बऱ्याचशा बागेत फळकाढणी झालेली असून, पुन्हा खरडछाटणीचा कालावधी जवळ येत आहे. साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फळछाटणी घेतली असल्यास या वेळी बागेतील द्राक्ष काढणी पूर्ण झाली असेल. सध्या खरडछाटणी पुन्हा सुरू करण्यापूर्वी वेलीला विश्रांती देणे गरजेचे असेल. बऱ्याच वेळा बागायतदार फळकाढणी झाली की लगेच खरडछाटणी घेतात. या वेळी वेलीला विश्रांती कशा प्रकारे देता येईल, हे समजून घेऊ. वेलीवर एका काडीवर साधारणतः पाचशे ग्रॅम वजनाचा घड तयार झाला होता. या घडाच्या विकासामध्ये आठ ते दहा मि.मी. जाडीच्या काडीतून उपलब्ध अन्नद्रव्ये वापरली गेलेली असतात. या वेळी वेलीवरील काडी व पूर्ण वेल अशक्त झालेली दिसून येते. वेलीवर पानेही पिवळी पडलेली दिसून येतात. मण्यामध्ये गोडी उतरण्यासाठी बागायतदार फळकाढणीच्या आधी आठ ते दहा दिवसांपूर्वीपासून पाणी कमी करतात. त्यामुळेही वेलीला ताण बसलेला असतो. वाढत्या तापमानात वेल पूर्णपणे निस्तेज दिसून येते. याचाच अर्थ घडाच्या विकासामुळे झीज अधिक झालेली असेल. ही झीज भरून निघण्याकरिता वेलीला फक्त विश्रांतीच आवश्यक नाही, तर जमिनीतून खतांची उपलब्धता व ठिबकद्वारे पाण्याची उपलब्धता तितकीच महत्त्वाची असेल. फळकाढणी झाल्यानंतर साधारणतः वीस दिवसांचा कालावधी विश्रांतीचा समजावा. या कालावधीत नत्र आणि स्फुरदयुक्त खते द्यावीत. उदा. १८-४६-० हे खत २० ते २५ किलो प्रति एकर व युरिया पाच किलो ठिबकद्वारे द्यावीत. बागेत पाणी व्यवस्थापन अशा प्रकारे असावे की नवीन फुटी निघणार नाहीत आणि पानेही हिरवीगार राहतील. तापमानात वाढ होत असताना बाष्पीभवनाचा वेग समजून घेऊन पाण्याची उपलब्धता करावी. चारी घेणे खरडछाटणीपूर्वी १५ दिवस वेलीच्या बुंध्यापासून ९ ते १० इंच जागा सोडून दोन फूट रुंद व तीन ते चार इंच खोल असून चारी घ्यावी. ही चारी घेतल्यामुळे वेलीच्या मुळ्या तुटण्याची शक्यता असेल. साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत मुळ्या तुटल्या तरी चालू शकतात. मात्र तुटलेली मुळे जास्त काळ उघडी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. या चारीमध्ये दोन घमेले कुजलेले शेणखत, माती परीक्षणाच्या अहवालानुसार खतांचा वापर करावा.
प्रत्यक्ष छाटणी घेणे खरडछाटणीचा उद्देश म्हणजे मागील हंगामात वापरण्यात आलेली काडी या वेळी कापून नवीन फलधारीत काडी तयार करणे हा होय. एकसारख्या फुटी निघण्याकरिता प्रत्येक काडी एक डोळा राखून छाटून घ्यावी. यामुळे फुटी एकसारख्या निघण्यास मदत होईल. बऱ्याच वेळा उन्हाच्या तीव्रतेमुळे ओलांडा डागाळलेला असतो, अशा वेळी नवीन ओलांडा तयार करणे फायद्याचे होते. हा ओलांडा वाढवतेवेळी मागील हंगामातील जाड काडी चार ते पाच डोळे राखून कापून घ्यावी. ती ओलांड्याकरिता तारेवर बांधून घ्यावी. हायड्रोजन सायनामाईड हे फक्त जुन्या ओलांड्यावर पेस्टिंग करावे. नव्या ओलांडा तसाच सोडावा. अन्यथा, नवीन काडीवर डोळे लवकर फुटतील व जुना ओलांडा तसाच राहील. हायड्रोजन सायनामाइडचा वापर खरडछाटणीनंतर डोळे फुटण्यासाठी ऑक्टोबर छाटणीच्या तुलनेत जास्त कालावधी लागतो. बागेतील वाढलेले तापमान व कमी झालेली आर्द्रता यामुळे डोळे फुटण्यास अडचणी येतील. डोळे एकसारखे व लवकर फुटावेत, यासाठी हायड्रोजन सायनामाईड कमीत कमी घेऊन (२० ते २५ मिलि प्रति लिटर पाणी) वापर करावा. बऱ्याचदा मजुरांच्या उपलब्धतेअभावी पेस्टिंग करणे टाळले जाते. मात्र नॅपसॅक पंपाचा वापर करून नोझलद्वारे फक्त ओलांड्यावर फवारणी होईल, असे ॲडजस्ट करून फवारणी करता येईल. डोळे फुटण्याकरिता बागेतील वातावरण (कमी तापमान व जास्त आर्द्रता) महत्त्वाची असते. एप्रिल महिन्यात खरडछाटणी झालेल्या बागेत ही परिस्थिती उपलब्ध होत नाही. अशा वेळी खरडछाटणीच्या पाच ते सहाव्या दिवसापासून १४ ते १५ व्या दिवसापर्यंत सकाळी (११ ते १ च्या दरम्यान) व दुपारी (२ ते ४ च्या दरम्यान) ओलांड्यावर पाण्याची फवारणी करावी. बऱ्याच वेळा बागायतदार बागेत मोकळे पाणी देण्याचा प्रयत्न करतात. मात्र जमिनीपासून ओलांड्यापर्यंतचे अंतर जास्त असल्यामुळे वाढलेल्या तापमानात आर्द्रता तयार होत नाही. वापरलेल्या पाण्याच्या प्रमाणाचा विचार करता परिणाम फारच कमी मिळतात.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.