Chana Cultivation : हरभरा लागवड व्यवस्थापनाची सप्तसूत्री

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण दाळवर्गीय पीक असून, भारतात त्याची कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वाधिक लागवड होते. या पिकाच्या लागवड व्यवस्थापनाची सात सूत्रे जाणून घेतल्यास उत्पादनामध्ये शाश्‍वत वाढ शक्य होते.
Chana Sowing
Chana SowingAgrowon

सूत्र १ ः वाणांची निवड व पेरणी पद्धत :

-कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभऱ्यासाठी विजय, दिग्विजय, राजविजय-२०२, राजविजय-२०४, जाकी, साकी, आयसीसीव्ही-१०, पीकेव्ही कांचन (एकेजी -११०९), फुले विक्रम, बीडीएनजी-७९७ (आकाश), फुले विक्रांत, विश्‍वराज या देशी किंवा सुधारित वाणांची शिफारस करण्यात आली आहे. (Chana Varients) याकरिता वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा,

तर संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करता येते. अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी बीटी कपाशीचे शेत रिकामे झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंतही ओलिताखाली हरभऱ्याची पेरणी (Chana Sowing) शेतकरी करताना दिसतात. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे त्याचा फायदा कोरडवाहू लागवडीसाठी होऊ शकतो.

Chana Sowing
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

-ओलिताखालील काबुली हरभऱ्यासाठी विराट, आयसीसीव्ही-२ (श्वेता), पीकेव्ही काक-२, पिकेव्ही काबुली-४, फुले कृपा, बीडीएनके- ७९८ या टपोऱ्या दाण्यांच्या वाणांची शिफारस केली जाते. वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा, तर उशिरा पेरणीसाठी संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत पेरणी करता येते.

-हिरव्या रंगाचे बियाण्याचे टरफल असलेले पीकेव्ही हरिता (एकेजी-९३०३-१२), हिरवा चाफा, एकेजीएस-१ हे वाण सुद्धा लागवडीसाठी शिफारशीत आहेत. तसेच गुलाबी रंगाचे बियाण्याचे टरफल असलेले गुलक -१ व डी-८ हे मध्यम टपोरे दाणे असलेले वाणसुद्धा शिफारशीत आहेत.

Chana Sowing
Chana Cultivation : हरभरा लागवडीचे सुधारित तंत्र

- शिफारशीनुसार देशी (सुधारित) हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर ३० सें.मी. x १० ते १५ सें.मी. एवढे राखावे. याकरिता बियाण्याच्या आकारानुसार एकरी ३० ते ४० किलो बियाण्याचा पेरणीसाठी वापर करावा. याद्वारे एकरी दीड लाखापर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.

-शिफारशीनुसार काबुली हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर ४५ सें.मी. × १० सें.मी.एवढे राखावे. याकरिता बियाण्याच्या आकारानुसार एकरी ४० ते ५० किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी एक लाखापर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.

-हरभरा पिकाचे काही नवीन वाण अधिक उत्पादक्षम आहेत. या वाणांसाठी पेरणीचे दोन ओळींतील अंतर दोन ते सव्वा दोन फुटांपर्यंत वाढविल्यास व दोन झाडातील अंतर सारखेच ठेवून (१० ते १५ सें.मी), उत्पादकतेत शाश्‍वत व हमखास वाढ शक्य होते.

सूत्र २ ः कमी उगवण टाळणे -

कोरडवाहू अथवा बागायतीमध्ये हरभरा पिकाची कमी उगवण ही समस्या दिसते. त्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या कमी राहून मोठे नुकसान होते.. हे टाळण्यासाठी पुढील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे.

-ट्रॅक्टरद्वारे हरभरा पेरणीवेळी बियाणे कमी, जास्त खोलीवर पेरले जाते. बियाणे उथळ पडल्यास वरच्या थरातील कमी ओलीमुळे अर्धवट अंकुरण होऊन कमी उगवणीचा धोका असतो. त्यामुळे पेरणीची खोली योग्य (म्हणजेच ६ ते ८ सें.मी.) राखावी.

-ओलिताची व्यवस्था असल्यास स्प्रिंकलरच्या साह्याने संपूर्ण शेत ओलावून घ्यावे. योग्य वाफसा आल्यानंतर ट्रॅक्टर अथवा बैलजोडीचलित पेरणीयंत्राने पेरणी करावी. अनेक जण शेत तयार केल्यानंतर कोरड्यामध्ये हरभरा पेरणी करतात. त्यानंतर स्प्रिंकलरने ओलीत करतात. यामुळे कमी अथवा जास्त पाणी दिले गेल्यास उगवण कमी होते, अथवा बियाण्याला बुरशी चढते. त्यामुळे योग्य व एकसमान उगवणीसाठी आधी ओलित देऊन वाफसा आल्यानंतर हरभऱ्याची पेरणी करणे योग्य ठरते.

सूत्र ३ ः उगवणीवेळी होणारी कतरण :

पीक उगवणीच्या अवस्थेत उडद्या कीड/ भुईकीडा/ काळी म्हैस यांचा प्रादुर्भाव होतो. याला शेतकरी कतरण म्हणतात. अलीकडे गर हंगामात ही समस्या वाढत असून, हरभरा पिकाचे मोठे नुकसान होते. त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.

