डॉ. आर. जी. सोमकुंवर
द्राक्ष बागेत (Grape vineyard) गेल्या आठवड्यापासून वातावरण कोरडे दिसत आहे. त्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला होता. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, वाळवा, मालगाव भागामध्ये अतिवृष्टीसारखी (Wet Drought) परिस्थिती उद्भवली होती. अशा ठिकाणी बागेत पाणी साठले होते. सध्या वातावरण जरी कोरडे असले तरी अशा काही भागामध्ये समस्या येऊ शकतात. अन्य भागांचाही विचार करता फळछाटणीनंतर सध्या उपलब्ध वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती घेऊ.
१) घड जिरण्याची समस्या
ज्या बागेत अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते, अशा ठिकाणी फळछाटणी झालेली असल्यास फुटी निघत असलेल्या अवस्थेत घड जिरण्याची समस्या उद्भवू शकते. पाणी जास्त काळ साचून राहिल्यामुळे मुळे कार्य करणे थांबले असेल. त्याचा परिणाम वेलीच्या वाढीवरही होऊ शकतो. यावेळी बागेमध्ये ट्रॅक्टर चालण्याची शक्यता नसेल. मात्र संजीवकांचा (विशेषतः सायटोकायनीनयुक्त) वापर व पालाशची फवारणी हाताने करावी लागेल. वेलीची वाढ नियंत्रणात राहण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
- बागेतून पाणी काढून दिले तरी जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत असलेल्या बागेमध्ये जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा करता येणार नाही. त्याऐवजी फवारणीच्या माध्यमातून खतांची उपलब्धता करावी.
-ज्या बागेमध्ये डोळे फुटून घड दिसून येत असतील, तिथेही निघालेला घड बाळीमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी बागेतील पाणी सर्वांत प्रथम बाहेर काढले पाहिजे. जितके बोद मोकळे राहतील व मुळांच्या कक्षेत हवा खेळती राहत असल्याचे वातावरण तयार होईल, तितके चांगले परिणाम घडाच्या विकासावर दिसून येतील.
२) वेलीची वाढ कमी होणे
बऱ्याचदा बागेत फळछाटणीनंतर फुटीची वाढ कमी होताना दिसून येते. घडाच्या विकासात पानांची संख्या (फुटीची वाढ) महत्त्वाची योगदान देते. ५०० ग्रॅम वजनाच्या घडाच्या विकासामध्ये आठ ते दहा मिमी जाडीच्या काडीवर १६० ते १७० वर्ग सेंमी क्षेत्रफळाची सोळा ते सतरा पाने आवश्यक असतात. घड पाचव्या पानावर निघतो, त्यानंतर घडाच्या पुढे या क्षेत्रफळाची १० ते १२ पाने गरजेची असतात. फुटीची वाढ फक्त मणी सेटिंगपर्यंतच होताना दिसून येईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या तरी आवश्यक तितक्या पानांची पूर्तता होत नाही.
कधी कधी जमिनीच्या विपरीत परिस्थितीमुळे (उदा. चुनखडीचे वाढलेले प्रमाण) जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्येही ती वेल मुळांद्वारे शोषून घेऊ शकत नाही. अशीही परिस्थिती बागेमध्ये असू शकेल. बागेत फळछाटणी उशिरा झालेली असल्यास प्रीब्लूम अवस्थेमध्ये आवश्यक ती फुटींची वाढ कमी राहण्याची महत्त्वाचे कारण म्हणजे किमान तापमानात झालेली घट असू शकते. फुटीची वाढ पूर्ण करण्यासाठी मणीसेटिंगपूर्वी (प्रीब्लूम अवस्था) संधी असते. डोळे फुटल्यानंतर प्रीब्लूम अवस्थेपर्यंत फुटी वाढ कशी चालते याचा अंदाज येत नाही. मात्र जीए या संजीवकांच्या पहिल्या फवारणीपासून चित्र स्पष्ट होते. नेमक्या या अवस्थेपासून उपाययोजना केल्यास फुटींची वाढ करून घेता येईल.
- बागेत चुनखडीचे प्रमाण असल्यास सल्फर जमिनीत मिसळून घेता येईल. सल्फरची मात्रा जमिनीतील उपलब्ध चुनखडीवर अवलंबून असेल. साधारण स्थितीमध्ये ४० ते १०० किलोपर्यंत सल्फरचे प्रमाण राहू शकते. जितके चुनखडीचे प्रमाण जास्त, तितक्याच जास्त प्रमाणात सल्फरचा वापर करावा.
