Bogus Fertilizer
Bogus Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : बनावट लेबल लावलेल्या दाणेदार खताच्या ३०० गोण्या जप्त

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः भेसळयुक्त खतप्रकरणी (Fertilizer Adulteration) मोहोळ, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट अशा तीन ठिकाणी आठवडाभरातच तीन गुन्हे दाखल झालेले असताना, आता मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या बनावट लेबल (Fake Label Fertilizer) लावलेल्या सुपर दाणेदार आणि पोटॅश दाणेदार या खताच्या (Potash Fertilizer) सुमारे ३०० गोण्यांची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पडताळणी करून दोघांविरुद्ध मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

भेसळयुक्त खताबाबत ‘अॅग्रोवन’ गेल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कृषी केंद्रांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू असतानाच मंद्रूप येथे बुधवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास मोहोळ-विजापूर महामार्गावर लोकसेवा हायस्कूलसमोर पोलिसांना खताची वाहतूक करणारा संशयित टेम्पो (क्रमांक एमएच १३, डीक्यू ५०५३) निदर्शनास आला. तो टेम्पो पकडून पोलिस ठाण्यात लावला. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. तेव्हा कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी आर. एस. माळी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. डी. नारायणकर, कृषी सहायक प्रवीण हंगरगे यांच्यासह पोलिस ठाण्यात जाऊन सदर टेम्पोतील खताची तपासणी केली.

त्या वेळी एका नामवंत कंपनीच्या नावाने या गोण्यांवर बेकायदेशीररीत्या बनावट लेबल लावल्याचे आढळले. ज्या कंपनीच्या नावाने हे खत विक्री होणार होते, त्यांच्याकडे खत बनवण्याचा कोणताही परवाना नव्हता, तरीही ते शेतकऱ्यांना विक्री करणार होते. तसेच ती कंपनीही अन्य एका कंपनीकडून हे खत खरेदी करत असल्याचे आढळल्याने गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी टेम्पोचालक परशुराम रगटे (वय-२६, काळेवस्ती, निंबर्गीरोड, मंद्रूप) आणि ज्याने हे खत खरेदी केले. त्या मुख्य संशयित निरंजन बनसिद्ध ख्याडे (रा. मंद्रूप) या दोघांविरुद्ध मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास हवालदार कांबळे करत आहेत.

टेम्पोमध्ये सुमारे अडीच लाखांचे खत पोलिसांनी जो टेम्पो पकडला. त्या टेम्पोमधून बनावट लेबल लावलेल्या पोटॅश दाणेदार खताच्या १५० गोण्या आणि सुपर दाणेदारच्या १५० गोण्या अशा ३०० गोण्या जप्त केल्या. या गोण्यांची किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. त्याशिवाय टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.

मूळ सूत्रधार शोधण्याचे आव्हान

या प्रकरणातील संशयित निरंजन ख्याडे याने हे खत चिंचोली एमआयडीतील एका कंपनीकडून खरेदी केल्याचे कृषी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. आता तिथेच हे खत तयार होते, की आणखी कुठून आणले जाते, हे कृषी विभागासह पोलिसांना तपासावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मूळ सूत्रधार शोधण्याचे आव्हान कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT