Nutrient : चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापन

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये एकूण लोहाचे प्रमाण सहसा जास्त असते, परंतु ते पिकांना उपलब्ध स्वरूपात नसते, त्यामुळे पिकांमध्ये हरितद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पानांमध्ये दिसून येतात.चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सामूचा प्रामुख्याने जस्त आणि मँगेनीजच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो.
Crop Nutrient Management
Crop Nutrient ManagementAgrowon

डॉ.अर्चना पवार, डॉ.शशिशेखर खडतरे, डॉ. विजय अमृतसागर

लोहाचे व्यवस्थापन :

१) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये एकूण लोहाचे प्रमाण सहसा जास्त असते, परंतु ते पिकांना उपलब्ध स्वरूपात नसते, त्यामुळे पिकांमध्ये हरितद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पानांमध्ये दिसून येतात. कोवळी पाने पिवळी-पांढरी दिसतात. पानांमध्ये हरितद्रव्ये कमी असली आणि पाने पिवळी दिसत असली, तरीही पानांमध्ये लोहाची कमतरता दिसून येत नाही.

२) पानातील एकूण लोहाचे प्रमाण आणि हरितद्रव्ये यांचा संबंध नसल्याचे आढळून आले आहे. तेव्हा लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडत नसून, चुन्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे चुन्याने प्रेरित लोह कमतरतेमुळे हरितद्रव्याचे प्रमाण कमी दिसते.

Crop Nutrient Management
Crop Protection : आंबिया बहरातील फळांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

३) हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी एकूण लोह भरपूर असते; परंतु उपलब्ध व कार्यक्षम लोह नसते. सामान्य व योग्य वाढ होत असलेल्या पानापेक्षा या पानांमध्ये लोहाचे एकूण प्रमाण जास्त दिसून येते; परंतु ते पिकाला उपयोगी पडत नाही. उलट पिकाने शोषलेल्या लोहास पानांतील लोह बंदिस्त करते. यालाच चुन्याने प्रेरित लोहाचे क्लोरॉसिस म्हणतात. पानातील या लोहाच्या बंदिस्त होण्याचा शास्त्रीय अभ्यासही अपुरा आहे, जर लोहामुळे हरितद्रव्याची कमतरता पिकामध्ये दिसून येत असेल, तर अशा पिकांची वाढ योग्य होण्यासाठीचे उपाय तोकडे पडतात. अशा वेळी फेरस सल्फेट किंवा फेरिक सल्फेट खताचा वापर करून जास्त मात्रा द्यावी आणि या खतांचा वापर वारंवार करावा.

४) जमिनीचा सामू जर आठच्या वर असेल, तर लोहाची विद्राव्यता जास्त आणि मँगेनीजपेक्षा कमी होते. याचाच अर्थ चुनखडीयुक्त जमिनीमध्ये असलेले लोह पिकांसाठी उपलब्ध नसते. अशा वेळी सेंद्रिय पदार्थासोबत संयोग झालेले लोह पिकांची लोहाची गरज भागवते.

५) या जमिनीमधील पिकांमध्ये हरितद्रव्याची कमतरता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील बायकार्बोनेट संयुगांची वाढलेली मात्रा हे आहे.

उपाययोजना ः

१) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहामुळे येणाऱ्या हरितद्रव्ये कमतरतेच्या लक्षणापासून पिकास वाचवायचे असेल, तर त्यासाठी लोहाच्या कमतरतेला प्रतिकार करणाऱ्या पिकांच्या जाती आणि फळझाडामध्ये खुंटाचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ: संत्र्यांमध्ये जंबेरी, रंगपूर लाइमसारखे खुंट चुनखडीस दाद देत नाहीत. द्राक्षामध्ये डॉगरीज खुंटाचा उपयोग चुनखडीयुक्त जमिनीत योग्य आहे.

२) लोहाचे चिलेट बाजारात मिळतात, त्याचा वापर केल्यास लोह पिकांस उपलब्ध होते. उदा. Fe-EDTA, Fe-HEDTA, Fe-DTPA, Fe-EDDHA.

