Crop Protection : आंबिया बहरातील फळांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. जुलै महिन्यात सातत्याने होत असलेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे लिंबूवर्गीय फळपिकांवर विपरीत परिणाम होतो.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon
Published on
Updated on

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. राजेंद्र वानखेडे

सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. जुलै महिन्यात सातत्याने होत असलेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे लिंबूवर्गीय फळपिकांवर विपरीत परिणाम होतो. साधारणत: पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड केलेली असल्यास झाडातील संजीवकांचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरवठा होतो, कर्ब-नत्र यांचे संतुलनासह संतुलित पोषण होण्यास मदत होते. यामुळे तयार झालेली फळे झाडावर परिपक्वतेपर्यंत टिकतात. मात्र सध्याचे वातावरण वनस्पतीच्या शास्त्रीय आंतरिक फळगळ आणि फायटोप्थोरा या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पानगळ, फळगळ, मुळकूज रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. बागेतील विकृती व फळगळीचे लक्षणे जाणून त्याप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ

१) पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे जमीन संपृक्त होते. मुळांना प्राणवायू अल्प मिळतो किंवा मिळत नसल्यामुळे श्वसनक्रिया बाधित होते. झाडाच्या मुळ्या कुजू लागतात. परिणामी विकसनशील फळे पिवळी होऊन गळून पडतात.

२) झाडांचे अपुरे पोषण आणि संजीवकांचा असमतोल निर्माण झाल्यामुळे पेशी क्षय होऊन फळगळ होते. यात संत्रा/मोसंबीचा पिवळेपणा हा देठापासून सुरू होतो. तो खालपर्यंत पसरून गळ होते. बरेचदा देठाजवळ पिवळ्या छटा दिसतात. (चित्र क्र. १). मुळ्या कुजल्यास पाने आत मध्ये दुमडतात व मलूल पडतात. (चित्र क्र. २).

Crop Protection
संत्र्याच्या आंबिया बहर फुटीवर प्रश्‍नचिन्ह

उपाययोजना

-सिंचनासाठी केलेल्या वाफ्यामध्ये अधिक पाणी साचून राहते. पावसाळ्यामध्ये वाफे मोडून टाकावीत. बागेच्या उताराच्या बाजूने चर करून शेतातील पाणी बाहेर काढावे.

-झाडांवरील गळून पडलेली फळे गोळा करून खोल खड्ड्यात गाडून त्यांची विल्हेवाट लावावी. फळबागेत फळांचे ढीग तसेच ठेवल्यास कीड व रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात.

-सतत पावसाचे पाणी साचून राहिल्यास बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.

-वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ व्यवस्थापनाकरिता पुढील प्रमाणे नियोजन करावे.

पहिली फवारणी ः प्रमाण प्रति १०० लिटर पाणी

नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड (एनएए) १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा

२-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा

जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम)

या पैकी एक संजीवक अधिक युरिया (१ किलो)

मिश्र द्रावणाची फवारणी करताना १५ दिवसाचे अंतराने संजीवक बदलून पुढील फवारणी करावी.

Crop Protection
डाळिंबाच्या मृग ऐवजी आंबिया बहराला पसंती

दुसरी फवारणी ः प्रति १०० लिटर पाणी

एनएए १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा

२-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा

जिबरेलिक अॅसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा

एन-एटीसीए (N-Acetyl-Thiazolidine -४- Carboxylic Acid) (१० पीपीएम) १ ग्रॅम

अधिक ब्रासिनोलाइड (४ पीपीएम) ०.४ ग्रॅम अधिक फॉलिक अॅसिड (१०० पीपीएम) १० ग्रॅम.

पुढील फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.

- झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्ये व्यवस्थापन करताना आंबिया बहरातील फळे असणाऱ्या झाडांना जुलै व सप्टेंबर महिन्यात ९० ग्रॅम नत्र (युरिया १९५ ग्रॅम) + ७५ ग्रॅम पालाश (एमओपी १७५ ग्रॅम) प्रति झाड जमिनीद्वारे द्यावे.

-झाडावर पानांची संख्या कमी व पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास, कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट (१ किलो) + जिबरेलिक

ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(जिबरेलिक ॲसिड हे संजीवक पाण्यात योग्यरीत्या मिसळत नसल्यामुळे ते ऑरगॅनिक सोल्व्हन्ट (अल्कोहोल, असिटोन) यामध्ये मिसळून असे द्रावण पाण्यात करावे.)

-सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आंबिया फळांकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात, तर मृगाच्या फळांकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी.

