अरुण देशमुख
जमीन वाफशावर राहील एवढेच पाणी दिल्यास, लवकर व भरपूर फुटवे फुटतात. त्यामुळे शेतात एकसारखे ऊस (Sugarcane Production) तयार होतात. अपेक्षित उसाची संख्या मिळणे शक्य होते. उसाच्या संपूर्ण वाढीच्या (Sugarcane Growth) अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्न आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन वापरल्याने मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढते. पूर्वहंगामी ऊस लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत करतात. हे पीक कमीत कमी १४ ते १५ महिने शेतात उभे असते. उसाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्न आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
याचाच अर्थ जमीन कायमस्वरूपी वाफशावर असणे जरुरीचे आहे. नत्र व पालाशसाठी अनुक्रमे युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा मोनो अमोनिअम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे मुळांच्या कार्यक्षेत्रात केल्याने खतांच्या मात्रेत ३० टक्के बचत होईल.
पूर्वहंगामातील ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन करताना उसाच्या शरीरक्रियाशास्त्रातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे. उसाला अति पाणी हे उसाचे तसेच साखरेचे उत्पादन घटवते, तर सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण उसाचे उत्पादन वाढविते. फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले, तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते व फुटवे कमी निघतात. उसाची उंची तसेच उसाच्या कांड्याची लांबी वाढणे फार जरुरीचे आहे, कारण यांच्यात साखर साठवली जाते, उसाचे वजन वाढते. ऊस तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
उगवणीची अवस्था :
१) सुरुवातीच्या उगवणीच्या अवस्थेमध्ये आणि कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.
२) सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच जमिनीत हवा खेळती असावी.
३) सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते. त्यामुळे उगवण उशिरा व कमी प्रमाणात होते.
४) पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास व शेतात पाणी साचल्यास उसावरील डोळे कुजतात, तसेच उगवून आलेले कोंबही मरतात. उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.
फुटवे फुटण्याची अवस्था
१) जमीन वाफशावर राहील एवढेच पाणी दिल्यास, लवकर व भरपूर फुटवे फुटतात. त्यामुळे शेतात एकसारखे ऊस तयार होतात. अपेक्षित उसाची संख्या मिळणे शक्य होते.
२) या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसल्यास फुटवे कमी निघतात, आलेले फुटवे मरतात. ऊस संख्या कमी मिळाल्यामुळे उत्पादन कमी येते.
३) जास्त पाणी दिल्याने उसाच्या मुळांशी हवा राहत नाही. फुटवे फुटण्यावर अनिष्ट परिणाम होतो. फुटलेल्या फुटव्यांच्या वाढीवरही परिणाम होतो.
जोमदार वाढीची अवस्था ः
१) पिकाच्या जोमदार वाढीच्या म्हणजेच उत्पादन वाढीच्या अवस्थेमध्ये उसास योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण याच अवस्थेमध्ये उसाची उंची, कांड्यांची लांबी व जाडी वाढत असते. याचा प्रत्यक्ष परिणाम उसाचे वजन वाढण्यावर होत असतो.
२) याच अवस्थेमध्ये कांड्यामध्ये साखर साठविण्याचे कार्य सुरू
असते. म्हणून हा कालावधी ऊस व साखर उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या कालावधीमध्ये उसाची पाण्याची गरज ही सर्वोच्च असते.
३) या कालावधीमध्ये उसाच्या वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण जर ८५ टक्क्यांच्या दरम्यान असेल, तर कांड्याची लांबी व जाडी वाढून उसाचे वजन झपाट्याने वाढते.
४) या कालावधीमध्ये पाण्याचा ताण पडल्यास कांड्या एकदम आखूड पडतात, उसाची उंची खुंटते, पर्यायाने उसाचे उत्पादन घटते.
५) पाण्याचा ताण जोमदार वाढीच्या शेवटच्या टप्प्यात पडल्यास ऊस पिकास पक्वता लवकर येते आणि उत्पादन घटते. लागण पिकामध्ये पाण्याचा ताण पडल्यास, खोडवा पिकावरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो.
पक्वतेची अवस्था ः
१) पक्वतेच्या कालवधीत पिकास थोडा पाण्याचा ताण दिल्यास उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या कालावधीमध्ये उसाच्या वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण ७४ ते ७६ टक्के असावे.
२) पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाखीय वाढ सुरू राहते व साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याचा जास्त ताण पडल्यास ऊस वाढ खुंटते व साखर उत्पादन कमी होते.
कमी पाण्यामुळे जमिनीस भेगा पडल्यास मुळांची वाढ खुंटते. ठिबक सिंचनाखाली ऊस पिकाची पाण्याची गरज उसाची पाण्याची गरज काढण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.
ईटीसी = ईटीओ × केसी
ईटीओ = पीई × के प्यान
जिथे,
ईटीसी = पिकाची पाण्याची गरज (मिमी /दिन)
ईटीओ = संदर्भीय बाष्पोत्सर्जन (मिमी /दिन)
केसी = पीक गुणांक (क्रॉप कोईफिसेंट)
पीई = उघड्या यूएस क्लास ए प्यानमधील बाष्पीभवन (मिमी /दिन)
के प्यान = प्यान कोईफिसेंट (याची किंमत सरासरी ०.८ पकडली जाते)
पीक गुणांकाची (क्रॉप कोईफिशंट) किंमत ही पिकाच्या वयोमानानुसार म्हणजे वाढीच्या अवस्थेवर अवलंबून असते. ऊस लागणीनंतर पीक गुणांकाच्या किमती खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे बदलतात.
तक्ता : ऊस वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक
उसाचे वय (लागणीनंतर दिवस)---पीक वाढीची अवस्था ---पीक गुणांक
० - ४५---लागणीपासून ते उगवणीपर्यंत ---०.४
४६ -६०---उगवणीपासून ते फुटवे फुटणे ---०.५ -०.६
६१ -९०---फुटव्यांचा कालावधी ---०.६ - ०.८
९१ -१४०---फुटवे ते कांड्या सुरू होईपर्यंत ---०.८ -१.०
१४१ - ३८०---जोमदार वाढीची अवस्था ---१.० - १.१
३८० -४२०---पक्वतेचा कालावधी ०.७५ - ०.८
मुळांची वाढ आणि पाणी शोषण्याची क्रिया
१) पोषक वातवरणात ऊस लागण केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून उसावरील डोळे फुगू लागतात व कांडीला मुळ्या सुटण्यास सुरुवात होते.
२) सेटरूट्सची वाढ झपाट्याने म्हणजे २४ मि.मी. प्रति दिन या वेगाने होते, आणि या मुळांची लांबी १५० ते २५० मि.मी. झाल्यानंतर ही वाढ थांबते. ही मुळे कालांतराने काळी होतात, कुजून जातात व लागणीनंतर ८ आठवड्यांनी नाहीशी होतात.
३) उसाच्या उगवणीबरोबरच जमिनीमध्ये शूट रूट्स निघायला सुरुवात होते. पहिली निघालेली शूट रूट्स सेट रूट्सच्या मानाने जाड असतात. शूट रूट्स जमिनीमध्ये वेगाने वाढतात व नंतर त्यास फुटवे येऊन झपाट्याने त्यांची वाढ होते.
४) शूट रूट्स वाढण्याचा जास्तीत जास्त वेग ७५ मि.मी. प्रति दिन इतका सुरुवातीच्या एक, दोन दिवसांत असतो व नंतर एक आठवड्याने तो ४० मि.मी. प्रति दिन इतका असतो.
५) जमिनीमध्ये मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदा. ३० सेंमी खोलीमध्ये ४८ ते ६८ टक्के मुळे, ३० ते ६० सेंमी खोलीवर १६ ते १८ टक्के मुळे, ६० ते ९० सेंमी वर ३ ते १२ टक्के मुळे, ९० ते १२० सेंमी वर ४ ते ७ टक्के मुळे, १२० ते १५० सेंमी वर १ ते ७ टक्के मुळे व १५० ते १८० सेंमी खोलीवर ० ते ४ टक्के मुळे असतात.
तक्ता : उस पिकाचे जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचे शोषण
जमिनीची खोली (सेंमी) ---पाण्याचे शोषण (टक्के)
० - २०---६२.०
२० - ४० ---२३.४
४० - ६०---८.८
६० - ८०---४.४
८० - १०० ---१.४
संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग,नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.