३) जमिनीचा सामू ७.५ किंवा कमी असेल, तर वरीलपैकी कुठल्याही चिलेटचा उपयोग फायदेशीर आहे, परंतु जास्त चुनखडीयुक्त जमिनीसाठी (सामू. ७. ५ च्या वर असल्यास) Fe-EDDHA या चिलेटचा उपयोग जास्त फायदेशीर ठरतो.

Crop Nutrient Management
Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

४) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पालाशयुक्त खताचा (पोटॅशिअम सल्फेट) जास्त उपयोग केला तर लोहाची उपलब्धता वाढते. लोहामुळे होणारी हरितद्रव्याची कमतरता कमी होते. याचे मुख्य कारण म्हणजे, पिके धन आयन जास्त शोषण करतात, या शोषणाच्या बदल्यात हायड्रोजनचे आयन मुळाद्वारे बाहेर सोडले जातात. या हायड्रोजनमुळे मुळांच्या बाजूचा परिसर आम्लयुक्त होतो, म्हणजेच जमिनीचा सामू कमी होतो आणि त्यामुळे लोहाचे शोषण चांगले होते.

५) सेंद्रिय पदार्थाच्या वापराने चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाची उपलब्धता वाढवता येते. फवारणीद्वारे लोहाचा पुरवठा पिकांना करता

येतो. त्यासाठी फेरस सल्फेटची फवारणी १.५ ते २ टक्के, सात ते दहा दिवसांच्या अंतराने करावी. पिकामध्ये हरितद्रव्याची कमतरता दिसल्याबरोबर फवारणी आवश्यक आहे. नवीन चांगली पाने येईपर्यंत फवारणी करावी.

जस्त आणि मँगेनीजचे व्यवस्थापन ः

१) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सामूचा प्रामुख्याने जस्त आणि मँगेनीजच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो. अल्कलीधर्मी जमिनीमध्ये जस्ताची उपलब्धता अत्यंत कमी असते, त्यामुळे विनिमय जस्त कमी होऊन पिकांना उपलब्ध होत नाही, त्यामुळे पिकामध्ये जस्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसतात. असे निदर्शनास आले आहे, की सामू जर एकने वाढला, तर जस्त व मँगेनीजची विद्राव्यता १०० पटीने कमी होते. यावरून या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत सामूचा सहभाग लक्षात येतो.

उपाययोजना ः

१) झिंक कार्बोनेटमध्ये, झिंक अविद्राव्य स्वरूपात जाते. जमिनीचा सामू आठच्या जवळपास असेल तर झिंकची कमतरता पिकांमध्ये दिसून येत नाही अथवा अशा वेळी झिंक सल्फेट, मँगेनीज सल्फेट किंवा झिंक ऑक्साईड, मँगेनीज ऑक्साइडसारख्या खतांचा उपयोग करता येतो; परंतु जर सामू आठच्या वर असेल तर मात्र या खतांचा उपयोग अत्यंत कमी होतो. त्यासाठी चिलेटेड झिंक जे Zn-EDDHA, Zn-EDTA स्वरूपात मिळते. त्याचा उपयोग करावा म्हणजे पिके सहजपणे जस्ताचे शोषण करू शकतील.

२) फवारणीद्वारे जस्त व मँगेनीज पिकांना देणे हीसुद्धा एक चांगली पद्धत आहे. वरील खताशिवाय जस्त आणि मँगेनीज असलेले लिग्नीन सल्फोनेट, ग्लूकोसल्फोनेट किंवा अल्फाकिटो अॅसिडसारखी खते जास्त फायदेशीर ठरतात.

३) फळपिकांमध्ये ०.६ ते १.२ किलो प्रती हेक्टरी जस्त किंवा मँगेनीजची फवारणी वर्षभरामध्ये दहा ते बारा वेळा करणे गरजेचे आहे; कारण जुन्या पानातून नवीन पानांकडे जस्त जाणे गरजेचे असते.

तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनमचे व्यवस्थापन

तांबे :

१) जसजसा जमिनीचा सामू ७.५ च्या वर वाढायला लागतो, तसतसे तांब्याची उपलब्धता पिकांना कमी होत जाते, तसेच सामू पाचच्या खाली गेल्यावरसुद्धा तांब्याच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो; परंतु सामू जर पाचच्या थोडासा वर असेल, तर तांब्याच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम दिसत नाही.

