Grape Management : द्राक्ष बागेत कलम करण्याची योग्य वेळ

नवीन द्राक्ष बाग (Grape Vine) उभारताना खुंट खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. खुंटांची लागवड ही फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केली जाते.
The right time to graft in the vineyard
The right time to graft in the vineyardAgrowon

नवीन द्राक्ष बाग (Grape Vine) उभारताना खुंट खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. खुंटांची लागवड ही फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केली जाते. त्यानंतर जमिनीमध्ये खुंट रोपांच्या मुळांचा विकास व नवीन फुटींचा विकास पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये होतो. वातावरणातील ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान व ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता ही स्थिती खुंटाच्या वाढीसाठी तसेच कलम करण्यासाठी फायदेशीर असते. प्रामुख्याने ऑगस्ट ते सप्टेंबर अखेरपर्यंतचा कालावधी द्राक्ष बागेत कलम करण्यासाठी योग्य मानला जातो. मात्र सध्या होत असलेल्या सततच्या पावसामुळे कलम करण्यास विलंब होऊ शकतो. कलम काडी आणि खुंट काडीची निवड करताना खालील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

The right time to graft in the vineyard
Grape Production : दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी हवे काटेकोर व्यवस्थापन

खुंटकाडीची कलम करण्यापूर्वीची तयारी
बागेत खुंटरोपाच्या बऱ्याच फुटी निघालेल्या दिसून येतील. या फुटींमध्ये काही बारीक, जाड, परिपक्व व तसेच अर्ध परिपक्व किंवा कोवळ्या काड्याही असतील. बागेतील प्रत्येक कलम यशस्वी होण्याकरिता प्रत्येक खुंटाच्या दोन काड्यांवर कलम केले जाते. या वेळी कलम करताना काडीची निवड सोपी व्हावी म्हणून प्रत्येक खुंटरोपाच्या तीन काड्या राखाव्यात. अतिरिक्त काड्या काढून टाकाव्यात. कलम करतेवेळी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काडी रसरशीत असावी. मात्र काही परिस्थितीमध्ये अशी काडी मिळवणे शक्य होत नाही. तेव्हा कलम सुरू करण्याच्या ४-५ दिवसांपूर्वी बागेत पाणी द्यावे. यामुळे काडीमध्ये रस तयार होण्यास मदत होईल.

खुंटांवरील रोग व कीडनियंत्रण
सतत पावसामुळे काही वेळा जुन्या पानांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये पानांच्या मागील बाजूस तांबूस पावडरचा थर दिसून येते. त्यावरील जिवाणूंमुळे पानांमधील रस शोषला जातो. देठ व पानांमधील मजबुती कमी होऊन पान गळून पडते. यामुळे काडीमध्ये रस कमी पडतो. कलम जोडणीमध्ये अडथळा येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील १.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करता येईल.

खुंटकाडीची निवड
-खुंट काडीची निवड करताना काडीची जाडी आठ ते दहा मि.मी. (पेन्सिल साइज) असावी.
-खुंटकाडी रसरशीत असावी.
-खुंटकाडीची उंची जमिनीपासून सव्वा फूट असावी.
-खुंटकाडीची वाढ जोमदार, सरळ व सशक्त असावी.
-खुंटकाडी ही अर्ध परिपक्व असावी.
-खुंटकाडी कीड व रोगमुक्त असावी.
-काडी निवडताना बऱ्याच वेळा हवी तशी काडी मिळत नाही, त्यासाठी चार ते पाच दिवस अगोदर बागेत पाणी द्यावे. त्यामुळे काडीमध्ये रस तयार होऊन कॅम्बिअम म्हणजेच झायलम आणि फायलम दरम्यानचा एक पेशींचा थर चांगला तयार होतो. कलम यशस्वी होण्यास मदत होते.

