Ground Water Level
Ground Water Level Agrowon
ताज्या बातम्या

Ground Water Level : भूजल पातळीत एक मीटरपेक्षा अधिक वाढ

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भूगर्भातील पाणीपातळी (Ground Water Level) वाढण्यास मदत झाली आहे. भूजल सर्वेक्षण (Ground Water Survey) आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार, यंत्रणेकडे असलेल्या एकूण ३७०३ निरीक्षण विहिरींपैकी ३०८९ विहिरींमधील (Well Water) भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

तर ६१४ निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत एक मीटरहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाडा व विदर्भातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमी-अधिक स्वरूपात भरली. दरवर्षी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात होत असून, त्याचा परिणाम भूजल पातळीच्या स्थितीवर होऊ लागला आहे. गेल्या वर्षी राज्यातील सुमारे ५६ तालुक्यांतील सुमारे ६१० गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली होती.

२८१ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

ऑक्टोबरअखेरीस तालुकानिहाय पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी २८१ तालुक्यांत सरासरी आणि त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. ७४ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली आहे. या ७४ पैकी ६० तालुक्यांत ० ते २० टक्के तूट आढळून आली आहे. तर १२ तालुक्यांत २० ते ३० टक्के, दोन तालुक्यांत ३० ते ५० टक्के तूट आढळून आली.

३ हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्‍चित

भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय ३ हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्‍चित केल्या आहेत. निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील ऑक्टोबरमधील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यात राज्यातील अनेक गावांत भूजल पातळीत वाढ झाली असली तरी अवघ्या ५९८ गावांत एक मीटरपेक्षा जास्त, तर त्यापैकी ३६ गावांत तीन मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. तर ११३ गावांत दोन ते तीन मीटर, ४४९ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे.

सातारा जिल्ह्यात पातळी खालावली

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील पाणीपातळी चांगलीच वाढली असली तरी काही जिल्ह्यांत कमी झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे. खानदेशात कमी झालेल्या पावसामुळे भूजल पातळी खोल गेलेल्या गावांची संख्या अधिक आहे. खानदेशात १३२ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली. त्यापैकी १२० गावांत एक ते दोन मीटर, तर ११ गावांत दोन ते तीन मीटर, तर एका गावात तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खालावली. पुणे विभागातील २३३ गावांत एक मीटरहून अधिक भूजल पातळी खोल गेली. यात सातारा जिल्ह्यात एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेलेली गावे सर्वाधिक १३९ आहे.

विदर्भात पाणीपातळीत वाढ

विदर्भात चांगला पाऊस झाला असला तरी काही भागात कमी-अधिक झालेल्या पावसाचा परिणाम जानेवारी महिन्यापासून दिसून येईल. सध्या विदर्भात बहुतांश गावांत पाणीपातळी वाढली आहे. तर अवघ्या ८८ गावांत एक मीटरहून अधिक खोल पाणीपातळी आहे. यामध्ये अमरावती व नागपूर विभागातील ८८ गावांचा समावेश आहे. त्यापैकी ४६ गावात एक ते दोन मीटर, तर १८ गावांत दोन ते तीन मीटर, तर २४ गावांत तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे.

३९ गावांत पाणीटंचाई भासणार

दरवर्षी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यातील ५८ तालुक्यांतील सुमारे ५९८ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी चार तालुक्यांतील अवघ्या ३९ गावांत एप्रिलपासून पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती भासणार असल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावे घटली

मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भूजलपातळीत चांगली वाढ झाली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मात्र उपसा अधिक होत असल्याने मराठवाड्यातील आठ तालुक्यांतील ४४ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे. यात परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे. त्यापैकी ३८ गावांत एक ते दोन मीटर, तर सहा गावांत दोन ते तीन मीटर पाणीपातळी खोल आहे.

भूजल पातळी

वाढण्याची कारणे

गेल्या तीन वर्षांपासून चांगला पाऊस

यंदाचा परतीच्या पाऊस

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस

पावसाळ्यात कमी पाणी उपसा

पावसाच्या काळात खंड नाही

पाणीटंचाई कालावधीसाठी गृहीतके अशी धरली जातात

क्षेत्र पर्जन्यमानातील तूट (टक्के) स्थिर पाणी

पातळीतील तूट संभाव्य टंचाई कालावधी

अवर्षणप्रवण व शाश्‍वत पर्जन्यमान २० टक्क्यांपेक्षा जास्त तीन मीटरपेक्षा जास्त ऑक्टोबरपासून पुढे

दोन ते तीन मीटर जानेवारीपासून पुढे

एक ते दोन मीटर एप्रिलपासून पुढे

एकमीटरपर्यत नियंत्रणयोग्य टंचाई

अति पर्जन्यमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त दोन ते तीन मीटर जानेवारीपासून पुढे

एक ते दोन मीटर एप्रिलपासून पुढे

राज्यात विभागनिहाय भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या

विभाग तीन मीटरहून अधिक दोन ते तीन मीटर एक ते दोन

मीटर एक मीटरपेक्षा जास्त

ठाणे ० ० १०१ १०१

नाशिक १ ११ १२० १३२

पुणे ११ ७८ १४४ २३३

औरंगाबाद ० ६ ३८ ४४

अमरावती २४ १८ ३९ ८१

नागपूर ० ० ७ ७

एकूण ३६ ११३ ४४९ ५९८

यंदा चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र रब्बी हंगामात पाण्याचा उपसा अधिक वाढला तर पुन्हा पाणीपातळी झपाट्याने खाली जाईल. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून कमी उपसा कसा करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT