
Millipede Pest Management : डॉ. डी. बी. उंदीरवाडे
विदर्भातील काही भागांमध्ये उपलब्ध पाणी किंवा पावसावर पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा पिकांवर सुरुवातीच्या काळात. मिलीपीड (म्हणजेच पैसा किंवा वाणी) या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
ही एक निशाचर कीड असून, सामान्यतः सडणारी पाने, काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती इ. वर उपजीविका करते. सामान्यतः जमिनीवर पडलेल्या कुजलेल्या काडीकचऱ्याच्या विघटनामध्ये मदत करणारा सजीव आहे. मात्र त्यांची संख्या वाढल्यानंतर अंकुरलेल्या बिया, रोपांचे नुकसान करतात. त्यांनी कुरतडल्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.
जीवनक्रम : मिलीपीडच्या अवस्था - अंडी, अळी व प्रौढ.
एक मादी साधारण ३०० अंडी जमिनीत काही इंच खोलीवर घालते. त्यातून बाहेर येणारी अळी पाच अवस्थांतून जाते. त्यानंतर येणारी प्रौढ अवस्था प्रदीर्घ काळ चालते. संपूर्ण जीवनक्रम हा पाच ते सात वर्षांत पूर्ण होतो.
या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आर्द्रता आवश्यक असते. पावसाळ्यात किंवा ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी ही कीड जास्त सक्रिय असते. हवामान अनुकूल नसल्यास ही कीड जमिनीत सुप्तावस्थेत राहते.
मिलीपीडचा (वाणी) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना ः
१) शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेला काडीकचरा गोळा करून नष्ट करावा. वाणी ही कीड रात्री सक्रिय असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून सकाळी त्याखालील वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.
२) शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करावीत. विशेषतः बांधावरील गवत, दगड काढून बांध मोकळा ठेवावा. बऱ्याचदा आर्द्रता, घनदाट पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवणे यामुळे वाणीचा प्रादुर्भाव वाढतो.
३) जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसांतच वाणी मरतात.
४) ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केली आहे, तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
५) पिकामध्ये वेळेवर कोळपणी केल्यास जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील.
६) चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.
रासायनिक उपाययोजना ः
वारंवार या किडीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी पेरणीपूर्वी कार्बोसल्फान (६ टक्के दाणेदार) किंवा क्लोरपायरिफॉस (१० टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्का) यापैकी एक कीटकनाशक ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टर शेतात पसरवावे.
पेरणी झाल्यावर रोप उगवल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ३७.५ मिलि प्रति १० लिटर पाणी या द्रावणाचे ड्रेंचिंग करावे. पंपाचे नोझल सैल करून रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत प्रति एकरी ४० पंपाचे ड्रेंचिंग पुरेसे होईल.
किंवा क्लोरपायरिफॉस (५० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) (संयुक्त कीटकनाशक) १.५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे शक्यतो सायंकाळी फवारणी करावी. या कीटकनाशकाची शिफारस मिलीपीड (वाणी)साठी नाही. मात्र कापूस पिकामध्ये अन्य किडींसाठी आहे.
डॉ. डी. बी. उंदीरवाडे, ९८५०८ १९९९२
(प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.