Beed News : मागच्या वर्षी वरुणराजाच्या कहरामुळे खरीप पिकांवर खराटा फिरला. याचे अनुदान जाहीर करायला शासनाने आठ महिने लावले. अतिवृष्टीचे मंजूर केलेले ४१० कोटी रुपयांच्या भरपाईच्या रकमेपैकी शेतकऱ्यांना केवळ २८१ कोटी रुपये मिळाले आहेत.
अद्यापही १३० कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही. तर, सततच्या पावसामुळे नुकसानीच्या ४०० कोटी रुपयांपैकी १९५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली असली तरी अद्यापही डेटा अपलोडचेच काम सुरु आहे.
गेल्या वर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांना उशीर झाला. त्यानंतर शंखी गोगलगाईंनी पिकांवर प्रादुर्भाव केला. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने कपाशी व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. या दुष्टचक्रात आणखी सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व अतिवृष्टीची भर पडली. याचा फटका तब्बल आठ लाख ५० हजार शेतकऱ्यांना बसला.
या शेतकऱ्यांचे पाच लाख ८५ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले होते. सरकारने मागच्या काळात अगोदर अतिवृष्टी नुकसानीचे ४१० कोटी रुपये मंजूर केले. जिल्हा प्रशासनाने याचा संपूर्ण डेटा अपलोड करून दोन महिने उलटले तरी अद्यापही शेतकऱ्यांना यातील १२९ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. आतापर्यंत केवळ २८१ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या हाती पडली आहे. तर, सततच्या पावसामुळे नुकसान भरपाईपोटी ४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता.
यातील मागच्या महिन्यात १९५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याचेही वाटप डेटा अपलोड करण्यासाठी रखडलेले आहे. म्हणजे एकूणच शेतकऱ्यांचे नुकसान ८१० कोटी रुपयांचे झाले. याला दहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती केवळ २८१ कोटी रुपये पडले आहेत.
४०० कोटी रुपये मंजुरीच्या रकमेपैकी अद्यापही शेतकऱ्यांना १२९ कोटी रुपये मिळणे बाकी आहे. तर, सततच्या पावसामुळे ४०० कोटींचे नुकसान होऊन केवळ १९५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील अद्याप २०५ कोटी रुपये मंजूर होणे बाकी आहे.
अतिवृष्टी नुकसान
दोन लाख ९७ हजार हेक्टरवर
तीन लाख ८७ हजार शेतकऱ्यांना फटका
४१० कोटी रुपयांच्या भरपाईची गरज
२८१ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप
सततच्या पावसामुळे नुकसान
दोन लाख ८७ हजार हेक्टरांवर
चार लाख ६३ हजार शेतकऱ्यांना फटका
४०० कोटी रुपये भरपाईची प्रशासनाकडून मागणी
१९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.