
Agriculture Update : सध्या सर्वत्र पसरणारे ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेला पाऊस ही हवामान स्थिती आंबा पिकाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. मुळातच या वर्षी उशिरापर्यंत झालेला पाऊस, पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत अधिक काळ टिकलेली ओल ही स्थिती होती. त्याला नोव्हेंबरमध्ये पडलेली थोडीफार थंडी पडते न पडते तोच पुन्हा झालेले ढगाळ वातावरण व पावसाळी स्थिती या सर्व हवामान घटकांचा फटका पिकाला बसताना दिसतो.
काही ठिकाणी दोन-तीन दिवसात पाऊस झाल्याचे समजते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आंबा बागांमध्ये मोहर येण्यासंदर्भात फटका बसताना दिसतो. ज्या बागांमध्ये पॅक्लोब्युट्राझोल या वाढनियंत्रकांचा वापर केला होता, त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी म्हणजे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत मोहर आलेला आहे.
आता राहिलेला मोहर येण्यास सुरुवात होत असतानाच जागोजागी तयार झालेले ढगाळ वातावरण आणि औरंगाबादसारख्या ठिकाणी पाऊस यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेली थंडी कमी झाली. परिणामी राहिलेला मोहर कितपत बाहेर पडणार, याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली भीती काही प्रमाणात खरीही आहे. कारण आंबा बागेत ढगाळ वातावरण असल्यास कार्बन नायट्रोजन प्रमाणांपैकी नत्राचे प्रमाण वाढते, तर कार्बोहायड्रेटचे कमी पडते. त्यामुळे मोहर निघण्याऐवजी त्या डोळ्यातून नवतीच बाहेर पडते. बऱ्याच वेळा नवती आणि मोहर यांच्यामध्ये स्पर्धा होऊन त्यात जिंकणारा बाहेर येतो. म्हणजेच या स्थितीमध्ये मोहर बाहेर पडला तरी त्यात बारीक पाने निघतात.
मोहर जरा बऱ्यापैकी बाहेर पडल्यास ती पाने गळून पडतात. मात्र या प्रक्रियेमध्ये पाने ताकतवान असल्यास मोहर कमकुवत होतो. असा कमकुवत मोहर बाहेर पडल्यानंतर गळून जातो. पानेच शिल्लक राहतात. मोहराला ताकद देण्यासाठी नवतीवर नियंत्रण आणणे गरजेचे असते. त्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराइड या वाढ नियंत्रकाची दीड ते दोन मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी घ्यावी.
त्यासोबत १३-०-४५ या विद्राव्य खतांची १५ ते २० ग्रॅम प्रति लिटर (दीड ते दोन टक्के) या प्रमाणे फवारणी घेतल्यास फायदा होतो. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण मोहर बाहेर पडणे गरजेचे असते. त्यामुळे एप्रिलमध्येच अन्य फळे बाजारात येण्यापूर्वी फळे काढणीस येतात. आता डिसेंबरचा पहिला आठवडाही संपला असून बागेतील मोहराच्या स्थितीनुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे.
एकदा संपूर्ण मोहर बाहेर पडल्यानंतर थोडेफार ढगाळ किंवा पावसाळी वातावरण चालून जाते. त्यामुळे कमी झालेली थंडी मोहराच्या परागीकरणासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्या बागांमध्ये सध्या संपूर्ण मोहर बाहेर पडलेला आहे, अशा ठिकाणी परागीकरण चांगल्या प्रकारे होऊन फळाचा आकार वाढण्यास मदत होईल. फक्त या काळात भुरी रोग व तुडतुड्यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यापासून मोहर आणि पुढील फळ अवस्थांचे संरक्षण करण्यासाठी फवारणीचे नियोजन करावे.
मोहरावरील तुडतुडे नियंत्रणासाठी फवारणी प्रति १० लिटर पाणी
थायामेथाक्झाम तीन ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड तीन मि.लि.
भुरी नियंत्रणासाठी, ॲझोक्सिस्ट्रॉबीन (२३ टक्के एससी) १० मि.लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे) २५ ग्रॅम.
टीप ः तुडतुडे आणि भुरी यासाठीची ही रसायने एकमेकासोबत वापरता येतात. त्याच्या आठ ते दहा दिवसाच्या अंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक बदलून आलटून पालटून दोन फवारण्या घ्याव्यात.
आताचे ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिल्यास, मोहर उमलणाऱ्या बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगामुळे परागीकरण होऊन फळ सेटिंग होण्याऐवजी संपूर्ण मोहर काळा पडतो. त्यानंतर तो गळून पडतो. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.
मोहर उमलण्याच्या काळात बागेमध्ये मधमाश्यांचा वावर वाढतो. त्यांच्यामुळे परागीभवन चांगल्या प्रकारे होऊन फळांची सेटिंग होत असते. त्यामुळे मोहर उमलत असलेल्या बागांमध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. अगदीच गरज भासल्यास किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यासाठी निंबोळी अर्क (ॲझाडिरॅक्टिन १० हजार पीपीएम) एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करू शकतात. या वनस्पतिजन्य कीडनाशकामुळे मधमाश्यांवर फारसा परिणाम होणार नाही.
विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे बागेत पाणी व खतांचे व्यवस्थापन करावे. त्याचा फायदा फळांच्या वाढीसाठी होतो.
- डॉ. भगवानराव कापसे, ८३२९६७६८७१
(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.