Crop Stress Management : ताण सहन करण्यासाठी वसंत ऊर्जा फायदेशीर

Vasant Urja : वसंत ऊर्जा हा कवचधारी समुद्री जीवांपासून तयार केलेला जैवसुसंगत, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक घटक आहे. याच्या फवारणीमुळे हवामान बदलामुळे होणारे विविध ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढून उत्पादन वाढते.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

एस.एन.चव्हाणके, डॉ.एस.जी.दळवी
Vasant Urja Use : वसंत ऊर्जा हा कवचधारी समुद्री जीवांपासून तयार केलेला जैवसुसंगत, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक घटक आहे. याच्या फवारणीमुळे हवामान बदलामुळे होणारे विविध ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढून उत्पादन वाढते.

पिकांची अजैविक आणि जैविक ताण सहनशीलता वाढविण्यासाठी रासायनिक आणि सेंद्रिय निविष्ठांवर सखोल संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये बहुविविध ताणांसाठी पर्यायी निविष्ठा म्हणून कायटोसॅनयुक्त वसंत ऊर्जा निर्मितीबाबत संशोधन झाले आहे. वसंत ऊर्जा हा कवचधारी समुद्री जीवांपासून तयार केलेला जैवसुसंगत, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक घटक आहे. वसंतदादा साखर संस्था, पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र यांनी गॅमा किरणोत्साराचा मारा करून वसंत ऊर्जा हे नॅनोकण स्वरूपात तयार केले आहे.

१) पिकांमध्ये एकाचवेळी जैव-अजैविक ताणांविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते. रोगकारक विषाणू, जिवाणू, बुरशींना नुकसानकारक आहे. उपयोगी विषाणू, जिवाणू आणि बुरशींना फायदेशीर ठरते.
२) फवारणी किंवा आळवणीमुळे पिकांची शरीरांतर्गत संवेदना जागृत होऊन जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढतो. त्यामुळे पिकातील एकावेळी अनेक जनुके सक्रिय होऊन पिकांची ताणांप्रती लवचिकता वाढून अनिश्चित होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये पीक स्वतःला जुळवून घेऊन सशक्त बनते. पिकांचे जैविक घटक (उदा. बुरशी, जिवाणू आणि विषाणू) आणि अजैविक घटक (उदा. क्षार, वाढते तापमान/ ऊन, थंडी, पूर, दुष्काळ) यांपासून संरक्षण मिळते.
३) पानांची लांबी, रुंदी वाढून पानगळ कमी होते. पाने जास्त काळ कार्यक्षम राहतात. फळे आणि फुलांची संख्या वाढून जास्त काळ ताजी टवटवीत राहतात. एकूण हरितलवकांचे प्रमाण वाढून त्यांची क्रियाशीलता आणि स्थिरता वाढते, परिणामी प्रकाशसंश्लेषणची क्रिया वाढते.
४) ॲबसिसिक आम्ल आणि इथिलिन यासारखे घटक पानांमध्ये निर्माण होतात. ते पानांचे पर्णछीद्र बंद/ उघडणे नियंत्रित करतात, त्यामुळे बाष्पीभवन रोखले जाते. वनस्पतीच्या ऊतींमधील सापेक्ष पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हवामान बदलामुळे होणारे विविध ताण सहन करण्याची क्षमता वाढून उत्पादन वाढते.

Sugarcane
Kharif Crop : पाऊस नसल्याने पिकांना ताण

५) २०१८- १९ च्या भीषण दुष्काळ परिस्थितीमध्ये मराठवाडा विभागातील दहा सहकारी कारखान्यांमार्फत उसाच्या ५०० एकर क्षेत्रावर वसंत ऊर्जाच्या प्रात्यक्षिक चाचण्या घेण्यात आल्या. यात असे दिसून आले की, वसंत ऊर्जा न वापरलेला ऊस दुष्काळ परिस्थितीत वळून गेला. वसंत ऊर्जा वापरलेला ऊस दुष्काळी परिस्थितीमध्येही तग धरून होता. तसेच हेक्टरी २० टन वाढीव उत्पादन मिळाले.
६) वसंत ऊर्जाची बेणे प्रक्रिया/ बीज प्रक्रिया केली असता बीजांकुरण लवकर होते. बीजांकुरणाची टक्केवारी वाढते. कोंब सशक्त आणि जोरकस निपजतात. रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
७) फवारणीमुळे उत्पन्न वाढीसोबत साठवणूक क्षमता वाढते. एकदलीय आणि द्विदलिय पिकांमध्ये परिणामकारक आहे.
८) रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करण्यास आणि जैविक शेतीस प्रोत्साहक आहे. सूक्ष्मपोषक खतामध्ये वसंत ऊर्जा वापरली असता, खते हळूहळू मुक्त होतात, पिकांना योग्य प्रमाणात दीर्घकाळ मिळतात. यामुळे खतांचा ऱ्हास होत नाही.

Sugarcane
Soybean Verity : पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

वापरल्याचे परिणाम ः
१) ऊस कांड्यांची जाडी आणि लांबी वाढते. एकूण साखरेचे प्रमाण वाढते. उतारा चांगला मिळतो.
उसामध्ये विविध शारीरिक आणि जैवरासायनिक गुणधर्मांचे नियमन कार्यान्वित होते. त्यायोगे पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या ताणांच्या विरोधात विशिष्ट जैविक प्रतिक्रिया निर्माण होऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस तग धरून राहतो.
२) मुळांच्या वाढीसाठी संप्रेरके स्रवली जातात, त्यामुळे जमिनीतील पाणी शोषण्यासाठी अधिक खोलपर्यंत वाढतात. हरितकण आणि पेशी आवरणाची स्थिरता वाढते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा वेग नियंत्रित केला जातो.

