पुणे : शेतीतला खर्च (Agriculture Expenditure) आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी बचत हाच अधिकचा नफा आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Modern Agriculture Technology) वापरासह खतांचा (Fertilizer) योग्य आणि संतुलित वापर महत्त्वाचा आहे, असा सूर महापरिषदेतील (FPC Mahaparishad) तिसऱ्या चर्चासत्रात व्यक्त झाला.
‘विकासाचे भागीदार- कृषी, सिंचन आणि वित्तसेवा’ या विषयावरील हे चर्चासत्र होते. यात इस्राईल केमिकल लिमिटेड कंपनीचे मुख्य तज्ज्ञ संजय बिरादार, ‘वर्डेशियन लाइफ सायन्सेस’चे व्यवस्थापकीय संचालक महेश दामोदरे, ‘स्मार्टकेम टेक्नॉलॉजी’चे सरव्यवस्थापक जी. एन. ढवळे, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे सहायक सरव्यवस्थापक जी. एम. श्रीधर, फिनोलेक्स प्लासॉनचे सरव्यवस्थापक ललितसिंग भंडारी आणि आरसीएफचे उपव्यवस्थापक संदीप केसरकर यांनी यात सहभाग घेतला.
बिरादार म्हणाले, की पिकांची अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी खत व्यवस्थापन महत्वाचे आहे. आपल्याकडे जमिनीचा पीएच ७.५ ते ८.५ पर्यंत आहे. तो संतुलित हवा. पिकांची गरज ओळखून संतुलित खत द्यायला हवे. आमची कंपनी त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. नावीन्यपूर्ण आणि अन्नद्रव्यांची पूर्णपणे उपलब्धता करणारी खते आम्ही उत्पादित करतो आहोत. नवतंत्रज्ञानाच्या वापरात ड्रोनच्या माध्यमातून खतांचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारे खतही उपलब्ध करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
जी. एम. श्रीधर म्हणाले, की ‘जीडीपी’मध्ये कृषीचा वाटा कमी होत चालला आहे. आमच्या बँकेमार्फत शेतीसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करतो आहोत. राज्यात ३६ जिल्ह्यांतील विविध भागांत आमच्या ११८६ शाखा आहेत. त्यात निमशहरी भागात ३०२ शाखा आहेत. विशेषतः शेतीसाठी आम्ही अधिकचा कर्जपुरवठा करतो. त्यात फळबाग लागवड, सिंचन, यांत्रिकीकरणात ट्रॅक्टर, ब्लोअर्स, गोल्ड लोनसारख्या सुविधा देत आहोत. किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतीपूरक उद्योग, व्यावसायिक शीतगृहांसह ‘हायटेक’ शेतीला मदत केली जाते. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीधर यांनी केले. महेश दामोदरे म्हणाले, की अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. बीजप्रक्रियेपासून अन्नद्रव्याच्या कार्यक्षम वापरापर्यंत व्यवस्थापन काटेकोर हवे. उच्च तंत्रज्ञानाने युक्त खते आम्ही देतो आहोत. शेतकऱ्यांनीही त्यांचा संतुलित, गरजेनुसार योग्य प्रमाणातच त्याचा वापर करावा.
स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजचे सरव्यवस्थापक जी. एन. ढवळे म्हणाले, की शेतीत पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. दिलेले खत हे पिकांमध्ये वर घेऊन जाण्याचे काम पाणी करते. पीक कुठलेही असू द्या, परंतु पाणी वेळेवर, काटेकोर व माती परीक्षण करूनच द्यावे. शेतकरी खतांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र त्याचा पुरेपूर वापर व्हायला हवा.
ललितसिंग भंडारी म्हणाले, की ठिबक सिंचनाचा वापर वाढतो आहे. त्याबाबत चांगली जागृती झाली आहे. आम्हीही शेतकरी आणि शेतकरी कंपन्यांमध्येही त्याबाबत जागृती करतो आहोत. केवळ ठिबक विषयीच नव्हे, तर अन्य शेतीप्रश्नात्ंवरही चर्चा करतो. आज अनेक कंपन्यांची विद्राव्य खते बाजारात आली आहेत. त्यांचा ‘पीएच’ तपासणे महत्वाचा आहे. पीएच अतिरिक्त झाल्याने ठिबक सिंचन प्रणाली खराब होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताच्या गुणवत्तेची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. संदीप केसरकर म्हणाले, की ‘आरसीएफ’ ही शेतकऱ्यांना सेवा देणारी कंपनी आहे. दरवर्षी चोवीस लाख मे. टन खत आम्ही आयात करतो. शेतकऱ्यांनी रासायनिक खते देताना जैविक खतांचाही जोड देणे आवश्यक आहे. ‘आरसीएफ’ने विद्राव्य खतेही उपलब्ध करून दिली आहेत. पुणे भागातील अनेक शेतकरी कंपन्या आमची सेंद्रिय खते वापरत आहेत. ‘नॅनो तंत्रज्ञाना’प्रमाणे आम्ही देखील युरिया ‘मार्केट’मध्ये उतरणार आहोत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.