Satara News : सात-बारा उतारे काढण्यासाठी शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये सर्व्हर डाउन अथवा गर्दी असल्यास सतत हेलपाटे मारावे लागतात. या अडचणीतून पर्यायी मार्ग निघाला आहे. आता डिजिटल स्वाक्षरीकृत सात-बारा उतारे मोबाईलवरूनही डाउनलोड करता येतील. त्यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ हे ॲप विकसित केले आहे. पोर्टलप्रमाणे पंधरा रुपयांत हा उतारा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
विविध कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार सातबारा उताऱ्यांची आवश्यकता भासते. त्यातच कित्येक कामांना चालू तारखेचे उतारे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सात-बारा-खाते उताऱ्यासाठी उमंग हे ॲप विकसित केले आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांत ४४ हजार ५६० महसुली गावे आहेत. यात दोन कोटी ५७ लाख सात-बारा संगणकीकृत केले आहेत. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त उतारे डिजिटल स्वाक्षरीकृत केले आहेत. राज्यातील सर्व अडीच कोटी सात-बारा त्यावर उपलब्ध असतील.
महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवर उतारे उपलब्ध आहेत. आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवर देखील उपलब्ध असतील. हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून ॲण्ड्रॉइड, ॲपल मोबाइलसाठी ॲप्स स्टोअरवर उपलब्ध आहे.
उमंग ॲपवरून संबंधित व्यक्तीच्या खात्यात पैसे भरता येतील. तसेच ॲपवरून सातबारावरील डॉक्युमेंट आयडीवरून त्याची अचूकता पडताळणी करणे शक्य होईल. ॲपवरच खाते तयार करून त्यात पैसे जमा करून ओटीपी आल्यानंतर या खात्यातून १५ रुपये वळते झाल्यावर उतारा डाउनलोड होईल.
‘महाभूमी’वरून १०५ कोटींचा महसूल
दरम्यान, आतापर्यंत महाभूमी पोर्टलवरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीत नमुने डाउनलोड केले आहेत. त्यातून राज्य सरकारला १०५ कोटी ७५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. आज अखेर या पोर्टलवर २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. पोर्टलवर ही सुविधा १५ रुपयांत देण्यात येते.
सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीत काढण्यासाठी केंद्र सरकारने उमंग ॲप विकसित केले आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे व सहज शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्याची गैरसोय दूर होईल.- प्रशांत आवटी, उपजिल्हाधिकारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.