Water Importance : भारतीय परंपरेमध्ये पाण्याला सर्वोच्च स्थान

Proper Use of Water : भारतीय परंपरेत जाणवणारे सर्वांत महत्त्वाचे जीवनमूल्य म्हणजे पाण्याला सर्वश्रेष्ठ आदर. तो दिला पाहिजे, हे आपल्यात रुजवले गेले आहे.
Water
WaterAgrowon

सतीश खाडे
Water Importance For Agriculture : भारतीय परंपरेत जाणवणारे सर्वांत महत्त्वाचे जीवनमूल्य म्हणजे पाण्याला सर्वश्रेष्ठ आदर. तो दिला पाहिजे, हे आपल्यात रुजवले गेले आहे. पण केवळ शाब्दिक किंवा प्रतिकात्मक स्वरूपातील पूजाअर्चांपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आपला पाण्याबद्दल, ते पुरवणाऱ्या तलाव, नद्यांबद्दलचा आदर दिसण्याची गरज आहे.

ब्रिटिशांनी भारत पूर्ण ताब्यात घेतला त्या वेळी केलेल्या एका नोंदीनुसार भारतात पंधरा हजारांपेक्षा अधिक नद्या आणि तीस लाख तलाव आहेत. त्यापूर्वीही अनेक परदेशी प्रवाशांनी भारत हा तलावांचा देश असल्याचे लिहून ठेवले आहे. एकतर पाण्याची नैसर्गिक मुबलकता, त्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली साठवणुकीची आणि नियोजनाची जोड यातून हे घडले आहे.

भारतीय परंपरेत पंचमहाभूतांची संकल्पना आणि त्याविषयीची आदर व्यक्त करणारी जीवनमूल्ये रुजलेली आहे. या पंचमहाभूतामध्येही पाण्याला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले दिसते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवातच पाण्याने भरलेल्या मंगलकलशाच्या पूजेने होते. म्हणजेच इष्ट देवतेच्या पूजनाआधी पाण्याचे पूजन केले जाते.

आपल्यापर्यंत पाणी घेऊन येणाऱ्या नद्यांना माता म्हटले जाते. नद्यांमध्येही गंगेचे महत्त्व मोठे मानले जाते. प्रत्यक्ष गंगा स्नानाला तर गंगेकाठचे लोक सर्वश्रेष्ठ पूजा समजतातच, पण पूर्ण भारतवर्षात आयुष्यात एकदा तरी गंगा स्नान (पापहारक म्हणून) महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच की काय आपल्या गावातील नदीला गंगा संबोधून गंगा स्नान व सूर्याला पाण्याचे अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करण्याची प्रथा होती.

नद्यांच्या उगमाला देवाचे अस्तित्वस्थान समजून मंदिरे उभारलेली दिसतात. त्यांना श्रेष्ठ तीर्थक्षेत्रांपैकी मानले जाते. नद्यांची आरती ही संकल्पना फक्त भारतीय परंपरेतच आहे. नद्यांना ठिकठिकाणी बांधलेले घाट ही व्यवस्था फक्त आपल्याच देशात असावी. नदी व तिच्या काठी देवाचे अधिष्ठान, त्यातून तयार झालेली अनेक तीर्थक्षेत्रे व त्यांचे दर्शन घेतले जाते.

हे सर्व पाण्याबद्दलचा अतीव आदर व कृतज्ञता या पोटीच आले आहे. मानवाचे जीवन संपूर्णपणे नदीवर अवलंबून आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात सोबत असलेल्या नदीला मृत्यू व त्या पश्‍चात क्रियामध्येही मोलाचे स्थान आहे.

Water
Water Importance: जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला

कुंभमेळ्यातून शरीरशुद्धीपेक्षाही मन शुद्धी आणि त्यापुढे सदाचरणाचा संकल्प या बाबी पाण्याला साक्षी ठेवून केले जाते. राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी व तसेच मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा करताना अनेक नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्याची मंगल प्रथा भारतीय परंपरेत होती. तसेच आजही गावोगावच्या या जत्रेच्या वेळी ग्रामदेवतांना गंगेच्या पाण्याच्या अभिषेकासाठी नद्यांवरून पाणी अनवाणी पदयात्रेने आणले जाते.