-ओलिताची सोय असल्यास, आधी ओलीत करून वाफशावर शेत आल्यानंतर पेरणी करण्याची पद्धत येथे उपयोगी ठरते. आधी ओलीत केल्यामुळे जमिनीत मातीखाली लपलेले कीडे गाडले जात असल्यामुळे प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

-पेरणी करतेवेळी अथवा शेतात रोटाव्हेटर करण्यापूर्वी क्लोरफायरिफॉस अथवा कारटॅप हायपोक्लोराइड यापैकी दाणेदार कीटकनाशकाचा एकरी ४ ते ५ किलो या प्रमाणे वापर करावा.

-पेरणीनंतर उगवणीपूर्वी साधारणत: २ ते ३ दिवसआधी अथवा पीक रोपटे अवस्थेत असताना सुरुवातीची अवस्थेमध्ये क्लोरपायरिफॉस २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे नोझलला प्लॅस्टीकचे हूड लावून जमिनीलगत दाट फवारणी करावी. विशेषतः दरवर्षी हरभरा पिकावर कतरण समस्या उद्‍भवत असलेल्या शेतामध्ये ही उपाययोजना प्रतिबंधात्मक (म्हणजे प्रादुर्भावाआधीच) केल्यास नुकसान कमी राहते.

सूत्र ४ ः मूळ सडमुळे रोपटे अवस्थेतील झाडे सुकणे :

१७ ते २२ दिवसांचे हरभरा पीक रोपावस्थेत (साधारणत: १२ ते १५ पानांच्या अवस्थेत) असताना झाडे अचानक सुकू लागतात. त्यांची तपासणी केली असता रोपट्यांची मुळे कुजलेली आढळतात. यालाच ‘मुळसड’ म्हणतात. ही समस्या उद्‍भवलेल्या शेतामध्ये पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.

- पेरणीपूर्वी साधारणत: अर्धा ते एक तास आधी ट्रायकोडर्मा ५ ते १० मिलि प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतरच पेरणी करावी.

- पेरणीचा क्रम असा असावा. १) जमीन तयार करणे. २) स्प्रिंकलरच्या साह्याने ओलीत करणे. ३) जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पेरणी करणे.

- कतरणसाठी क्लोरपायरिफॉसची फवारणी करतेवेळी त्यासोबतच कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अथवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अथवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे कोणतेही एक बुरशीनाशक मिसळावे.

सूत्र ५ ः हरभरा मोसोंडणे (अवास्तव वाढ टाळणे) :

पाणथळ अथवा पानबसन जमिनीत हरभरा पिकाची लागवड, ओलिताचे चुकीने व्यवस्थापन, बागायतीमध्ये युरियाचा अवाजवी वापर अशा कारणामुळे हरभरा पिकाची अवास्तव वाढ होते. त्यामुळे उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी ओलीत व्यवस्थापन करताना, पेरणीपूर्वीचे ओलीत व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलीत द्यावे. स्प्रिंकलरचा वापर करताना जमिनीच्या प्रकारानुसार आणि ओलीची स्थिती पाहून पाण्याच्या पाळीची वेळ ठरवावी. म्हणजेच स्प्रिंकलर किती वेळेसाठी लावायचे, हे ठरवावे. अन्यथा बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यानंतर गरज भासल्यास घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. या वेळी सुद्धा जमिनीतील ओलीनुसार निर्णय घ्यावा. निंदणीच्या काळात महिला मजूर भाजीसाठी झाडांचे शेंडे खुडून घेतात. असे शेंडे खुडल्यामुळे अवास्तव वाढ टाळता येते. अथवा पेरणीपासून साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी मशिनच्या साह्याने पिकाचे शेंडे छाटून घ्यावेत.

सूत्र ६ ः घाटे अळीचा प्रादुर्भाव :

हरभरा पिकावर घाटेअळी ही मोठी समस्या ठरते. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिकाचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.

- हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी, पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट अधिक उंचीचे पक्षिथांबे एकरी १२-१५ प्रमाणात उभारावेत. याकरिता साधारणत: ५.५ ते ६ फूट लांबीच्या काठीला एका बाजूने टोक काढावे. दुसऱ्या बाजूला १.५ ते २ फूट लांबीची काठी आडवी पक्की बांधावी. जुन्या काळातील टीव्हीच्या ॲन्टेनाप्रमाणे पक्षिथांबे दिसतात. त्यावरून पक्षी घाटे अळीचा फडशा पाडतात.

- पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी (साधारणत: ७ ते १० दिवस आधी) शेतात कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये घाटे अळीच्या हेलील्युअरचा वापर करावा. ल्युअर खाचेमध्ये लावताना त्याला बोटांचा स्पर्श होऊ देऊ नये. पाऊच फोडून ल्युअरचा नरम भाग अंगठा व पहिल्या दोन बोटांच्या चिमटीत पकडून खाच्यात लावावा. रिकामा पाऊचसुद्धा कामगंध सापळ्याच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकावा.

-पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी ७ ते १० दिवस आधी हरभरा पिकावर निंबोळी अर्क ५ मिलि किंवा ॲझाडिक्टीन (१००० पीपीएम) ३ ते ५ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी केल्यास घाटे अळीचे पतंग शेतात अंडी घालण्यासाठी कमी वळतात किंवा येत नाहीत.

- घाटे अळी नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घाट्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत करावी.

सूत्र ७ ः घाटे पक्वता अवस्थेत पिकात खरगे पडणे -

पीक घाटे अवस्थेत असताना ठरावीक भागातील झाडे अचानकपणे कोमेजून सुकायला लागतात. यालाच अनेक जण ‘खरगे पडणे’ असे म्हणतात. असे दिसल्यास आधी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना त्यात मँकोझेब २.५ ग्रॅम अथवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अथवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळावे.

००००००००००००००००००००००

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

(सहयोगी प्राध्यापक -कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com