डॉ. दत्तात्रय गावडे
Onion Pest Disease Management राज्यामध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, धुळे, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड (Onion Cultivation) होते. तसेच मराठवाडा व विदर्भातील काही भागात कांद्याची लागवड केली जाते. बाजारात वर्षभर कांद्याला चांगली मागणी (Onion Demand) असते.
दर्जेदार कांद्याला कायम चांगले दर (Onion Rate) मिळतात. दर्जेदार कांदा उत्पादन (Onion Production) घेण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
रोपावस्थेपासून ते साठवणुकीपर्यंत कांदा पिकावर अनेक रोगांचा (Onion Disease) प्रादुर्भाव होतो. बदलत्या हवामानामुळे (Climate Change) पिकावर कीड-रोगांचा (Onion Pest Disease Management) प्रादुर्भाव वाढतो आहे. परिणामी कांद्याची उत्पादकता कमी होत चालली आहे.
प्रतिकूल हवामानात कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे सुमारे ५० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. त्यासाठी कांद्यावरील रोग-किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार ओळखून पद्धतींचा अवलंब करावा.
अ) बुरशीजन्य रोग ः
१) काळा करपा ः (Anthracnose)
- रोगकारक बुरशी ः कोलीटोट्रायकम ग्लेओस्पोराइड्स (Colletotrichum gleosporides)
लक्षणे ः
- सुरूवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात.
- पाने वाळतात. रोपाची मान लांबट होऊन पात वेडीवाकडी होते. पाने वेडीवाकडी झाल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.
- रोपांची पाने ही काळी पडून वाळतात. नंतर रोप मरते.
- दमट आणि उबदार हवामानात रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
- कुजलेल्या रोपाचा भाग, रोपवाटिकेतील रोप आणि कांदा या मार्फत हा रोग पसरतो.
उपाय ः
- गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करावी.
- लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
- पुनर्लागवडीवेळी रोपे कार्बेन्डाझिम (०.१ टक्के) १ ग्रॅम या प्रमाणात द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.
नियंत्रणासाठी फवारणी ः प्रतिलिटर पाणी ः
- मॅंकोझेब ३ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रोबीन (५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक)
१ ग्रॅम - १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
२) तपकिरी करपा ः
- रोगकारक बुरशी ः स्टेमफीलीयम व्हेसिकॅरीयम (Stemphylium Vasicarium)
लक्षणे ः
- रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो.
- पानाच्या बाहेरील भागावर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
- फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाकून मोडतात.
नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- मॅंकोझेब ३ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
हेक्झाकोनॅझोल १ मिलि किंवा
क्लोरोथेरोनॉल २.५ ग्रॅम
१० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
जांभळा करपा ः
रोगकारक बुरशी ः अल्टरनेरिया पोराय (Alternaria porri)
- पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपवाटिका तसेच बीजोत्पादनाची लागवड तसेच रांगड्या कांद्यावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
- सुरुवातीस पानावर लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात.
- फुलांचे दांडे मऊ पडून वाकतात किंवा मोडून पडतात.
उपाय ः
- पिकांची फेरपालट करावी.
(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- मॅंकोझेब ३ ग्रॅम किंवा
क्लोरोथॅलोनॉल २.५ ग्रॅम अधिक स्टीकर
याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
आयरिश यलो स्पॉट ः
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत होतो.
- पानांवर, फुलांच्या दांड्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके पडतात. ठिपक्याला गडद पिवळ्या रंगाची कडा तयार होते. अनेक ठिपके तयार होऊन संपूर्ण पान वाळते.
- रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत होतो.
उपाय ः
- फुलकिड्यांचा बंदोबस्त करावा.
- पिकांची फेरपालट करावी.
- फुलकिड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- शेतातील कुजलेला पालापाचोळा, प्रादुर्भावग्रस्त भाग नष्ट करावा.
फुलकिडे, मावा ः
- पिल्ले व प्रौढ कीटक पानांतील रस शोषून घेतात. रस शोषताना किडींनी असंख्य चावे घेतल्यामुळे पानांवर पांढुरके ठिपके पडतात. त्यालाच ‘टाक्या’ असे म्हणतात.
- किडीने केलेल्या जखमांतून काळा किंवा जांभळा करपा या रोगांच्या बुरशीचा पानांत शिरकाव होतो. करता येतो.
उपाययोजना (फवारणी ः प्रति लिटर)
-प्रोपिनोफॉस १ मिलि किंवा
फिप्रोनील १ मिलि
कीटकनाशकांचा वापर १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून चिकटद्रव्यांसह करावा.
डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०, (पीक संरक्षण विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.