२) वालुकामय आणि पाण्याचा जास्त निचरा होणाऱ्या जमिनीत तांब्याची कमतरता आढळते. तांबे पिकांना देण्यासाठी ते फवारणीद्वारे कॉपर सल्फेट किंवा कॉपर चिलेटद्वारे देणे चांगले असते. बहुतेक वेळा कॉपर असलेल्या बुरशीनाशकांचा वापर केल्याने, तांब्याची गरज भागविली जाते.

बोरॉन :

१) या अन्नद्रव्याची उपलब्धता सामू ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असेल, तर जास्त असते. चुनखडीयुक्त जमिनीमधील कॅल्शिअम, बोरॉनची उपलब्धता कमी करते. यामुळे बहुतेक वेळा चुनखडीयुक्त जमिनीत बोरॉन जास्त असेल, तरी त्याचा अनिष्ट परिणाम दिसून येत नाही. उलटपक्षी, कॅल्शिअम कमी असलेल्या जमिनीत बोरॉनचे प्रमाण थोडेसे जरी जास्त झाले, तरी पिकांवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

२) वालुकामय, चुनखडीयुक्त जमिनीत बोरॉनच्या उपयोगाने पिकावर चांगला परिणाम दिसतो. बोरॉनचे नियोजन करताना ओलितासाठी वापरत असलेल्या पाण्यामधील बोरॉनचे प्रमाण पाहणे आवश्यक आहे.

मॉलिब्डेनम :

१) याची कमतरता चुनखडीयुक्त जमिनीत दिसून येत नाही, कारण सामू वाढला, की मॉलिब्डेनमची उपलब्धता वाढते. जास्त मॉलिब्डेनममुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही; परंतु जास्तीचे मॉलिब्डेनम पिकांत साठवले जाते. या पिकांचा वापर चारा म्हणून केला तर जनावरांमध्ये मॉलिब्डेनॉसिससारखे आजार होतात.

सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करताना ः

१) चुनखडीयुक्त जमिनी अल्कलीधर्मी (सामू ७.५ ते ८.५) असतात.जसजसे चुनखडीचे प्रमाण वाढत जाते (पाच टक्क्यांवर) तसतसे नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, मँगेनीज, जस्त आणि लोह या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते.

२) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अमोनिअमयुक्त आणि युरिया खते ताबडतोब मुळाशी गेली पाहिजेत, त्यासाठी जमिनीमध्ये ओलावा नसेल, तर पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.

३) अशा जमिनीमध्ये स्फुरदयुक्त खते पिकांना खूप कमी प्रमाणात आणि हळू उपलब्ध होतात, त्यासाठी स्फुरदाची योग्य मात्रा नियमितपणे पिकांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी स्फुरदाचे पानातील प्रमाण वाढणे गरजेचे आहे. स्फुरद विद्राव्य जिवाणूचा वापर करावा.

४) या जमिनीमध्ये मॅग्नेशिअम व पालाशची गरज भासते, त्यासाठी मॅग्नेशिअम नायट्रेट आणि पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी फायद्याची ठरते.जस्त आणि मँगेनीजची कमतरता कमी करण्यासाठी या अन्नद्रव्यांची चिलेटयुक्त खताद्वारे (०.५ टक्के) दोन ते तीन वेळा फवारणी करावी.

५) अशा जमिनीत लोह उपलब्ध न झाल्यामुळे हरितद्रव्याचे प्रमाण कमी होते, त्यासाठी फळझाडांची कलमे क्षार प्रतिकारक्षम खुंटावर करावी. अशी रोपे लागवडीसाठी वापरावीत. लोहाच्या कमतरतेचा अनिष्ट परिणाम कमी करण्यासाठी चिलेटेड लोहाची (एक ते दोन टक्के) फवारणी फायदेशीर आहे.

६) गंधक आणि गंधकयुक्त पदार्थाचा वापर केल्याने पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

सेंद्रिय पदार्थाचा उदा. कंपोस्ट, शेणखत वापर केल्याने चुन्याची दाहकता कमी होऊन अन्नद्रव्ये उपलब्धतेमध्ये वाढ होते.

संपर्क ः डॉ. अर्चना पवार, ७५८८०४७८५९

(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com