The right time to graft in the vineyard
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी करण्याचे तंत्र

१) रंगीत द्राक्षजाती ः फ्लेम सीडलेस, क्रीमसन सीडलेस, रेड ग्लोब, फँटसी सीडलेस, शरद सीडलेस या द्राक्ष जातींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
२) लांब मण्याच्या रंगीत द्राक्षजाती ः क्रिश्‍ना सीडलेस, सरिता सीडलेस, ज्योती सीडलेस इ.
३) हिरव्या द्राक्षजाती ः मांजरी नवीन, मांजरी किशमिश, थॉमसन सीडलेस, तास-ए-गणेश इ. या जातींचा वापर आपण खाण्यासाठी तसेच बेदाणा बनविण्यासाठी उपयोग करू शकतो.
४) हिरव्या लांब मण्याच्या द्राक्षजाती ः सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, आर.के.ई.

कलम करणे
-सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कलम करणारी व्यक्ती कलम करण्यात तरबेज असली पाहिजे.
-कलम करण्याअगोदर कलमकाडी कार्बेन्डाझिम ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावी. यामुळे काडीवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
-कलम करताना खुंट व कलमकताडीची जाडी सारखी असायला हवी. नसल्यास कोणत्याही एका बाजूने ती व्यवस्थित जुळवून घ्यावी, त्यामुळे कॅलस फॉर्मेशन चांगले होईल. कलम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. कलम केल्यानंतर कलम काडीमधून रस प्रवाहित होत असल्यास असे कलम यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते.
-कलम करतेवेळी कलम काडीला पाचर करताना एका बाजूला एकाच वेळी चाकूचा वापर करावा. वारंवार चाकूचा वापर केल्यास काडीला इजा होऊ शकते.
-कलम केलेल्या ठिकाणी पॉलिथिन योग्य प्रकारे व पक्क्या स्वरूपात बांधावे. बांधणी करताना नैसर्गिकरीत्या कुजणाऱ्या जैवविघटनशील पट्ट्या (बायोडिग्रेडेबल स्ट्रीप्स) वापराव्यात.
-कलम केल्यानंतर खुंट योग्य प्रकारे बांबूला बांधून घ्यावा. कलम केलेल्या ठिकाणी कुठलीही इजा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी.
-कलम केल्यानंतर खुंटावरील अतिरिक्त फुटवे काढून टाकावे.
-कलम यशस्वी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात फुटींवर येणाऱ्या रोग व किडींच्या नियंत्रणावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. उदा. केवडा (डाऊनी मिल्ड्यू), अळी, उडद्या व अन्य रस शोषक किडी इ.

कलम अयशस्वी होण्याची कारणे
-कलमकाडी निवडताना एक समान व योग्य आकाराच्या काडींची उपलब्धता न झाल्यामुळे खुंट व कलमकाडीमध्ये योग्य मिलाप होत नाही. कलम अयशस्वी होते.
-निवडलेल्या कलमकाडीवरील डोळे मृत असल्यास कलम यशस्वी होत नाही.
-कलम करतेवेळी खुंटकाडी व कलमकाडी यामधील आतील गराचा भाग आणि बाजूचा सालीचा भाग (फ्लोयम टू फ्लोयम आणि झायलम टू झायलम) योग्य प्रकारे जुळणे गरजेचे असते. असे न झाल्यास कलम अयशस्वी होते.
-बागेत खुंट लावलेला असताना काही शेतकरी आंतरपीक म्हणून उडीद, मूग आणि भुईमूग यांसारखी पिके घेतात. या पिकांमध्ये काही शेतकरी प्रोपिकोनॅझोल सारख्या बुरशीनाशकांचा वापर करतात. त्याचे तुषार खुंटावर उडाल्यास खुंटाच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच एकसारख्या फुटी मिळत नाहीत. त्यामुळे आंतरपिकावरही अशी फवारणी शक्यतो टाळावी.

अनिल थुट्टे, ७३५०२९८८५१
(पीएच. डी. संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(प्रमुख शास्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com