महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात (Air Pressure) वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल होत आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात (Minimum Temperature) घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र आठवडाभर तापमानात थोडीफार घसरण व अल्पशी वाढ अशा प्रकारचे हवामान बदल (Change In Climate) जाणवतील. तापमानातील वाढ व घसरण ही अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानात सरासरीपेक्षा अल्पशी वाढ आणि वाऱ्याच्या दिशेमध्ये होणाऱ्या बदलामुळे होईल.
आजपासून शुक्रवार (ता. १८ ते २३)पर्यंत हिंदी महासागराच्या भागावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. मात्र शुक्रवार (ता. २३)नंतर दक्षिण अरबी समुद्र व हिंदी महासागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्या वेळी भारताच्या उत्तर पश्चिम भागावर हवेचे दाब वाढून थंडी वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे हवामान कोरडे राहील.
वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंड वारे वाहतील. कमाल आणि किमान तापमानात घट होईल. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता निर्माण होईल. वातावरण बदलामुळे तसे घडेल. त्यामुळे हवेचे तापमान अल्पशा प्रमाणात वाढेल. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेतही वाढ होईल.
कोकण
आज (ता. १८) ठाणे व पालघर जिल्ह्यांत अल्पशा, तर उद्या (ता. १९) अत्यल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज व उद्या (ता. १८, १९) नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अल्प ते अत्यल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि धुळे जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ कि.मी. राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.
मराठवाडा
कमाल तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. यापुढील काळात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत ६० टक्के तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ५२ ते ५६ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ४० टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ६० टक्के, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४५ ते ४७ टक्के राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १६ टक्के, भंडारा जिल्ह्यात २० टक्के, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला
बागांमध्ये रात्रीच्या वेळी धूर करावा. जेणेकरून बागेचे तापमान वाढण्यास मदत होईल.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी फळबागांचे निरीक्षण करावे. आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे फवारणी करावी.
गहू पिकामध्ये मावा किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावावेत.
भाजीपाला पिकांमध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव पाहून नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.