
Mango Production : विविध कारणांमुळे आंब्याची फळगळ होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन कराव लागत. आंब्यातील फळगळ रोखण्यासाठी महत्वाचे पाच उपाय जर केले तर फळगळीवर नियंत्रण मिळवता येत.
उपाय १ : संजिवकाचा वापर
आंब्यातील फळगळ रोखण्याचा पहिला उपाय आहे संजिवकाचा योग्य वापर
सेटिंग झाल्याबरोबर जिबरेलिक ॲसिड हे संजिवक ५० पीपीएम म्हणजे एक ग्रॅम जिबरेलिक ॲसिड प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यानंतर युरिया दोन टक्के म्हणजे २० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी घेणं फायदेशीर राहतं.
आंबा फळे बाजरी ते वाटाण्याच्या आकाराची झालेली असतानाच्या काळातच वातावरणातील तापमान वाढण्यास सुरू होते. अशावेळी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड हे संजिवक२० पीपीएम म्हणजे दोन ग्रॅम अधिक युरिया दोन टक्के म्हणजे २ किलो युरिया अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तापमानाच्या अंदाजानुसार बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात.
उपाय २ : पाटपाणी
फळगळ रोखण्याचा दुसरा उपाय आहे पाट पाणी देणे.आंबा बागेत जरी ठिबक सिंचनाची सोय केली असली तरी फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये बागेतील तापमान हे ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन ते तीन पाट पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक ची सोय असेल तरीही पाटाने मोकळे पाणी दिल्यास बागेतील आर्द्रता वाढून तापमान कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे तापमानाच्या ताणामुळे गळणारी लहान फळे झाडावर टिकून राहतात. साधारणपणे लिंबाच्या आकाराच्या फळांमध्ये उन्हाचा चटका आण जास्तीचे तापमान सहन करण्याइतपत ताकद आलेली असते. बागेमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार बाग नेहमी वाफसा स्थितीमध्ये राहील, असे सिंचन व्यवस्थापन करावे.
उपाय ३ : पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी
फळगळीसाठी तिसरा महत्वाचा उपाय आहे पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी.याच काळामध्ये बागेमध्ये पोटॅशिअम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून एक ते दोन फवारण्याचं नियोजन करावं. माती परीक्षणानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही त्यासोबत करू शकता. बहुतांश काळ्या आणि भारी जमिनीमध्ये पिकाला जस्ताची कमतरता भासते. अशा जमिनीमध्ये झिंक सल्फेट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापर करू शकता.
उपाय ४ : वारा प्रतिबंधक झाडांची लागवड
फळगळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करण हा चौथा उपाय आहे.नवीन लागवड करणाऱ्या बागायतदारांनी फळाचं उन्हाचे चटके आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करून घ्यावी. लागवड जर केली नसेल तर वाराप्रतिबंधक म्हणून शेडनेट, गवताचे किंवा बांबूचे तट्टे याचा वापर करता येईल.
उपाय ५ : आंतरमशागत
फळगळ नियंत्रणासाठी करायचा पाचवा उपाय म्हणजे सध्या लहान फळे असलेल्या स्थितीमध्ये बागेत आंतरमशागत करणे प्रकर्षाने टाळावे, अन्यथा झाडांच्या मुळांना इजा होऊन फळांची गळ वाढू शकते. याशिवाय भुरी व करपा या रोगांच्या किंवा तुडतुडे, फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत वेळापत्रकानुसार आणि प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन करावे. अशा प्रकारे फळगळ नियंत्रणासाठी उपाय केल्यास आंब्यातील फळगळ रोखली जाऊन आंब्याचं चागल उत्पादनात मिळवता येईल.
----------
माहिती आणि संशोधन - निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे
--------
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.