टीम ॲग्रोवन
सांगोला : ‘साहेब,अहो तुमच्या पंचनाम्यासाठी थोडंफार राहिलेलं पिकं ते पण पाण्यातच ठेवू का? द्यायचं असेल तर सरसकट नुकसान भरपाई द्या, नाहीतर राहू द्या म्हणाव सरकारला !’ अशा संतापजनक प्रतिक्रिया आहेत.
उभ्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे बहूतेक ठिकाणी अद्याप झालेले नाहीत. एकीकडे पंचनामे होत नाहीत अन् दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून थोडेफार राहिलेले पीक पाण्यात आहे.
ते पीकपण काढता येईना. तालुक्यात पंचनाम्यांचा घोळ आहे. वरातीमागून घोडे असा खराखुरा प्रकार आहे.
सांगोला तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. तालुक्यातील सर्वाधिक १७० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेल्या संगेवाडी मंडलामध्ये महसूल व कृषी अधिकारी पंचनामे करताना शेतकरी अधिकाऱ्यांना बोलत होते.
अनेक शेतकऱ्यांचे शेतात सध्या पीकच नसल्याने पंचनामे करण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.
काढणीला आलेली पिके वाया गेली. तालुक्यात या अगोदरच डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्याने सूर्यफूल, मका इत्यादी पिके मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. परंतु, ही पिके मातीमोल झाली.
शासकीय नियमानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत त्यांनी स्थानिक पातळीवरील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
शासनाचा आदेश जसा येईल त्याप्रमाणे नुकसानभरपाईचा अहवाल तयार करण्यात येईल