Tomato Producer : नवी दिल्ली ः अपेक्षित दर नव्हते तेव्हा उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला. त्यामुळे अनेक बाजारपेठा आणि बांधांवर लाल चिखल पाहायला मिळाला. काही शेतकऱ्यांना १ ते २ रुपये किलो दराने विक्री करावी लागली. मात्र आता शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.
किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात तेजी आहे. तर ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार टोमॅटोचे वाढलेल्या दराला आळा घालण्यासाठी सरसावले आहे.
ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत,
जेणेकरून गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल. या शुक्रवार (ता. १४)पर्यंत टोमॅटोचा साठा किरकोळ दुकानांच्या माध्यमातून राजधानी दिल्ली क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वितरित केला जाईल.
गेल्या एका महिन्यात ज्या केंद्रांमध्ये प्रचलित किमती देशभरातील सरासरी किमतीपेक्षा जास्त आहेत, अशा केंद्रांमध्ये टोमॅटोचा साठा वितरित केला जाईल. ज्या राज्यांमध्ये अशा केंद्रांचे प्रमाण जास्त आहे अशा प्रमुख केंद्रांची हस्तक्षेपासाठी निवड करण्यात आली आहे.
टोमॅटोचे उत्पादन भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात होते. बहुतांश उत्पादन भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात होते, ज्यांचा एकूण उत्पादनात ५६ टक्के ते ५८ टक्के वाटा आहे. दक्षिण आणि पश्चिम प्रदेशात अतिरिक्त उत्पादन होत असल्यामुळे पिकाच्या हंगामानुसार इतर बाजारपेठांना त्याचा पुरवठा केला जातो.
प्रत्येक भागातील पिकाचा हंगामदेखील भिन्न आहे. पीक काढणीचा हंगाम डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालखंड टोमॅटोसाठी कमी उत्पादनाचा असतो. जुलै महिना पावसाळ्याच्या ऋतूचा असल्यामुळे वितरणाशी संबंधित आणखी आव्हाने आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे किमती वाढतात.
लागवड आणि कापणीच्या हंगामाचे चक्र आणि प्रदेशांमधील विविधता हे घटक टोमॅटोच्या किमतीला प्रामुख्याने जबाबदार आहेत. सामान्य किमतीच्या हंगामाव्यतिरिक्त, पुरवठा साखळीतील तात्पुरता व्यत्यय आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान यामुळे अनेकदा किमतींमध्ये अचानक वाढ होते.
सध्या, महाराष्ट्रातून विशेषत: सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील बाजारपेठांमध्ये पुरवठा होतो, जो या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशातील मदनापल्ली (चित्तूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरू आहे. राजधानी दिल्लीमधील आवक प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून आणि काही प्रमाणात कर्नाटकातील कोलारमधून होते.
नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पिकांची आवक होणे अपेक्षित आहे. शिवाय,
ऑगस्टमध्ये नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून अतिरिक्त पुरवठा होणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेशातूनही आवक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दर कमी होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांसाठी केंद्र सरकार काय करणार?
- राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ बाजारांतून करणार खरेदी
- राजधानी दिल्लीसह तुटवडा असलेल्या ठिकाणी ग्राहकांना सवलतीच्या दरात विकणार
- किरकोळ दुकानांच्या माध्यमातून शुक्रवार (ता. १४)पर्यंत सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध
टोमॅटोची बाजारात आवक कमी असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही, त्यामुळे दर वाढले आहेत. मात्र शेतकरी मालामाल झाले अशा निरर्थक चर्चा होत आहे. त्यात सरकारला फक्त ग्राहकांचे हित महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य व केंद्र सरकारचे धोरण विरोधात आहे. शेती उत्पन्न दुप्पट करू असे सांगणारे कुठे गेले आहे. देशात शेतकरी नव्हे, तर सरकारला ग्राहक महत्त्वाचा वाटतो.
- अमृत कापडणीस, टोमॅटो उत्पादक शेतकरी, आसखेडा, ता. सटाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.