Hailstorm : गारा का पडतात, गारपीट कशी मोजली जाते?

Climate Change : ढगाच्या गरम तळाशी असलेले पाण्याचे थेंब म्हणजेच भविष्यातील गार असते.
Hailstorm Forcast
Hailstorm ForcastAgrowon
Published on
Updated on

डॉ.प्रल्हाद जायभाये

भाग २ :

गारा म्हणजे बर्फाचा गर्भ आहे. ढगाच्या गरम तळाशी असलेले पाण्याचे थेंब म्हणजेच भविष्यातील गार असते. कारण हे थेंब ढगांबरोबर असतात.

उर्ध्वगामी प्रवाहाबरोबर अति उंचीवर हे पाण्याचे थेंब जातात आणि तेथे गोठण पावतात, त्यास बर्फाचा गर्भ अर्थात गार असे म्हणतात. अशा गोल आकाराच्या गारा, ५५ मायक्रोमीटर आकाराच्या असतात.

१) थंडरस्ट्रॉंम वातावरणीय स्थितीमुळे बर्फाच्या ढगांची निर्मिती होते. भूपृष्ठावरून अवकाशात अति उंचीवर वातावरणाच्या थरामध्ये सारखी घुसळण चालू असते. अशा स्थितीमध्ये जेव्हा ढगांची निर्मिती होते;

ज्या ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, हे ढग एकमेकांवर आदळतात. त्यामुळे घर्षण होऊन तेथे मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते, विजांचा कडकडाट होतो, आवाजाची निर्मिती होते. या ढगांमध्ये असणाऱ्या अतिशीत पाण्याच्या कणांचे एकमेकांबरोबर मिलन होते.

त्यामधून मोठ्या आकाराच्या बर्फासारख्या ढगांची निर्मिती होते. अशा स्थितीला हवामान शास्त्रीय भाषेमध्ये थंडरस्ट्रॉंम असे म्हटले जाते.

Hailstorm Forcast
Climate Change : गारपीट : हंगामी हवामान बदलाची प्रक्रिया

२) अशा वातावरणीय स्थितीमुळे ‘क्युमुलोनिंबस म्हणजेच कापशी वर्षा ढग' निर्माण होतात. या ढगांमधून मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि गारांचा वर्षाव भूपृष्ठावर होत असतो.

कापशी वर्षा ढगांपासून पडणाऱ्या अति शीत पाण्याच्या थेंबांचा सम्मुचय किंवा बर्फाच्या लहान लहान तुकड्यांचा पाऊस म्हणजे गारा होय. ज्यांचा आकार ५ ते ५० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असतो.

३) उत्तर ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश म्हणजे आर्टिक प्रदेश. येथील बर्फ वितळल्यामुळे, या ठिकाणी वारे निर्माण होतात. यास ‘ध्रुवीय जेट प्रवाह' असे म्हणतात. हे ध्रुवीय जेट प्रवाह दक्षिणेच्या दिशेने ३० अंश ते १५ अंश अक्षांश दरम्यान सरकतात.

यामुळे जागतिक स्तरावर तीव्र हवामान घटना किंवा हवामान आपत्तीच्या घटना अनुभवास येतात. भारतीय उपखंडावर ३० अंश ते १५ अंश अक्षांश दरम्यान, हे ध्रुवीय जेट वारे दक्षिणेच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात.

दुसरीकडे पश्चिमेकडून (अरबी समुद्रावरून) आणि पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून समुद्र मार्गे मध्य भारताकडे येणारे पश्चिमी वारे (वेस्टर्लीज) वाहतात. या पश्चिमी वाऱ्यांना ध्रुवीय जेट प्रवाह खाली भूपृष्ठाकडे ढकलतात.

यामुळे ध्रुवीय वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प पाणी असते. पश्चिमी वाऱ्यामध्ये उष्णता आणि दमटपणा अधिक असतो. परंतु याच दरम्यान मध्य महाराष्ट्रातील भूमीवर तापमान अधिक असते आणि हवा गरम असते.

४) पश्चिमेकडून येणारी वारे आणि भूपृष्ठावरील वारे हे वातावरणामुळे वर वर जातात. याच दरम्यान अतिशय थंड हवा आणि कमी तापमान असणारे बाष्पयुक्त वारे हे उत्तरेकडून म्हणजे ध्रुवीय जेट प्रवाहामुळे हिमालयाकडून येतात.

वातावरणामध्ये १० हजार ते ५० हजार फूट उंचीवर या वाऱ्यांची टक्कर होते. ध्रुवीय जेट वारे हे पश्चिम वाऱ्यांना खाली ढकलण्याचा प्रयत्न करतात, यामध्ये दोन्ही वारे एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया चालू होते.

यास हवामान शास्त्रीय भाषेत ‘थंडरस्ट्रॉंम' म्हणतात. अशा स्थितीमध्ये म्हणजेच कापसी वर्षा (क्युमुलोनिंबस क्लाऊड) तयार होतात. ज्यामधून पाऊस, पाऊस अधिक वारा, पाऊस, वारा आणि गारा या तीन अविष्कारापैकी कुठलाही आविष्कार अनुभवास येतो.

अशा प्रकारची वातावरणीय स्थिती मॉन्सून टापूत प्रदेशांमध्ये फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये तयार होते. परंतु विशेषतः भारत आणि महाराष्ट्राचा विचार करता फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने अधिक संवेदनशील असतात.