- फुटीचा शेंडा कशा प्रकारे दिसतो, यावर नत्राची उपलब्धता अवलंबून असेल. छत्री दांड्याप्रमाणे पूर्ण अर्धगोलाकार फूट असल्यास पाच ते सहा पाने कोणत्याही खतांचा वापर न करता मिळू शकतील. या तुलनेमध्ये कमी अर्धगोलाकार असलेल्या परिस्थितीमध्ये तीन ते चार पाने मिळण्याची शक्यता असते. या स्थितीतील बागेमध्ये पानांची काडीवरील संख्या किती आहे आणि आणखी किती गरज आहे, याचा विचार करून नत्राचा जमिनीतून,
तसेच फवारणीद्वारे वापर करावा. नत्रापैकी युरिया, अमोनिअम सल्फेट, १२-६१-० इ. खतांचा वापर फायद्याचा राहील. या व्यतिरिक्त ज्या ग्रेडच्या खतामध्ये नत्र आणि स्फुरद आहे, त्यांचाही वापर करता येईल.
- तिसऱ्या परिस्थितीमध्ये फुटीचा शेंडा पूर्ण सरळ असल्यास कोणत्याही खतांचा वापर फायद्याचा नसेल. यालाच शेंडा लॉक झाला असे म्हणतात. ही परिस्थिती बागेत येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
३) कमकुवत फुटी व पिवळी पाने
द्राक्ष लागवडीखालील विभागामध्ये दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाला. यामुळे बराच काळ पाणी साचून राहिले. सपाट असलेल्या बागेमध्ये पाणी जास्त काळ साचून राहिले. ज्या बागेमध्ये पाण्याचा निचरा होण्याची संधी होती, अशा ठिकाणी पाणी बागेबाहेर काढता आले. मात्र बोदामधील सर्वच अन्नद्रव्ये पाण्यासोबत वाहून गेली असतील. ज्या ठिकाणी सिंचनाच्या पाण्यामध्ये क्षार अधिक होते, तिथे मुळांच्या कक्षेमधून क्षारही निघून गेले असतील. म्हणजेच या बागेतील वेलीची चांगली वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. असे जरी असले तरी उपलब्ध अन्नद्रव्ये वाहून गेली असल्यामुळे जमिनीत काहीच अन्नद्रव्ये नसतील. त्यामुळेच निघत असलेल्या फुटी एकतर कमकुवत असतील किंवा निघालेल्या फुटींची पाने पिवळी दिसतील. अशा प्रकारच्या बागेत फुटींची वाढ नियंत्रणात दिसून येईल. ज्यामध्ये फुटीचा पेरा आखूड असेल, पानांचा आकार कमी व पानांची संख्याही कमी असेल. अशा प्रकारच्या फुटींवर घडांचा विकास होणे शक्य नाही. अशा वेळी बागेतील माती परीक्षण महत्त्वाचे असेल. ड्रीपरच्या खाली पडलेल्या पाण्यापासून २० ते २५ सेंमी बाजूला एक फुटापर्यंत खोल खड्डा घेऊन मातीचा नमुना गोळा करावा. तो प्रयोगशाळेतून तपासून घ्यावा. यामुळे बागेत आवश्यक त्या खतांची पूर्तता करणे सोपे होऊ शकते. उत्पादन खर्चामध्ये बचत होऊ शकते.
पाने पिवळी असलेल्या परिस्थितीत बऱ्याच वेळा फेरस व मॅग्नेशिअमची कमतरता दिसून येते. बागेमध्ये फळछाटणी होऊन प्रीब्लूमच्या पुढील अवस्था असल्यास मणीसेटिंग वेळी मण्याचा आकार कमी जास्त होण्याची समस्याही दिसून येते. अशा परिस्थितीत प्रीब्लूम अवस्थेमध्येच (साधारण छाटणीनंतर २३ ते ३० दिवसांचा कालावधी) झिंक आणि बोरॉनची उपलब्धता फवारणीद्वारे एक ते दोन वेळा करावी. यामुळे मणी सेटिंग होऊन एकसारखा आकार मिळण्यास मदत होईल. जमिनीत वाफसा असलेल्या स्थितीमध्ये फेरस सल्फेट व मॅग्नेनिअम सल्फेट ठिबकद्वारे द्यावे. सोबतच कमी प्रमाणात दोन ते तीन फवारण्या करून घ्याव्यात. कॅनॉपीच्या प्रमाणानुसार २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी यापेक्षा अधिक प्रमाण घेऊ नये.
बऱ्याच वेळा बागेत दाट कॅनॉपी असलेल्या परिस्थितीत सूर्यप्रकाशाच्या अभावामुळेही खालील भागातील पाने पिवळी पडताना दिसून येतील. ही पाने स्वतःची अन्नद्रव्ये तयार करू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पानावर अवलंबून असतात. कालांतराने गळून पडतात. यामुळे घडाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. मण्यात गर तयार न होण्याची ही काही महत्त्वाची कारणे आहेत. ही परिस्थिती टाळण्याकरिता शक्यतो मोकळी कॅनॉपी राहील, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडून त्यांनी केलेल्या प्रकाश संश्लेषणाचा उपयोग घडाच्या वाढीकरिता होऊ शकेल.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.