नाशिक ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अखत्यारित राज्यात ३०६ बाजार समित्या (APMC) कार्यरत आहेत. त्यामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात २९५ बाजार समित्यांनी वार्षिक उत्पन्नाची (APMC Income) माहिती पणन मंडळाला सादर केली होती.
त्यानुसार राज्यात ९२४ कोटी ३ लाख १२ हजार ६६७ रुपये वार्षिक उत्पन्न मिळविले आहे. निफाड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील बाजार समित्यांना मिळालेल्या उत्पन्नाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
पणन मंडळाच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये सोलापूर बाजार समिती अव्वल ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर लातूर तर तिसऱ्या स्थानावर पिंपळगाव बसवंत आहे.
राज्यातील एकूण २९५ बाजार समित्यांच्या आर्थिक उत्पन्नात राज्यातील प्रादेशिक बाजार समितीत १०१ कोटी ५८ लाख उत्पन्न मिळवीत मुंबई पहिली, ७६ कोटी १० लाख उत्पन्न मिळवीत पुणे दुसरी, तर ३० कोटी ३० लाख उत्पन्न मिळवीत नागपूर तिसरी याप्रमाणे त्या वरचढ ठरल्या आहेत. बार्शी, जुन्नर या बाजार समित्यांचे उत्पन्न १० कोटींवर आहे.
३०६ बाजार समित्यांपैकी २९५ समित्यांची उत्पन्न-खर्चाची माहिती पणन मंडळाला प्राप्त झाली. पत्रास उत्तर देतेवेळी राज्यातील ११ बाजार समित्यांची माहिती अद्याप प्रलंबित होती.
त्यामध्ये मुळशी (जि. पुणे), सिरसम (जि. हिंगोली), परळीवैजनाथ (जि. बीड), जळकोट (जि. लातूर), देगलूर (जि. नांदेड), किनवट (जि. नांदेड), हिमायतनगर (जि. नांदेड), भूम (जि. उस्मानाबाद), लोहारा (जि. उस्मानाबाद), परंडा (जि. उस्मानाबाद), वाशी (जि. उस्मानाबाद) यांची आर्थिकपत्रके त्या वेळी अप्राप्त होती.
त्यामुळे ९२४ कोटींवर हे वार्षिक उत्पन्न होते. ही माहिती प्राप्त झाल्यास उत्पन्न वाढीसह अंतिम आकडा समोर येईल.
उत्तर महाराष्ट्रात पिंपळगाव बसवंत ‘नंबर एक’
२०२१-२२ वर्षात ६५,८२,५७४ क्विंटल कांदा आवक झाली असून १,७१,६०,४५० क्रेट्स टोमॅटो आवक झाली आहे. या व्यतिरिक्त धान्य, भाजीपाला, बेदाणा, डाळिंब यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीने राज्यात तिसरा, तर नाशिक विभागात पहिला नंबर मिळविला आहे.
बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड तालुक्यातील ६९ गावांचे असून, २७ वर्षांपूर्वी २८ डिसेंबर १९९५ रोजी स्थापन झाली असून, आमदार बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून दिलेल्या विविध सोयी-सुविधा, रोख व्यवहार, शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याने अल्पावधीतच या बाजार समितीने राज्यात व देशात नावलौकिक मिळविला आहे. बाजार समितीचे मालकीची १५७ एकर जमीन आहे.
विविध विकासकामे, सामाजिक दायित्व जपत ४२ कोटींच्या ठेवी शिल्लक आहेत. बाजार समितीवर एक रुपयाचेही कर्ज नसल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
मोठ्या बाजार समित्यांची उत्पन्न स्थिती
बाजार समिती... उत्पन्न (रुपये)
मुंबई...१०१.५८ कोटी
पुणे...७६.१० कोटी
नागपूर...३०.३० कोटी
वार्षिक उत्पन्नात राज्यातील टॉपटेन बाजार समित्या
बाजार समिती...वार्षिक उत्पन्न (कोटींत)
सोलापूर...२५,२०,४१,७१७
लातूर...२४,२०,८४,२९६
पिंपळगाव बसवंत...२१,९६,८७,२४८
लासलगाव...१९,३५,३७,४९४
अमरावती...१७,८१,९५,३४४
कोल्हापूर...१६,५८,७१,१२०
नाशिक...१६,२०,०४,६६५
खामगाव...१५,४७,२२,९९३
अहमदनगर...१४,९६,१२,०१०
हिंगणघाट...१४,१२,५४,२१३
(संदर्भ : पणन मंडळाने आमदार बनकर यांना दिलेले पत्र)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.