Biodiversity : ‘पीबीआर’मधील जलस्रोतांच्या नोंदी

जलप्रदूषण, भूगर्भातून उपसा आणि नद्या नाल्यावरील अतिक्रमण या बाबींमुळे जलस्रोत खालावत चालले आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या या जलस्रोतांचा पुनर्स्थितीत आणणे काळाची गरज आहे. जलस्रोत सुधारणा करणे, नद्या, नाले, ओढे इत्यादी अतिक्रमणाच्या आणि प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवणे आपले कर्तव्य आहे.
Water Resourcesc
Water ResourcescAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुमंत पांडे

पीबीआर (लोकांचे जैवविविधता नोंदवही) (Public Biodiversity Record) तयार करताना अभ्यास क्षेत्रातील जलस्रोतांच्या अचूक नोंदी करणे गरजेचे आहे. महानगरपालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वापर होत असलेल्या जलस्रोतांचा संपूर्णपणे अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवणे अगत्याचे आहे. हा अधिकृत शासकीय दस्तऐवज आहे.

वाढते नागरीकरण, बदललेली जीवनशैली, पीक पद्धतीतील (Crop Diversification) बदल यामुळे मातीची धूप वाढली आहे. परिणामी शेतीची उत्पादकता घटत आहे. त्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. जलप्रदूषण, भूगर्भातून उपसा आणि नद्या नाल्यावरील अतिक्रमण या बाबींमुळे जलस्रोत खालावत आहेत. गाव क्षेत्रातून जाणाऱ्या नद्या-नाले, तलाव तळी, विहिरी, बोअरवेल इत्यादी जलस्रोतांची अवस्था अत्यंत बिकट आहे. हे जलस्रोत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यांना पुनर्स्थितीत आणणे काळाची गरज आहे.

Water Resourcesc
Biodiversity : जैवविविधता नोंदींतून हरित रोजगार

साताऱ्याच्या लिंब येथील बारा मोटेची विहीर तसेच सेलू येथील बारव या सारख्या अनेक विहिरी, कुंड, बारवा, तलाव इत्यादी सारखे जलस्रोत काही शतकापूर्वी, दशकापूर्वी निर्माण करण्यात आले आहेत. सातवाहन चालुक्य याच्या काळामध्ये पाण्यावर केलेले काम हे अद्वितीय आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले काम तर सर्व विश्‍वात प्रसिद्ध असून आजही अत्यंत उपयुक्त आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे ४० ते ५० वर्षांच्या कालावधीनंतर पाण्याची उपलब्धता नळांच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच सिंचनासाठी तलावातून पाणी उपलब्ध करून घेणे तसेच भूगर्भातून पाणी उपसण्याचे तंत्र अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. परिणामी हजार, बाराशे, पंधराशे फुटांपासून पाण्याचा सहजरीत्या उपसा होऊ लागला. तसेच हे पाणी दूरवरच्या क्षेत्रामध्ये नेणे सहज शक्य होऊ लागले.

तथापि, या चढाओढीमध्ये जलस्रोतांची मात्र वाताहत झालेली आढळते. गावातील पाणलोट क्षेत्रामध्ये असणारे नदी-नाले, ओढे, तलाव, तळे, सरोवर इत्यादी जलस्रोत अतिक्रमण किंवा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. मागील तीन दशकांमध्ये या बाबींमध्ये आणखी भर पडलेली आढळते. पुण्याजवळील रामनदी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

जलस्रोत सुधारणा करणे, नद्या, नाले, ओढे इत्यादी अतिक्रमणाच्या आणि प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवणे आपले कर्तव्य बनते. यासाठी जलस्त्रोतांच्या नोंदी, त्यांच्या चतुर्सिमा, पाणी साठवण्याची क्षमता आदी बाबींच्या नोंदी ठेवणे तसेच पुराबाबत, दुष्काळाबाबतच्या माहितीची नोंद ठेवता येतील. ही माहिती कायदेशीर दस्तऐवज आहे.

Water Resourcesc
Agriculture Biodiversity : कृषिजैवविविधता अन लोकजीवनाच्या नोंदी

जलस्रोतांच्या नोंदीची पूर्वतयारी ः

- जैवविविधता व्यवस्थापन समिती तसेच समितीसोबत माहिती घेणारी गावातली जाणकार मंडळी यांच्या गटाने नोंदी करण्यापूर्वी प्रत्यक्ष गावफेरी, शिवारफेरी करून गावाच्या क्षेत्रातील जलस्रोतांबाबत सविस्तर माहिती घ्यावी.

- संबंधित ठिकाणचा नकाशा सोबत घेऊन त्यात सर्व नोंदी (येथे अक्षांश आणि रेखांश) त्यांचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी, रुंदी, खोली तसेच जलधारणक्षमता आदी बाबींची नोंद करावी.

- जलस्रोतात वर्गीकरण करता येईल अशा स्रोतांची आधीच माहिती घेऊन नोंदणी केल्यास सोयीचे होईल. उदा. एका प्रमुख नदीची उपनदी गावातून उगम पावते आणि ती पुढे प्रमुख नदीस मिळते. तर त्या उपनदीच्या गावातील उगम स्थळापासून गाव हद्दीमध्ये प्रमुख

नदीस मिळणाऱ्या अंतराबाबत तसेच दोन्ही नद्यांच्या तटांवर असलेली विविध झाडेझुडपे आदींबाबत माहिती घेऊन नोंदी कराव्यात.

- ओढा अथवा नाला यांची सर्वसाधारणपणे रुंदी, एकूण लांबी. पावसाळ्यामध्ये पूर आल्यास किती दिवस पाणी राहते आणि वर्षभर कोणत्या महिन्यापर्यंत पाणी राहते, या गोष्टींच्या नोंदी आधी करणे गरजेचे आहे.

ही पूर्वतयारी झाल्यानंतर पीबीआर’च्या महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने पुरवलेल्या नोंदणी पत्रकात ही माहिती अगदी अचूक भरावी.

Water Resourcesc
Biodiversity : जैवविविधता संवर्धनामध्ये नोंदीचे महत्त्व

प्रत्यक्ष नोंदणी पत्रकात माहिती भरणे ः

- रकाना क्रमांक एकमध्ये या जलस्रोतांचा प्रकार लिहावा (ओढा, नाला तलाव, सरोवर, नदी, विहीर बारव इत्यादी).

- त्यानंतर त्याचा उपप्रकार कोणता (यात स्थानिक नाव).

- त्यापुढील रकान्यात त्याच्या क्षेत्रफळाची नोंद करावी. यासाठी गुगल मॅप किंवा भुवन नकाशा यांची मदत घेता येईल. काही नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आहेत. त्यांच्या मदतीने या जलस्रोतांची अचूक लांबी-रुंदी मोजता येईल. ही नोंद व्यवस्थित रकान्यात करून ठेवावी.

- त्या पुढील रकान्यात या जलस्त्रोतांच्या मालकी हक्काबाबतची माहिती द्यावयाची आहे. या मालकी हक्कामध्ये खासगी, शासकीय, धार्मिक संस्था अशी माहिती असावी. या नोंदी करण्यापूर्वी ऐकीव माहितीवर विसंबून राहण्याऐवजी प्रत्यक्ष त्याच्या नोंदी शासकीय नोंदवही असल्याची खात्री करावी.

- नदी, नाले, ओढे, तलाव, तळे, सरोवर यांच्या तटावरील (Riperian Zone) किडे, कीटक, मुंगी, प्राणी यासह वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्या नोंदी घ्याव्यात.

- त्यानंतर पुढील रकान्यामध्ये वनस्पतीच्या नोंदी, पिकांच्या नोंदी, वृक्षांच्या नोंदी कराव्यात.

- या जलस्रोतांची उपयुक्तता किंवा उपयोग हे कोणत्या कारणासाठी वापरले जातात यावरून करावी. जसे की तलाव सिंचनासाठी, विहिरी किंवा बारव पिण्याचे पाणी अथवा सिंचनासाठी तसेच गावातील बोअरवेलची एकूण संख्या, त्यापैकी चालू आणि बंद असलेल्या बोअरवेलची संख्या यांच्याही नोंदी येथे कराव्यात.