३) सुरु उसाचे साधारणतः हेक्टरी २० ते २२ टन आणि आडसाली पूर्व हंगामात हेक्टरी २० ते ३० टन उत्पादन वाढते. पपई, टोमॅटो आणि वांगी इत्यादी पिकांवर विषाणूजन्य रोग नियंत्रणास प्रभावी आहे.
४) कोथिंबीर, मेथी, पालक, माठ, शेपू, कोबी, प्लॉवर इत्यादी पिकांवर फवारणी केली असता पानांतील हरित लवके वाढल्यामुळे पाने हिरवीगार आणि लुसलुशीत राहतात.
५) पिकावर पातळ थर तयार झाल्यामुळे भाज्या ताज्या राहतात, टिकवण कालावधी वाढतो. फळभाज्या जसे की टोमॅटो, वांगी, कारले, भेंडी, भोपळा, मिरची, कोहळा, सिमला मिरची, काकडी, दुधीभोपळा इत्यादी पिकांमध्ये फुले आणि फळांची संख्या वाढते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते. फळे पोखरणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव कमी होतो.
६) द्राक्ष, संत्री, डाळिंब, चिकू, केळी, इत्यादी फळझाडांवर वापर केल्यास फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आंब्यामध्ये मोहोर सशक्त आणि मोठ्या प्रमाणात येतो. फळांचा आकार वाढून आकर्षक चकाकी आणि रंग येतो.
७) हळकुंडातील मगज आणि कुरकुमीनचे प्रमाण वाढून हळद पिवळसर बनते.


जैविक आणि अजैविक ताणांपासून संरक्षण ः
१) वसंत ऊर्जा वापर आणि रोगकारक जिवाणू परस्पर संवादाच्या दरम्यान कायटिनेज, बीटा-ग्लुकनेज विकर, प्रथिने अवरोधक घटक पदार्थांचा प्राणवायूशी संयोग करणारे घटक, प्राणवायूशी संयोगविरोधी विकर, नायट्रिक ऑक्साईड, इथिलिन, सॅलीसिलिक आम्ल, जास्मोनिक आम्ल, ॲबसिसिक  आम्ल यासारखे घटक पिकांच्या पेशींमध्ये तयार होतात.
२) कायटिनेज आणि बीट- ग्लुकानेज विकर तयार होऊन ते जैविक आणि अजैविक ताणांविरुद्ध काम करतात. कायटिनेज विकर रोगकारक बुरशींवरील भिक्तिकांमधील कायटिन बहुलकांचे विघटन करून रोग नियंत्रण करते. रोगकारक सूक्ष्म जिवाणूंविरुद्ध पिकांची प्रतिकार क्षमता वाढते.
३) फवारणीमुळे बुरशीचे तंतू, बीजाणूवर पातळ थर बसतो. त्यामुळे अन्न आणि पाणी पुरवठा खंडित झाल्याने बुरशीची वाढ थांबते.
४) कायटिनेज प्रमाणे बीटा ग्लुकनेज विकर जिवाणू आणि बुरशींच्या पेशिभिक्तिकांमधील बीटा ग्लुकानेजचे विघटन करून अनेक रोगांपासून पिकांचे संरक्षण करतात. पेशीय वाढ आणि विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पेशी विभाजन/ पेशी भित्तिका, बियाणे विकास आणि उगवण, फळे, पुरुष जनपेशी आणि परागकण विकास यांचा समावेश होतो, तसेच अतिथंडीमध्ये रक्षक म्हणून काम करतात.
५) बीटा ग्लुकनेजमुळे वनस्पतीत स्रवली जाणारी प्रथिने, अवरोधक घटक हे रोगकारक जिवाणूंच्या पोटातील विकारांची चयापचनाची क्रिया थांबवतात.
६) कॅलोस स्रवून पेशींच्या छिद्रामध्ये जमा झाल्यामुळे विषाणूंचा प्रसार रोखला जातो.कायटीनेज आणि बीटाग्लुकनेज बुरशी आणि जिवाणू विरुद्ध काम करते. बीजांकुरण,पाने, फळांची वाढ तसेच अजैविक ताणाविरुद्धही महत्त्वाची भूमिका बजावतात.

वापरण्याची पद्धत ः
१) वसंत ऊर्जाची शिफारस कृषी विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन बैठकीमध्ये करण्यात आली आहे. तसेच एफसीओ कार्यालयात मान्यता प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जैवपरिणामकारकता परीक्षण चाचण्या मूग आणि ऊस पिकावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूर आणि कृषी विद्यापीठ, धारवाड अशा चार येथील विद्यापीठांमध्ये झाल्या आहेत.
२) कमी कालावधीच्या पिकांवर सुरवातीपासून १० ते १२ दिवसांच्या अंतराने आणि दीर्घ कालावधीच्या पिकांमध्ये महिन्यातून एकदा फवारणी करावी.
३) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. पिकांवर ३ ते ४ फवारण्या केल्यास उत्पादनात अधिक वाढ दिसून येते.
---------------------------------------------------------
संपर्क ः डॉ.एस.जी.दळवी, ९८२२८३४२४७
(ऊती संवर्धन विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी,जि.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com