षात घेणे गरजेचे आहे. जिवाणू कुजण्यास हलके पदार्थ कुजवितात तर बुरशी जड पदार्थ कुजवितात. जड पदार्थ कुजविल्यास जास्त उत्तम दर्जाचा सेंद्रिय कर्ब जमिनीला मिळतो. यातून जमिनीची शाश्‍वत सुपीकता वाढते.

या तुलनेत जिवाणू हलके पदार्थ कुजवितात. यापासून मिळणारा सेंद्रिय कर्ब लवकर संपणाऱ्या गटातील असतो. या संबंधित लेखन मालिकेत यापूर्वी आपण अभ्यासले आहे. सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या कामात अनेक गट काम करतात. यामुळे जमिनीवर भू-छत्रे दिसली तर खाली बुरशी वाढत आहे असे लक्षात येते. आम्ही उसाचे खोडवे अजिबात न नांगरता पुढील भाताचे पीक घेतो. उसाचे खोडके (जमिनीखालील अवशेष) तणनाशकाने मारले जातात. भात वाढीच्या काळात खोडके बुरशीकडून कुजविणेचे काम चालू राहाते. पावसाळ्यात वरंब्यावर सर्वत्र ओळीने भूछत्रे दिसू लागतात. शेतकऱ्यांना भूछत्राचे महत्त्व त्याविषयी कधीच प्रबोधन न झाल्याने लक्षात येणार नाही.

ऑस्ट्रेलिया देशातील जमिनी युरोपियन लोकांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात धुपून गेल्या आहेत. याबाबत त्या म्हणतात, की सरासरी एक किलो गहू उत्पादनामागे ७ किलोग्रॅम मातीची धूप होते. यामुळे आता गव्हाचे उत्पादन हेक्टरी एक टन इतके खाली आहे. ऑस्ट्रेलियात भू-संवर्धनाचे प्रश्‍न अभ्यासण्यासाठी ऑस्ट्रेलियन सॉइल कार्बन असोसिएशन संस्था कार्यरत आहे.

क्रिस्टीन जोन्स या संस्थेशी २००७ मध्ये जोडल्या गेल्या. त्यांचे म्हणणे असे आहे, की शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये कर्बाची टक्केवारी वाढवण्यासाठी सदर संस्था काहीही काम करीत नाही. भारतात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. बहुसंख्य शेतकरी तसेच संशोधनात काम करणाऱ्यांना पिकांच्या वाढीतील सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांच्या संबंधांविषयी माहिती नाही.

संपर्क ः

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com