मंदिरातून प्रसाद देण्यापूर्वी दिल्या जाणाऱ्या पाण्याचा मांगल्याचे उच्च प्रतीक मानून त्याला तीर्थ म्हटले जाते. विवाह आणि तशाच काही मंगलप्रसंगी मंगलाष्टकांमध्येही नद्यांचे व तीर्थांचे स्मरण केले जाते. माणसांच्या दहनानंतर नदीमध्ये अस्थिविसर्जन म्हणजे पुन्हा नदीशी एकरूप होऊन जाणे होय. या सर्व गोष्टीतून भारतीय परंपरेत जाणवणारे सर्वांत महत्त्वाचे जीवनमूल्य म्हणजे पाण्याला सर्वश्रेष्ठ आदर. तो दिला पाहिजे, हे आपल्यात रुजवले गेले आहे.

Water
Tur Import: मोझांबिकमधील निर्यातदारांना भारताला कितीही तूर निर्यात करता येईल; मोझांबिकमधील भारतीय उच्चायुक्तालयाचे आवाहन

तलावही तितकेच पूज्य ः
नद्यांप्रमाणेच तलावांलाही पूज्य मानले जाते. आपल्या देशात सात लाख खेडी असून, तलावांची संख्या तीस लाख होती. (२०१६ च्या निती आयोगाच्या अहवालानुसार तीसपैकी दहा लाख तलाव लुप्त झाले आहे. शिल्लक एकूण वीस लाख तलावपैकीही निम्मे तलाव कोरडे पडल्याची नोंद आहे. पूर्वी दरवर्षी या तलावांची देखभाल होत असे. गाळ काढणे, कचरा काढणे, काठ दुरुस्त करणे अशी कामे होत. त्यासाठी सगळा गाव श्रमदानाला येई. पावसाळ्यात तलाव पूर्ण भरल्यावर त्याच्या पाण्याचे पूजन होई.

दसऱ्यापूर्वी नवरात्राच्या काळात तलाव भरलेले आहेत किंवा कसे याची नोंदी घेतल्या जाते. त्यानुसार दसऱ्याला पाण्याच्या नियोजनाची चर्चा होऊन सर्वमान्यतेने त्या पाण्याचे नियमन होत असे. नवरात्रात घट बसवून व त्याला देवघरात स्थान दिले जाते. खरेतर ही तलाव आणि निसर्गाच्या एकूणच सृजनाची प्रतिकात्मक पूजाच असे. अक्षय तृतीया या उन्हाळ्याच्या शेवटी येणाऱ्या सणाच्या दिवशी जलकुंभाची पूजा करून या वर्षी पावसाळा येईपर्यंत पाणी पुरले याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाई.

यातील काही पूजा आजही बांधल्या जातात. मात्र त्यामागील कार्यकारणभाव सर्वांना माहिती असतोच असे नाही. तलावांना ‘सरस’ असेही म्हणतात. सरसच्या बाजूला राहते, वस्ती करते ती ‘सरस्वती’, देवी सरस्वतीजवळ हंसही दिसतो. तलावाच्या काठची प्रसन्नता ही ज्ञान प्राप्तीसाठी अतिशय अनुकूल, त्यामुळेच की काय सरस्वतीला ज्ञानाची देवता मानले जाते.

देवपूजेमध्ये वापरल्या गेलेल्या सर्व पवित्र वस्तू कायमच तशाच राहत नाहीत. फुले, हार वाळतात, सुकतात. त्याला ‘निर्माल्य’ म्हणतात. निर्माल्याचे विसर्जनही नदीच्या पाण्यातच केले जाते. त्यामुळे निर्माल्याची पवित्रता अबाधित राहत असल्याची आपली श्रद्धा आहे. भारतात कालगणना, अनेकविध गोष्टींचे संदर्भ व माहिती सांगणारे पंचांग मानले जाते. या पंचांगात पावसाची नक्षत्रे, पावसाचा कालावधी सांगितला जातो. प्रत्येक काळासाठी पावसाचे वाहन ही एखादा प्राणी असल्याचेही नमूद केले आहे.

डोळसपणे परंपरा जपणे आवश्यक ः
आपली संस्कृती व परंपरा अभिमान वाटाव्या अशाच आहेत. त्यावर गेल्या शेकडो वर्षांत या संस्कृती व परंपरावर ब्रिटिश वा अन्य राजवटीत फारशी बंधने आलेली दिसत नाहीत. पण तरीही या परंपरेतील आपल्याकडे काय शिल्लक राहिले आहे? त्यामागील विचार विसरलेली कर्मकांडे केवळ दिसतील. भलेही आपण सण, उत्सव साजरे करत असलो, अगदी नद्यांची आरती व वेगवेगळ्या पूजा, कलशाला नमन इ. करत असलो तरी त्यातील अनेक गोष्टी केवळ शाब्दिक मंत्रात किंवा प्रतिकात्मक स्वरूपात राहिलेल्या दिसतील. एकूण तीसपैकी केवळ दहा लाख तलावात पाणी शिल्लक राहिले आहे. पंधरा हजार नद्यांपैकी पाच हजार नद्या कायमस्वरूपी आटल्या आहेत.

