Banana Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Drought : दुष्काळी स्थितीमुळे नवी केळी लागवड खोळंबली

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : राज्यात पाण्याची कमतरता असल्याने याचा फटका नव्‍या केळी लागवडीला बसला आहे. पावसाअभावी मागणी नसल्याने नव्या लागवडी रखडल्या आहेत. शेतकऱ्यांकडून मागणीच नसल्याने राज्यातील विविध टिश्यूकल्चर लॅब मधील सुमारे अडीच कोटी रोपे लागवडीविना पडून आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही राज्यातील केळी लागवडच धोक्‍यात येण्याची शक्यता आहे.

गेल्‍या वर्षापासून पावसात सातत्य नसल्याने राज्यातील शेतकरी केळी लागवडीला पसंती देत नसल्याचे चित्र आहे. खानदेश वगळता राज्‍यातील अन्य भागांत तर केळीचे प्लॉट शोधण्‍याची वेळ आली आहे.

सध्याही केळीचे उत्पादन गरजेइतके होत नसल्याने दरात तेजीचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा केळीची लागवड चांगली होईल अशी अपेक्षा होती. रोपे वेळेत उपलब्ध होण्यासाठी अनेक शेतकरी काही दिवस अगोदर रोपांची मागणी नोंदवतात. यंदा जून महिना पूर्ण कोरडा गेल्‍याने रोपवाटिकांमधून आवश्यक इतकी मागणी आली नाही.

जुलैच्या उत्तरार्धात पाऊस झाल्‍याने ज्या भागात धरणसाठा मुबलक झाला आहे. त्या भागातील शेतकऱ्यांनी काहीशी मागणी नोंदवली. पण त्‍यानंतर पाऊस न झाल्‍याने केळी रोपांची मागणी पूर्णपणे थंडावली. नोंदणी केलेली रोपांची मागणीही रद्द केली. अगदी वर्षभर पाणी असणाऱ्या भागामध्येही दुष्काळाची छाया दिसत असल्याने पश्चिम महाराष्ट्रासारख्‍या पाणीदार पट्ट्यातील शेतकऱ्यांनीही केळी लागवडीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

विहिरी, कूपनलिका या स्‍थानिक स्‍त्रोतांमधूनही पाण्याची पातळी कमी झाल्‍याने केळीला पाणी पुरेसे होणार नाही. यामुळे लागवडीचा लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्‍यता गृहीत धरुन शेतकऱ्यांनी केळी लागवड लांबणीवर टाकली, परिणामी नव्या लागवडीच खोळंबल्‍या. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर भागही केळीचा नवा पट्टा म्हणून विकसित झाला आहे. यंदा त्या भागातही पाऊस व धरणांत पाणीसाठा समाधानकारक नसल्याने केळी लागवड अतिशय कमी प्रमाणात होत आहे.

सणासुदीमुळे मागणीत वाढच

सध्या श्रावणाच्या पार्श्वभूमीवर केळीचे दर टनास १८००० रुपयांपर्यंत आहेत. आवश्‍यक इतकी केळी उपलब्ध होत नसल्‍याने दरातही वाढ झाली आहे. सणासुदीमुळे मागणीत वाढच होण्याची शक्‍यता असल्‍याने केळीच्या किमती आणखी वाढू शकतात. सध्या पावसाअभावी नव्या लागवडी झाल्या नाही तर पुढील वर्षीही राज्यात केळीची चणचण कायम राहील, अशी शक्यता आहे.

केळीची उपलब्धता करणे आव्‍हान बनले आहे. अनेक शेतकरी केळी लागवडीकडे फारशी पसंती देत नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी केळीचे दर एकदम कमी झाल्‍याने शेतकरी केळीपासून दूर गेले. आता पाण्याअभावी लागवड संकटात आहे.
- अविनाश पाटील, केळी उबवणगृह चालक, मजले, जि. कोल्हापूर
पावसाअभावी गेल्या काही दिवसांपासून केळीची लागवड थांबली. काही महिन्यांपूर्वी रोपांची उपलब्धता होत नव्हती. पण आता परिस्थिती उलट झाली आहे. आता रोपे उपलब्ध आहेत पण खरेदी करायला शेतकरी तयार नाहीत अशी स्थिती आहे.
- सुरेश मगदूम, कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशम सिस्टीम
केळी रोपांची मागणी नसल्याने विक्रीसाठी तयार असलेल्या रोपांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोपे शिल्‍लक राहात असल्‍याने टिश्यू कल्‍चर लॅब दररोज तोट्यात जात आहेत.
- विश्‍वास चव्‍हाण,रोपवाटिका चालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT