Farmer Suicide
Farmer Suicide Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : शेतकऱ्यांभोवतीचा फास सुटेना

टीम ॲग्रोवन

मुंबई : कोविडनंतर आलेल्या नैसर्गिक, बाजारपेठीय संकटांची (Natural Calamity) मालिका सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये (Farmer Suicide) यंदाही चिंताजनक वाढ झाली आहे. जानेवारीपासूनच्या अवघ्या दहा महिन्यांत २४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीने पीक नुकसान (Crop Damage), नापिकीने वाढलेला कर्जबाजारीपणा, यातून वाढलेला कौटुंबिक तणाव, सरकारची मदत, विम्याबाबतची उदासीनता आदी कारणांनी शेतकऱ्यांची हतबलता वाढल्याचेच समोर आले.

ऐन खरीप नियोजनाच्या तोंडावर झालेल्या सत्तांतर नाट्याने प्रभावहीन यंत्रणेवर कोणाताच दबाव न राहिल्याने या संकटात भरच पडली. नव्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येताच ‘महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार’, अशी घोषणा केली असली, तरी तशा कोणत्याही आधाराने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही, हेच या माहितीतून समोर येते.

राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान २४०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. अमरावती विभागात भयाण परिस्थिती असून, ९३० शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. अमरावती पाठोपाठ औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर विभागांत आत्महत्यांचे सत्र मोठे आहे. औरंगाबाद विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

तर नाशिकमध्ये जळगावमध्ये १५८ शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. ही सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने संकलित केलेली माहिती असली, तरी प्रत्यक्षातील आकडेवारी मोठी असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाला मिळणारा कमी भाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि तणाव, सरकारी कामांबाबतची उदासीनता, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, नापिकी, कर्जाचा प्रचंड बोजा, सरकारी मदत आणि अनुदानातील भ्रष्टाचार आदींमुळे राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, परिणामी सोयाबीनी आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अंदाजे २२ हजार कोटी रुपयांची मदत प्रस्तावित आहे. मात्र मिळणारी रक्कम तुटपुंजी असते. ऑक्टोबरअखेर पुणे विभागात १८, नाशिकमध्ये ३१७, औरंगाबाद ८४६, नागपूर विभागात २८९ आणि अमरावतीत ९३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

या सर्व विभागांतील आत्महत्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता मार्च, एप्रिल, मे जून आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात येते. औरंगाबाद विभागात मार्चमध्ये १०१, जूनमध्ये १०८, ऑगस्टमध्ये ११९, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येक ९० शेतकऱ्यांनी जीवन संपवले. अमरावती विभागात फेब्रुवारीत ११२, मार्चमध्ये १०२, एप्रिलमध्ये १०३, आगस्टमध्ये ११३, तर सप्टेंबरमध्ये ८४ आणि ऑक्टोबर महिन्यात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात मार्चमध्ये ४२, मेमध्ये ३०, जूनमध्ये ३२, सप्टेंबरमध्ये ३५, तर ऑक्टोबर महिन्यात २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

वेळ मारून नेण्यासाठी आश्‍वासने

सरकार कुणाचेही असले तरी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करू, असे गुळगुळीत झालेले शब्द वापरले जातात. मात्र प्रत्यक्षात कृतिआराखडा केला जात नाही. लोकानुनय करण्यासाठी मदतीच्या घोषणा आणि प्रादेशिक असमतोल यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू, पिकांना चांगला भाव देऊन, नवीन तंत्रज्ञान आणू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यातूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे लक्षात येते.

ओल्या दुष्काळाकडे अक्षम्य दुर्लक्ष...

अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यासाठी विरोधी पक्षही आक्रमक होता. मात्र त्याची गरज नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच एकापाठोपाठ एक भाकड घोषणा करण्याची त्यांनी स्वतःशीच स्पर्धा लावल्याचे दिसत आहे. एवढे नुकसान होऊनही ओला दुष्काळा जाहीर होण्याचे कोणतेही चिन्ह न दिसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाच संपुष्टात आल्याचे एका शेतकरी नेत्याने सांगितले.

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या

कोकण : ०

पुणे : १८

नाशिक : ३१७

औरंगाबाद : ८४६

अमरावती : ९३०

नागपूर : २८९

एकूण : २४००

महिनानिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जानेवारी : २०७

फेब्रुवारी : २४४

मार्च : २८२

एप्रिल : २०९

मे : २३४

जून : २५७

जुलै : २०७

ऑगस्ट :२८१

सप्टेंबर : २५०

ऑक्टोबर : २२९

यंदाचे नुकसान...

- निम्म्याहून अधिक खरीप क्षेत्र अतिवृष्टिग्रस्त

- पीक नुकसान वाढले, पेरण्या उधळल्या

- खरीप हंगाम रोग-किडींनी मोठ्या प्रमाणात ग्रस्त

- पूर्वहंगामी कापसाच्या केवळ दोनच वेचण्या

- कांदा चाळीतच सडला; दरही अत्यंत कमी

- कांदा रोपांचे नुकसान; लागवडीत ६० टक्क्यांपर्यंत घट

- डाळिंबात ७० टक्के घट, सीताफळात ५० टक्के घट

- केळीच्या ४ हजार हेक्टरवरील बागा रोगाने काढल्या

- ‘लम्पी स्कीन’ने सुमारे १७ हजार जनावरे मृत्युमुखी

यंदा अतिवृष्टी, ‘लम्पी’मुळे शेतकरी हवालदिल आहे. पीकविम्याची रक्कम कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांचे इतके प्रश्‍न असूनही सरकार संवाद साधत नाही, हे भयाण चित्र आहे.
अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
यंदा अतिवृष्टीमुळे ऊस वगळता अन्य कुठल्याही पिकाचे उत्पादन नाही आणि भावही नाही. मूग, उडीद, मका, सोयाबीन, कापूस, कांदा, भाताचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून मदत नाही आणि विमा कंपन्यांनी तुटपुंजी भरपाई दिली आहे. वसुली जोरात सुरू आहे. वीज तोडण्याचा सपाटा लावला आहे. दुसरी बाब म्हणजे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. तुलनेत उत्पादन कमी आहे. जूनमध्ये आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची केवळ पोकळ घोषणा केली आहे.
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT