'100 per cent BJP in Mumbai' Agrowon
ताज्या बातम्या

BJP : `मुंबईत भाजप शतप्रतिशत`

अमित शहा यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनाच डावलले; ठाकरेंना घेरण्याची रणनीती

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) दोन दिवसीय मुंबई दौरा आटोपून परतले असले, तरी राजधानीतील राजकीय वातावरण गरम झाले आहे.

अमित शहा यांनी मुंबई महापालिकेतही शत प्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. तर शहा यांच्या दौऱ्यात शिंदे गटाला काहीसे बाजूला ठेवल्याचे चित्र होते. तर राज्यातील सत्तांतरापासून टार्गेटवर असलेले उद्धव ठाकरे यांना शेवटचा धक्का देण्यासाठी अमित शहा रणनीती आखत असल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाला.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेश दर्शनाच्या निमित्ताने दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामागील राजकीय हेतू लपून राहिला नव्हता.

आशिष शेलार यांच्या घरी गणेश दर्शनासाठी शहा दरवर्षी येतात. मात्र शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर शहा यांचा प्रथमच दौरा होता. आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर वर्षा निवासस्थानावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाच्या दर्शनाला शहा यांनी हजेरी लावली.

दरम्यान, सह्याद्री अतिथिगृह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या निवासस्थानी शहा यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीचा तपशील पुरेसा बाहेर आला नसला, तरी एका पदाधिकाऱ्याने हे भाषण रेकॉर्ड करत माध्यमांना पाठविले.

त्यानंतर भाजपची आगामी रणनीती स्पष्ट झाली. काहीही झाले तरी मुंबई महापालिकेत भाजप एकटी लढेल आणि उद्धव ठाकरे यांना शेवटचा भीमटोला देण्यात येईल, अशी प्राथमिक तयारी आहे.
बंद दाराआड अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची हमी अमित शहा यांनी आपल्याला दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर शहा यांनी याबाबत स्पष्टपणे कुठेही काहीच सांगितले नव्हते.

अखेर कालच्या बैठकीत त्यांनी, ‘‘ठाकरे यांनी आमच्याशी गद्दारी केली. त्यांना जमिनीवर आणा. युती म्हणून लढूनही भाजपच्या काही जागा त्यांनी पाडल्या.’’ असा आरोप त्यांनी केला.

गोपनीय बैठक ‘लीक’ झाली
देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

मात्र ही बैठक अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती. माझे भाषण बाहेर जाता काम नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र भाषण सुरू असतानाच त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ क्लिप टीव्ही चॅनेल्सवर ऐकवल्या जात होत्या. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल भाजपने घेतली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना डावलले?
अमित शहा मुंबईत येत असल्याने त्यांच्यासोबतच्या प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील, असे कार्यक्रम मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाने आदल्या दिवशीच पत्रकारांना कळविले होते. यात लालबागच्या गणरायाचे दर्शन, वांद्रे येथील गणेश दर्शन आणि अन्य गणेश दर्शनाच्या शहा यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार होते.

मात्र काही वेळाने सुधारित कार्यक्रमात मुख्यमंत्री शहा यांच्या कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे लक्षात आले. शहा यांचे सार्वजनिक सर्व कार्यक्रम भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाले. यावरून थेट शिंदे यांनाच डावलल्याची चर्चा होती.

दरम्यान, शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनीही काही बोलण्यास नकार दिला.

भाजप स्वतंत्र लढणार
अमित शहा यांच्या दौऱ्यात भाजपने स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट झाले, तर शिंदे गट आणि राज ठाकरे यांची मनसे युती होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या मतांत फूट पडल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा भाजप नेत्यांचा कयास आहे. त्यामुळेच तशी तयारी केल्याचे शहा यांना पटवून देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT