शेतकरी ः अनंत वसंत मिराशी
गाव ः कोकिसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र ः साडेपाच एकर
भातशेती ः अडीच एकर
कोकिसरे (जि. सिंधुदुर्ग) येथे अनंत मिराशी यांची साडेपाच एकर जमीन आहे. त्यापैकी दोन एकरमध्ये काजू (Cashew) आणि बांबू लागवड (Bamboo Cultivation) केली आहे. खरीप हंगामात अडीच एकरावर भात लागवडीचे (Paddy Cultivation) नियोजन केले जाते. भात लागवडीसाठी संकरित, सुधारित आणि पारंपरिक बियाण्यांचा (Traditional Paddy Seed) वापर केला जातो. त्यानुसार वेगवेगळी रोपवाटिका तयार केली जाते.
रोपवाटिका नियोजन
मे महिन्याच्या अखेरीस भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची मशागत केली. दोन वेळा नांगरणी करून जमीन भुसभुशीत केली.
जून महिन्यात पहिला पाऊस पडल्यानंतर भात बियाणे पेरले. पेरणीसाठी संकरित, सुधारित आणि पारंपारिक वाणांची वेगवेगळी रोपवाटिका तयार केली. प्रत्येक रोपवाटिकेत भात बियाणे पेरताना दोन दिवसांचे अंतर राखले होते. जेणेकरून भात लावणीस पुरेसा वेळ मिळेल.
अडीच एकर लागवडीसाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रोपवाटिका तयार केली. सुधारित बियाणाची ६ गुंठे, संकरित बियाण्याची ३ गुंठे आणि पारंपरिक बियाण्यांची १० गुंठ्यांवर पेरणी केली.
भात रोपे ४ इंचांची झाल्यानंतर युरियाची हलकी मात्रा दिली. त्यामुळे रोपांची वाढ जलद गतीने होण्यास सुरुवात झाली.
साधारण २० ते २२ दिवसांनी रोपे पुनर्लागवडीस तयार झाली.
पुनर्लागवड नियोजन
पुनर्लागवडीसाठी उभी आडवी नांगरणी करून जमिनीत ढेकळे फोडून घेतली. काही क्षेत्रामध्ये पॉवर टिलरच्या साह्याने नांगरणी केली. मात्र काही क्षेत्र अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी बैलांच्या मदतीने नांगरणीची कामे केली.
शेणखत आणि १८ः१८ः१० हे खत शेतात पसरवून दिले. त्यानंतर पुन्हा उभी-आडवी नांगरणी करून जमीन तयार केली.
जून महिन्याच्या शेवटी पुनर्लागवडीच्या कामांस सुरुवात केली. बियाण्याच्या प्रकारानुसार सुरुवातील संकरित त्यानंतर सुधारित आणि अखेरीस पारंपरिक वाणाच्या भात रोपांच्या पुनर्लागवडीचे नियोजन केले.
संपूर्ण क्षेत्रावरील पुनर्लागवड मजुरांच्या मदतीने १५ दिवसांमध्ये पूर्ण केली. भात रोपे काढताना त्यांची मुळे तुटणार नाहीत याची काळजी घेतली.
पाणी साचून राहण्यासाठी शेताच्या बाजूने बांध घातले. मात्र मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटण्याची शक्यता असते. अशावेळी त्या बांधाची पुनर्बांधणी करून घेतली.
पुनर्लागवडीनंतरचे व्यवस्थापन
लागवडीनंतर २० दिवसांनी संपूर्ण लागवड क्षेत्रात उगवलेले तण काढून टाकले.
त्यानंतर युरिया खताचा पहिला डोस दिला. रोपांची वाढ आणि पावसाचे प्रमाण पाहून १५ ते २० दिवसांनी आणखी १ वेळ युरियाची मात्रा दिली जाईल.
भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखली जाईल.
सध्या लागवड होऊन ५७ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या ऊन- पाऊस अशी हवामान स्थिती आहे. या काळात पिकावर करपा किंवा तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार फवारणी करणार आहे.
लागवडीनंतर दीड-दोन महिन्यांनी भात पिकात उगवलेले तण काढून टाकले जाईल. पारंपरिक भातांची वाढ अधिक झाल्यास त्याची पात कापली जाते. कारण, पिकाची अधिक वाढ झाल्यास लोंबी आल्यानंतर ती जमिनीवर कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून ही कार्यवाही केली जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.