बुरशीजन्य फळगळ

संत्रा फळझाडांमध्ये प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम,डिप्लोडिआ व अल्टरनेरिया या बुरशींचा प्रादुर्भाव झाल्यामुळेही फळगळ होते. या बुरशींचा प्रादुर्भाव फळांचा देठ किंवा साल व देठ यांचा जोड येथे होऊन काळपट तपकिरी डाग पडतात. तो भाग कुजल्यामुळे फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असल्यास त्यावर बुरशींची बीजफळे शिल्लक असतात. त्यांची वाढ अनुकूल वातावरणात होऊन बुरशीचा प्रादुर्भाव पसरतो. परिणामी फळगळ होऊन अधिक आर्थिक नुकसान होते.

१) फायटोप्थोरा पानगळ, फळावरील तपकिरी रॉट किंवा ब्राऊन रॉट ः

पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, शेतामध्ये पाणी साचून राहणे अशा वातावरणात फायटोप्थोरा बुरशीचा प्रकोप होऊन झाडांची पानगळ होते. (चित्र क्र. ३) फळांवर तपकिरी डाग उद्भवून ब्राऊन रॉट’ (चित्र क्र. ४) रोग दिसून येतो. जमिनीलगतची पाने टोकाकडच्या भागापासून तपकिरी करड्या रंगाची दिसू लागतात व ओलसर अशी भासतात. डाग पानांच्या टोकाकडून पसरून पूर्ण पाने काळी तपकिरी होऊन गळून पडतात. झाडाच्या खाली पानांचा खच पडतो. याचबरोबर हिरव्या असलेल्या फळांवरही तपकिरी/ करड्या डागांची सुरवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या कातडीस प्रादुर्भाव होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तित होते. फळे सडून गळतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. (चित्र क्र. ५).

२) देठ सुकणे किंवा कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट

कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. हा काळा भाग नंतर वाढत जातो. संपूर्ण फळ सडते. (चित्र क्र. ६). कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या प्रादुर्भावामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होणे, काळी पडणे, वजनाने हलकी व कडक होणे आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहणे यासारखी लक्षणे दिसतात. (चित्र क्र. ७).

३) लॉसिडिप्लोडिआ फळावरील कूज

लॉसिडिप्लोडिआ बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो. चट्ट्याच्या भागावर दाब दिला असता तो मऊ जाणवतो. पिवळा असलेला भाग नंतर करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो. (चित्र क्र. ८). हाताच्या बोटासारखे व्रण फळाच्या खालच्या भागापर्यंत जातात, नंतर पूर्ण भाग करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो. झाडावर सल असलेल्या बागेत या बुरशीचा प्रकोप अधिक होतो.

४) अल्टरनेरिया बुरशीमुळे होणारी फळगळ

अल्टरनेरिया बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ काळ्या रंगाचा डाग पडतो. बुरशीचे संक्रमण बहुधा फळाच्या आत मध्ये दिसून येते. फळाच्या आतील गाभा काळा पडतो. बरेचदा त्यावर बुरशीची वाढ दिसून येते. (चित्र क्र. ९).

उपाययोजना

-सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नये, अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते. रोगाचा प्रसार जलद गतीने होतो. वाफे स्वच्छ ठेवावेत.

-बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. कारण पाणी साठून राहिलेल्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होते.

-सद्यःस्थितीत फायटोफ्थोरा बुरशीमुळे होणारी पानगळ व फळावरील तपकिरी कूज ‘ब्राऊन रॉट’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर व वाफ्यातही फवारणी करावी. प्रमाण प्रति लिटर पाणी

फोसेटिल एएल* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड* (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम.

-बुरशीनाशकाची वाफ्यात फवारणी झाल्यानंतर ५ दिवसांनी ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम व सुडोमोनास फ्लुरोसन्स१०० ग्रॅम प्रति किलो शेणखतात मिसळून प्रति झाड द्यावे. (चित्र क्र. ११).

-देठ सुकणे किंवा कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट मुळे होणाऱ्या फळगळसाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

बोर्डेक्स ०.६ टक्के मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी)* २.५ ग्रॅम किंवा अझोक्सिस्ट्रोबिन अधिक डायफेनकोनॅझोल* १ मिलि.

(नोंद: * लेबल क्लेम नाहीत. मात्र संशोधन केंद्र व डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला यांची ॲग्रेस्को व संशोधनावर आधारित ॲडहॉक शिफारस आहे.)

------------

डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७

डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२

(प्रभारी अधिकारी, अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com