Biodiversity : जैवविविधता संवर्धनामध्ये नोंदीचे महत्त्व

आपण गावशिवारातील कृषी जैवविविधतेची नोंदणी व संवर्धनाबाबत माहिती घेत आहोत. या मालिकेत जैविविधतेमध्ये भूभाग, लोकजीवन आणि बाजाराविषयीच्या नोंदी करणे कसे महत्त्वाचे आहे, हे पाहू.
Biodiversity
BiodiversityAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुमंत पांडे

लोकजीवनाची नोंद ः

-आपल्याला स्थानिक लोकजीवन संबंधी माहिती गोळा करायची आहे. यामध्ये प्रपत्र क्रमांक सातमध्ये एकूण अकरा रकाने असून, यामध्ये लोकसंख्या आणि तेथील समाज याबाबत माहिती, तसेच त्यांचे उपजीविकेसाठी असलेल्या बाबी, मूळ उपजीविका कोणती, मूळ व्यवसाय कोणता त्याला पूरक व्यवसाय आहे का? तो कुठल्या एका विशिष्ट भूभागावर अवलंबून आहे, या व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या निविष्ठा किंवा कच्चा माल कोठून येतो, याची संपूर्ण माहिती नोंदवायची आहे.

Biodiversity
Biodiversity : जैवविविधता व्यवस्थापन समितीसाठी अनुसूची

- काही ठिकाणी झाडू तयार करतात. यासाठी शिंदीच्या झाडापासून किंवा नारळाच्या झावळ्यापासून झाडू तयार करतात. हे झाडू तयार करणारा एक विशिष्ट समाज आहे, तो समाज कोणत्या कालावधीमध्ये हा व्यवसाय करतो? त्याचा मूळ व्यवसाय कोणता? या पद्धतीने नोंदी या ठिकाणी येणे गरजेचे आहे. त्यांच्या जाती उपजाती, पोटजाती याच्याही नोंदी घ्याव्यात. या ठिकाणी त्यांची सामाजिक स्थिती तसेच आर्थिक स्थिती काय आहे, त्याच प्रमाणे त्यांच्या जाती व पोटजाती, सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती आणि अशी ही किती कुटुंबे आहेत याच्याही नोंदी यामध्ये येणे गरजेचे आहे.

Biodiversity
Biodiversity : जैवविविधता नोंदींतून हरित रोजगार

कोकणातील घोरपी :

कोकणातील नद्यांवर काम करत असताना त्यातील कोंडी किंवा डोहांचा अभ्यास करताना एक वेगळी माहिती हाती आली. या कोंडीत काही माशांचा विशिष्ट प्रजाती आहेत आणि त्या गोड्या पाण्यात वाढतात. त्यांना स्थानिक बाजारात मोठी मागणी असते. काही ठिकाणी तर दिवसातून दोनदा या ताज्या माशांचा बाजार भरतो. याचे अचूक ज्ञान असलेला एक समाज आहे, त्याचे नाव घोरपी समाज. यांची लोकवस्ती देवरुख येथे आहे. देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना घेऊन आम्ही घोरपी समाजातील लोकांशी चर्चा केली.

या लोकांना काजळी नदी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यांतील सर्व नदीच्या कोंडी/डोहांची तसेच त्यातील पाण्याची माहिती आहे. तसेच त्यातील माशांचा विणीचा काळ, मासे पकडण्याचा वेळा इत्यादी सर्व माहिती होती. तथापि, कोकणातील नद्यांमध्ये भरपूर गाळ साचल्याने या कोंडी गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे ते त्यांच्या व्यवसायापासून परागंदा झाले असल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली.

Biodiversity
Agriculture Biodiversity : कृषिजैवविविधता अन लोकजीवनाच्या नोंदी

भूभागाची नोंद ः

- यामध्ये पहिल्या रकान्यात एकूण भागामध्ये कृषी किंवा पिकाखाली असणारी जमीन, तसेच गावात काही तळे, तलाव वन तलाव, इत्यादी आहेत किंवा कसे, याबाबत माहिती द्यावी.

- काही पड जमीन असल्यास त्याची देखील नोंद या ठिकाणी करावी. या जमिनीचे वर्गीकरण, त्यांचे मालकी हक्क, तिथे सर्वसाधारणपणे कोणती झाडे आहेत, कोणत्या वनस्पती, पिके आहेत, कोणत्या प्रकारचे प्राणी, जंगली श्‍वापद, पक्षी, चिमण्या, इत्यादी यांच्या नोंदी कराव्यात.

- या पीक पद्धतीवर किंवा वनक्षेत्रावर कुठला विशिष्ट समाज किंवा व्यक्तींचा समूह अवलंबून असल्यास त्याचीही माहिती येथे द्यावी. या भूभागाचे व्यवस्थापन कसे होते त्याबाबत माहिती द्यावी.

- उदाहरणार्थ, काही तलाव असतील तर त्या तलावांमध्ये मासेमारी करणारा विशिष्ट समाज आहे. काही ठिकाणी त्याला भोई म्हणतात काही ठिकाणी त्याला वेगळी नाव आहेत. तर याचा उल्लेख या ठिकाणी करावा. गावातील कोण्या व्यक्तीकडे अथवा व्यक्तीच्या समूहाकडे याबाबत सविस्तर माहिती असल्यास त्यांची नावे पण या ठिकाणी नोंदवावीत.

बाजारातील नोंदी ः

- माहिती पुस्तिकेमध्ये गावातील जनावरांच्या बाजाराबाबत माहिती नोंदवावी. यामध्ये बाजाराचे नाव, ठिकाणाची माहिती, तसेच बाजार कधी भरतो?आठवडी, पंधरा दिवसाला, महिन्याला भरतो का वर्षातून काही वेळेस भरतो हा उल्लेख करावा. उदाहरणार्थ, नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव येथे ज्याला घोड्याचे माळेगाव असे म्हणतात. येथे वर्षातून एकदा घोड्यांचा बाजार भरतो. खंडोबाच्या देवस्थान समोर मोठा उत्सव असतो.

- काही ठिकाणी जनावरांचे आठवडी तर काही ठिकाणी पंधरा दिवसाचे बाजार असतात. प्रत्येक ठिकाणची त्यांची वारंवारिता वेगळी असते. त्याची नोंद या ठिकाणी घेणे गरजेचे आहे.

- सर्वसाधारणपणे या बाजारामध्ये किती जनावरे येतात? आणि त्यांची विक्री खरेदी किती होते? याचीही नोंद घ्यावी. सर्वसाधारणपणे कोठून जनावरे विक्रीसाठी येतात आणि विकत घेणारे लोक कोण आहेत याचीही नोंद या ठिकाणी असावी.

- गावामध्ये मासळी बाजार असल्यास त्याची स्वतंत्र माहिती घ्यावी. येथे कुठल्या प्रकारचे मासे विक्रीसाठी येतात, आणि या माशांचे स्रोत काय आहे, याची देखील या ठिकाणी माहिती असणे गरजेचे आहे. कोकणातील सातपाटी येथे माशांचा बाजार प्रसिद्ध आहे.

- काही ठिकाणी गाढवे, काही ठिकाणी म्हशी, तर काही ठिकाणी शेळ्यांचा बाजार प्रसिद्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. देवणी येथील बाजार हा जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी मोठे केंद्र आहे. प्रत्येक बाजाराची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. अशा स्थानिक नोंदी या प्रपत्रात येणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com