इथे प्रकर्षाने सांगणे गरजेचे वाटते, की प्रत्येक गावात पुरातन कालावधीपासून काही जलस्रोत अस्तित्वात आहेत. त्यांच्या नोंदी या ठिकाणी आवर्जून कराव्यात.

या जलस्रोतांवर अनेकांचे लोकजीवन आणि उपजीविका अवलंबून असेल त्यांच्यासोबत चर्चा करून मिळालेली माहिती देखील या ठिकाणी नोंदवावी. प्रथा, व्यवस्थापनाच्या पद्धती, सध्याच्या व्यवस्थापनाच्या पद्धती याबाबत जरूर नोंद करावी. याबाबतची तांत्रिक माहिती जरूर द्यावी.

जालना शहराच्या उत्तरेस सुमारे १६ ते १८ किलोमीटरवर कुंडलिका नदी वाहते. या नदीवर घाणेवाडी गावच्या हद्दीवर १९३४ मध्ये तत्कालीन निजाम काळात मोठा तलाव बांधण्यात आला. या तलावाचे क्षेत्र विस्तृत आहे. मागील सुमारे १०० वर्षांपासून या जलाशयातून जालना शहरवासीयांना पाणी मिळते. आजही त्याची उपयुक्तता थोडीदेखील कमी झालेली नाही.

या तलावाच्या रचनेबाबत अत्यंत विलक्षण आणि उपयुक्त अशी माहिती स्थानिक लोकांकडे आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र अत्यंत विस्तृत असे आहे. याला दोन सांडवे आहेत. तलावातील पाणी अत्यंत शुद्ध असून, कोणत्याही विजेच्या वापराविना ते नैसर्गिक उताराच्या माध्यमातून जालना शहराला पुरविण्यात येते. लोकमनात अशी वदंता आहे, की येथील पाणी लंडनमधील राणीला मिळणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेएवढे शुद्ध आहे. म्हणून जालना येथून हैदराबादला रेल्वे बोगीने हे पाणी जात असे अशीही चर्चा ऐकावयास मिळते. या तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्थानिक लोकांनी एकत्र येऊन अभ्यास सुरू केलेला आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कुंडलिका-सीना नदी पुनरुज्जीवन व विकास समिती आणि स्थानिकांनी या कामांत पुढाकार घेतला आहे.

नोंदींच्या वैध माहितीचे स्रोत ः

- जैवविविधता समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेल्या gazeteer मधील नोंदीची मदत घेण्यास हरकत नाही.

- प्रत्येक गाव हद्दीमध्ये जलस्रोत निश्‍चित आहेत. जुन्या जाणकार लोकांकडून माहिती घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे अत्यंत उपयुक्त राहील.

अतिरिक्त उपयुक्त माहिती ः

वरील सर्व प्रकारांमध्ये दिलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त काही विशिष्ट माहिती याठिकाणी नोंदवायची असल्यास या रकान्यात नोंदवता येऊ शकेल. उदा. धार्मिक, पारंपरिक महत्त्व यावर अनेक त्याच्यासारखे माहिती येथे नोंदवून ठेवणे गरजेचे राहील.

जलस्रोतांच्या नोंदी ठेवणे अत्यंत गरजेचे आहेत. या नोंदी आज नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देखील करता येऊ शकतील. जैवविविधता नोंदवही मधील माहिती म्हणजे अधिकृत दस्तऐवज आहे. कायद्याने या नोंदींना प्रमाण मानले आहे. त्यामुळे गाव कुसातील सर्व जलस्रोतांची माहिती प्रत्येक रकान्यात विस्ताराने लिहावी. कदाचित ही माहिती गोळा करणे आणि त्याच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी काही महिन्याचा कालावधी लागू शकतो एक संपूर्ण ऋतुचक्र जाऊ द्यावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com