संद्रीभवनातून ढग निर्मिती :

भूपृष्ठाकडून वरती जाणाऱ्या हवेमुळे संद्रीभवन झालेल्या जलकणांचे ऊर्ध्ववहन होते. जसजसे वरवर जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते, या नियमानुसार उंचावर त्या जलकणांचे संद्रीभवन होऊन पुज तयार होतो.

त्याचे गोठण होऊन गारेमध्ये रूपांतर होते. हे खूप जड झाल्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर येऊन आढळतात.

गारपीट मोजण्याचे संयंत्र आणि एकक :

गारपिटीचे मोजमाप करण्यासाठी गारेचा आकार आणि त्याची तीव्रता मोजण्यासाठी हेल्पेड या उपकरणाचा वापर करतात. गारेचा आकार मोजण्यासाठी व्हर्नियर स्केल, मीटर स्केल पट्टीचा किंवा त्याच्या आकार वेगवेगळ्या आकाराचा वस्तू बरोबर जुळून घेतले जाते.

उदाहरणार्थ... वाटाण्याच्या आकार, आंब्याचा आकार, क्रिकेट बॉलचा आकार, टेनिस बॉलचा आकार, पैशांचा शिक्क्यांचा आकार.

Hailstorm Forcast
Crop Insurance : अवेळी पाऊस, गारपीट नुकसानीपासून विमा संरक्षण

गारपीट तीव्रता कमी करण्यासाठी करण्याचे तंत्र आणि यंत्र :

१) गारपिटीची घटना टाळण्यासाठी किंवा गारपीट तीव्रता कमी करण्यासाठी हवामान बदल विज्ञान तंत्रज्ञानाने आजपर्यंत खात्रीशीर सयंत्र किंवा तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेले नाही.

परंतु काही प्रमाणात प्रायोगिक तत्त्वावर क्लाऊड सीडींग आणि ॲन्टीहेलगन या तंत्रज्ञानाच्या साह्याने गारपीट तीव्रता कमी करता येऊ शकते, असा अमेरिका,युरोप, चीनमधील काही कंपन्यांनी दावा केला आहे. मात्र यामध्ये सत्यता किती ? हे मात्र सिद्ध करता आलेले नाही.

गारपिटीपासून पिकांचे संरक्षण तंत्र :

१) काही प्रमाणात गारपिटीमुळे होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. पारंपारिक शेती, जोड व्यवसायाचे काही प्रमाणात गारपिटीच्या आपत्तीपासून संरक्षण करणे शक्य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी हवामान आणि हवामान अंदाज साक्षर होणे गरजेचे आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, इंटरनेट, बुद्धिमत्ता, समाज माध्यम या अत्याधुनिक तंत्रांचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे.

२) शेती पद्धतीमध्ये आर्थिक गुंतवणूक करून भाजीपाला, फळ पिकाचे संरक्षित शेती पद्धतीमध्ये (शेडनेट, पॉलिहाऊस) रूपांतरित करणे शक्य आहे. काही ठिकाणी मजल्यांची शेती, हायड्रोपोनिक्स शेती , एक्वापनिक शेती, नायलॉन नेटचा अवलंब आवश्यक आहे.

गारपिटीनंतरचे पीक व्यवस्थापन :

१) अंशतः नुकसान झालेल्या पिकांमध्ये, गारपिटीनंतर नंतरच्या काळामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी तज्ज्ञांच्या सल्याने उपाययोजना कराव्यात.

२) फळ भाजीपाला पिके,फळ पिकांमध्ये जमिनीवर पडलेली पाने, फुले, फळांचा सडा उचलून शेताबाहेर न्यावा.

३) लहान, मोठ्या फांद्या मोडल्या असतील तर त्या कापून त्यावर बुरशीनाशकाची फवारणी करावी. फळपिकांमध्ये हलकी छाटणी करावी. रासायनिक खतांची मात्रा योग्य पद्धतीने द्यावी.

४) आंतर मशागतीची कामे करणे, विशिष्ट संजीवकाची फवारणी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास काही प्रमाणामध्ये गारपीटग्रस्त पिकांचे भविष्यात होणारे नुकसान टळू शकते.

५) पाळीव पशू-पक्षांना त्वरित पशू तज्ज्ञांना दाखवून प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

गारपिटीचा अंदाज गाव पातळीवर देणे शक्य आहे का?

१) सद्यःस्थितीत गाव पातळी, सर्कल पातळी किंवा तालुका पातळीवर गारपिटीचा अंदाज देणे शक्य नाही , आणि नजीकच्या काळातही शक्य होणार नाही, असे माझे मत आहे.

त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र हा विषुववृत्ताच्या अधिक जवळ असल्याने, या प्रदेशांमध्ये भूपृष्ठापासून वातावरणामध्ये वरच्या उंचीवर मोठ्या प्रमाणात तत्कालीन अल्पकालावधीसाठी फार मोठे बदल होतात.

याचा परिणाम म्हणून काही ना काही प्रमाणात भूपृष्ठावर त्याचे परिणाम झालेले दिसतात. याबाबत अनुमान देणे अतिशय अवघड बाब आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज देणे अतिशय अवघड असते.

२) कुठल्याही देशाच्या किंवा जागतिक हवामान संघटनेच्या माध्यमातूनही मॉन्सून टापूतील प्रदेशामधील अतिशय स्थानिक स्वरूपाचे गारा पडणे, वीज पडणे, अतिवृष्टीचे अंदाज देणे आवक्याबाहेरचे आहे. ही वातावरण शास्त्रीय गुंतागुंत, नैसर्गिक तांत्रिक बाब समजून घेणे आवश्यक आहे.

संपर्क : डॉ. प्रल्हाद जायभाये,७९८०६ ८४१८९, (कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com