
किरण देशमुख, डॉ. चिदानंद पाटील
Pest Control : एकात्मिक कीड नियंत्रणात कामगंध सापळ्यांचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. या सापळ्यांचा वापर करण्याच्या शास्त्रीय पद्धती, त्याचे तंत्र, फायदे व घ्यावयाची काळजी हे मुद्दे लक्षात आल्यास कीड नियंत्रण प्रभावी करणे शक्य होईल.
निसर्गात मानवाप्रमाणे कीटकही संवाद साधतात. विविध प्रकारचे रासायनिक गंध वातावरणात सोडून तसेच एखाद्या विशिष्ट कृतीतून ते एकमेकांशी संवाद साधतात. एकमेकांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना कामगंध किंवा प्रलोभन (फेरोमोन) असे म्हणतात. अन्न शोधण्यासाठी मदत किंवा भक्षकांपासून सावध करण्यासाठी देखील कीटकांकडून संदेश पाठविण्यात येतात.
किडींमधील या गंधांचा अभ्यास करून त्यासारखेच कृत्रिमरीत्या गंध (प्रलोभने) तयार करून त्याचा वापर किडीना आकर्षित किंवा नियंत्रण करण्यासाठी होतो. लिंगविषयक कामगंध सापळे हा प्रकार कीड नियंत्रणात जास्त प्रभावी असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे.
कामगंध सापळ्यांचा विविध कारणांसाठी वापर
१)कीड सर्वेक्षण (Monitoring)- :
पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात किडींचा प्रादुर्भाव आणि निरीक्षण करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर होतो. जास्त प्रमाणात पतंग सापळ्यात आढळल्यास किडीची आर्थिक नुकसानीची पातळी पाहून नियंत्रण करण्यासाठी विविध उपाय योजना करता येतात. सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी फक्त पाच सापळे लागतात.
२) मोठ्या प्रमाणात नियंत्रणासाठी (Mass trapping):
किडींचे प्रमाण जास्त असते अशा वेळी हेक्टरी १५ ते २० सापळे लावून मोठ्या प्रमाणात पतंग आकर्षित करून त्यांना नष्ट करता येते. यामुळे मादी आणि नर पतंगातील प्रजनन कमी होण्यास मदत होते. पुढील पिढी जन्मास येण्यापूर्वीच नियंत्रण होते.
.
३)मिलनास अडथळा (Mating disruption):
हे तंत्र काही विशिष्ट कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित केले आहे. यामध्ये जास्त प्रमाणात कामगंधाचा वापर करून नर पतंगास कामगंधाने भ्रमित करण्यात येते. त्यायोगे मादी पतंगासोबत मिलन करण्यापासून दूर ठेवण्यात येते. अशा प्रकारे पुनरुत्पादन चक्र रोखले जाते.
कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी
-पिकानुसार सापळे आणि ल्यूर खरेदी करावेत.
- ल्यूर वापरण्यापूर्वी आमिषाची कालबाह्यता तारीख तपासावी.
-सापळ्याची उंची ही पिकापेक्षा जास्त किंवा पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर असावी.
-दोन सापळ्यामध्ये कमीत कमी ५० मीटर अंतर ठेवावे.
-सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकासाठी हेक्टरी पाच तर पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे वापरावेत.
-सापळे बसविताना ल्यूर सोबत थेट संपर्क टाळावा, हातमोजे वापरावेत.
-जास्त पतंग आकर्षित करण्यासाठी २० दिवसांनी किंवा ल्यूरच्या रॅपरवर दिलेल्या कालावधीनुसार ते बदलावे.
-ल्यूर हाताळण्यापूर्वी आणि त्यानंतर हात धुवावेत.
-सापळा लावल्यानंतर त्यावर विशिष्ट प्रकारच्या किडीचे नाव, तारीख लिहावी.
-पीक शाखीय वाढीच्या अवस्थेत असताना सापळा लाऊन त्यात ल्यूर बसवावे. जेणेकरून किडी सापळ्यामध्ये आकर्षित होऊन त्याच्या आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात येते.
उदा. कपाशीत लागवडीनंतर एक ते दीड महिन्यांनंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. सर्वेक्षणासाठी लागवडीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावेत.
- त्याचा वापर झाल्यानंतर रॅपर्स, कव्हर्स यांची योग्य विल्हेवाट लावावी.
-सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा. ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील.
सापळे वापरण्याचे फायदे
-कीड सर्वेक्षणासाठी वापर केल्यास किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लवकर माहीत होते. योग्य वेळी नियंत्रण करता येते.
-प्रदूषण मुक्त व पर्यावरणीयदृष्ट्या उपयुक्त.
-मोठ्या प्रमाणात पिकास हानिकारक असणाऱ्या पतंगास आकर्षित करण्यासाठी अगदी कमी प्रमाणात कामगंध रसायन लागते.
-मित्र किटकास मानवी आरोग्य, पशू- पक्षी, पर्यावरणावर परिणाम होत नाही.
-कमी खर्चिक आणि वापरण्यास सोपे.
-रासायनिक कीडनाशकांप्रमाणे किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होण्याचा धोका नसतो.
-फवारणी खर्च कमी होतो.
किडींच्या सर्वेक्षणासाठी किंवा नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर आपण करतो. परंतु काहीवेळा कमी प्रमाणात पतंग आकर्षित झालेले दिसतात किंवा अपेक्षित परिणाम मिळत नाही. यासाठी खालील घटक कारणीभूत असतात.
-शत्रुकिडीच्या प्रजातींचे जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र
-नर पतंगांची विशिष्ट कामगंधासाठी असलेली संवेदनशीलता
-ल्यूरची रासायनिक वैशिष्ट्ये
-भौतिक वातावरणाचा प्रभाव उदा. अधिक तापमान, अतिवृष्टी आदी.
-दोन सापळ्यांमधील अंतर, सापळ्यांचा प्रकार व सापळा लावण्याची पद्धत
कीडनिहाय कामगंध प्रलोभने
किडीचे नाव ल्यूर पिके
१)गुलाबी बोंडअळी पेक्टीनोल्यूर कापूस
२) ठिपक्यांची बोंडअळी इरविटल्यूर कापूस, भेंडी
३) अमेरिकन
बोंडअळी वा घाटेअळी हेलील्यूर ---सूर्यफूल, कापूस, वांगी
४) स्पोडोप्टेरा लिट्युरा स्पोडोल्यूर ---- कापूस, मिरची, सोयाबीन
५)फळ माशी क्युल्यूर ------भाजीपाला पिके
६) फळ माशी मिथिल युजेनॉल ------फळपिके
७)डायमंड बॅक मॉथ डीबीएम ल्यूर --- कोबी, फ्लॉवर.
८)लष्करी अळी
(स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) एफएडब्ल्यू ल्यूर lure) ---- मका
९)फळ व शेंडा पोखरणारी अळी ल्युसीन ल्यूर ---- वांगी
श्री. देशमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
येथे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. तर डॉ. पाटील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक व
कीटकशास्त्र विभाग प्रमुख आहेत.
संपर्क- किरण देशमुख- ७७०९८११६१३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.