संत्र्याच्या आंबिया बहर फुटीवर प्रश्‍नचिन्ह

संत्र्याचा आंबिया बहर फुटण्याकरिता दमट वातावरणाची गरज राहते. मात्र गेल्या आठवडाभरापासून तापमान कमी होत गारवा निर्माण झाल्याने आंबिया बहर फुटीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
Question mark on orange blossom feet
Question mark on orange blossom feet
Published on
Updated on

नागपूर : संत्र्याचा आंबिया बहर फुटण्याकरिता दमट वातावरणाची गरज राहते. मात्र गेल्या आठवडाभरापासून तापमान कमी होत गारवा निर्माण झाल्याने आंबिया बहर फुटीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे संत्र्यांची राज्याची पाच लाख टनांची उत्पादकता तब्बल दोन लाख टनांनी कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान यामुळे होण्याची भीती असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे संत्रा उत्पादक जेरीस आले आहेत. राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर एकूण संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधिक १ लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी या दोन तालुक्यांतच आहे. २५ हजार हेक्टर संत्रा लागवड ही नागपूर जिल्ह्यात असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. आंबिया व मृग हे दोन बहर संत्रा उत्पादक घेतात. परंतु गेल्या काही वर्षांत वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने बहराचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. बाग ताणावर सोडल्यानंतर दमट वातावरण व जानेवारीतील तापमानात होणारी वाढ हे फुलधारणेसाठी पोषक राहते. परंतु या वर्षी २८ डिसेंबरला पहिला पाऊस झाला. 

तब्बल चार तास पावसाची नोंद संत्रापट्ट्यात झाली. पुन्हा बारा दिवसांच्या खंडानंतर पाऊस, गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे पूर्ण  नियोजन कोलमडले आहे. आंबिया बहर घेण्यासाठी बाग १ डिसेंबरपासून ताणावर सोडली जाते. त्यानंतर दहा ते पंधरा जानेवारीपासून बागेला पाणी दिले जाते. जानेवारी अखेर ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फुलधारणेला सुरुवात होते. या दरम्यान १४ जानेवारीपासून तापमानात होणारी वाढ फुटीला पोषक ठरते. परंतु आता थंडीमुळे हे सारे चक्र प्रभावित झाले आहे. विदर्भात संत्रा लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. ६० टक्के बागायतदार आंबिया बहर घेतात. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे सर्व शेतकरी हा बहर घेतात. यात फळधारणेची शक्यता अधिक राहते. मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामध्ये फळधारणेबाबत मोठी अनिश्‍चितता राहते. गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचे विपरीत परिणाम संत्रापट्ट्यात अनुभवले जात आहेत. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. परिणामी, संत्रा उत्पादक अस्वस्थ आहे. त्याचा फटका बसत यंदाच्या हंगामात आंबिया बहराची उत्पादकता २ लाख टनांनी कमी होईल, अशी स्थिती आहे, असे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील संत्रा उत्पादक मनोज जवंजाळ यांनी सांगितले. 

महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले की, डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. सद्यःस्थितीत वातावरणातील मोठ्या बदलाचे आव्हान आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी  विद्यापीठ तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने उपाययोजनांची शिफारस करणे अपेक्षित आहे. ताण मध्येच तुटल्याने आंबिया बहर घेण्यासाठी काय करावे, यासंदर्भात उपाययोजना सांगितल्या पाहिजे. याविषयी आम्ही दोन्ही संस्थांना पत्रदेखील लिहिणार आहोत. परंतु त्यापूर्वीच आपली जबाबदारी ओळखत दोन्ही संस्थांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. दीड लाख टनापेक्षा अधिक उत्पादकता प्रभावित होईल, असे वाटते.

डिसेंबरमध्ये बाग ताणावर सोडल्यानंतर जानेवारीमध्ये पाणी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे उत्पादनावर विशेष परिणाम होण्याची शक्यता वाटत नाही. तरीसुद्धा सूर्यप्रकाश व इतर कारणांमुळे सिस्टीम ब्रेक झाली आहे. त्याचा परिणाम किती होतो हे सांगणे तूर्तास कठीण आहे.  - डॉ. दिलीपकुमार घोष, संचालक,  केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com