जे तलाव वा नद्या शिल्लक आहेत, त्याही प्रदूषित करण्याची जणू प्रत्येक गाव, शहराची स्पर्धाच लागली आहे. आपण नद्यांमध्ये मानवी मलमूत्र, साबण आणि डिटर्जंटयुक्त पाणी, हजारो प्रकारची रसायने, वाटेल तो कचरा, मृत जनावरे, हॉस्पिटलचा अत्यंत धोकादायक कचरा असे वाटेल ते सोडत आहोत. नद्यांचे काठ हे तर हक्काच्या कचराकुंड्याच झाल्या आहेत. एकेकाळी माता सरस्वती व देवदेवतांचे स्थान असलेली ही ठिकाणे होती हेही आपण विसरून गेलो आहोत. पाण्याप्रतीचा आदर केवळ चर्चेत नको तर कृतीत व जीवनशैलीत उतरला पाहिजे.

सर्वश्रेष्ठ व्रतपालन ः
पाणी आणि निसर्ग संवर्धनासाठी आपल्या भारतातच उगम पावलेल्या जैन धर्माचे महाव्रत आपण सर्वांनी पालन करायचे ठरवले तर उपयोगी राहील, असे वाटते. जैन परंपरेत पंच महाव्रताचे पालन हेच सर्वश्रेष्ठ धर्मपालन आहे.
१) अहिंसा : सर्व प्रकारची हिंसा थांबवणे. आज अन्नासह विविध कारणामुळे वृक्षतोड, पशू, प्राणी यांची हत्या केली जाते. जलस्रोतांचे पाणी आटण्यामुळे अनेक जलचर मरतात. आपण करत असलेल्या पाणी प्रदूषणामुळे नामशेष होणारे जलचर हेही रोखले पाहिजे.
२) सत्य : पाऊस, पूर, दुष्काळ, अन्नसाखळ्या या सर्वांचा संबंध परस्परांशी आहे. यांची निर्मितीतील अतिप्राथमिक घटक म्हणजे पाणी व सर्व नैसर्गिक साधने ही मर्यादित आहेत. त्यावर सर्व माणसांचा व सजीवांचा सारखाच अधिकार असल्याचे सत्य मान्य करणे.
३) अस्तेय : दुसऱ्याचे द्रव्य न चोरणे. सर्व जण एकमेकांचे पाणी चोरतात. माणूस झाडाचे व प्राण्यांचे, भाऊ-भावाचे, श्रीमंत गरिबांचे, एक गाव दुसऱ्या गावाचे, शहरे खेड्यांचे पाणी चोरताना दिसतात. पाण्याचे समंजस व न्याय वाटप हेच आपले अस्तेय व्रत मानले पाहिजे असे मला वाटते.
४) अपरिग्रह : धनसंग्रह न करणे. इथे दैनंदिन वापराच्या असंख्य अनावश्यक वस्तूंही धन स्वरूपात मानून त्यांचा अनावश्यक वापर व संचय टाळला पाहिजे. कारण प्रत्येक वस्तू मग ती नैसर्गिक असो की कारखान्यात बनणारी, तिच्या निर्मितीला पाणी लागते. प्रत्यक्ष पाणी वापरापेक्षाही असा अप्रत्यक्ष पाणी वापर प्रचंड मोठा (हजारो लिटर पाणी प्रति मनुष्य) आहे. दृश्य पाण्याच्या बचतीसोबतच कमीत कमी वस्तूंचा वापर म्हणजेच खरी पाणीबचत होय. या अर्थाने अपरिग्रह व्रताचा विचार आवश्यक आहे.
५) ब्रह्मचर्य : याचा खरा अर्थ आत्म संयमन होय. वरील चारही व्रतांच्या आचरणासाठी आत्मसंयमन हे सर्वांत महत्त्वाचे.

अशा प्रकारे परंपरांचे पाईक झाल्यास आपण व पुढील समृद्ध होतील. अन्यथा अपुरे पाणी, प्रदूषित पाणी आणि त्यातून निकृष्ट जीवन सर्वांच्याच वाट्याला येण्याचा धोका टाळता येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com