Citrus Pest, Diseases : ग्रीनिंग रोग, सिट्रस सायला किडीचे व्यवस्थापन

Citrus Pest, Diseases Management :सद्यःस्थितीत ग्रीनिंग किंवा मंद ऱ्हास हा रोग संत्रा, मोसंबी, लिंबू अशा लिंबूवर्गीय फळपिकातील सर्वांत महत्त्वाचा आणि विनाशकारी रोग आहे. त्याचा प्रसार मराठवाडा व विदर्भामध्ये वाढत चालला आहे.
Citrus Pest
Citrus PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. योगेश मात्रे, डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. अनंत बडगुजर

सिट्रस ग्रीनिंग :
citrus psylla pest : सद्यःस्थितीत ग्रीनिंग किंवा मंद ऱ्हास हा रोग संत्रा, मोसंबी, लिंबू अशा लिंबूवर्गीय फळपिकातील सर्वांत महत्त्वाचा आणि विनाशकारी रोग आहे. त्याचा प्रसार मराठवाडा व विदर्भामध्ये वाढत चालला आहे. भारतात १९६० च्या दशकात प्रथम नोंद झालेल्या या रोगामुळे लिंबूवर्गीय फळझाडे कमजोर होतात. फांदी मर व ऱ्हास होतो. हा रोग कंडीडेट्‌स लीबेरीबॅक्टर एशियाटीकस या जिवाणूमुळे होतो. एकदा जिवाणूचा शिरकाव झाडामध्ये झाल्यानंतर झाड जिवंत असेपर्यंत तो सक्रिय राहतो. तो झाडातील अन्नपुरवठा करणाऱ्या उतीमध्ये राहतो.

ग्रीनिंग रोगाची लक्षणे :
-जिवाणूचा संसर्ग झाल्यानंतर पानांच्या शिरामधील भाग पिवळा होण्यास सुरुवात होते. पिवळेपणा मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंस समान नसतो. पाने शेवटी पिवळी पडतात. यापैकी बऱ्याच पानांवर अनेक हिरवे ठिपके आढळून येतात.
- रोगग्रस्त झाडावरील पानावर चट्टे दिसतात. पानावर इंग्रजीतील ‘व्ही’ आकाराच्या खाचा तयार होतात. पानांच्या खालच्या बाजूवरील शिरा फुगतात. शिरामधील पानांचा भाग पिवळा पडतो.
-कालांतराने रोगग्रस्त पाने फांद्यांच्या शेंड्याकडून गळण्यास सुरुवात होते.
-रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ३ ते ४ वर्षांत झाडाचा ऱ्हास होतो.
-रोगग्रस्त झाडास येणारी फळे आकाराने लहान राहतात. त्यांची वाढ असमतोल होते. फळाच्या आतील बिया सुरकुतलेल्या असतात. किंवा फळे बीजविरहित असतात.
-फळांच्या रसाची चव कडू होते.
-रोगग्रस्त फळांचा देठाकडील भाग पिवळा नारंगी होऊन खालील भाग अत्याधिक हिरवा होतो.

Citrus Pest
Citrus Crop : ग्रीनिंग रोग अन् सिट्रस सायला किडीचे व्यवस्थापन

रोगाचा प्रसार :
-नवीन कलम तयार करतेवेळी संसर्गग्रस्त बडवूड (कांडी)पासून पसरतो. ग्रीनिंगग्रस्त मातृवृक्षाचे डोळे कलम तयार करण्यासाठी वापरले गेल्यास होतो. रोगग्रस्त झाडापासून डोळे काढण्यासाठी वापरलेल्या अवजारामुळेही रोगाचा प्रसार होतो.
- बागेमध्ये सिट्रस सायला (शा. नाव - डायफोरनियाना सिट्री) या किडीमुळे या रोगाच्या प्रसारास मदत होते.

नियंत्रणासाठी
रोगमुक्त रोपांची लागवड, लागवड सामग्रीची खात्री करणे, सिट्रस सायला नियंत्रण, पोषक घटकांचा पुरेपूर वापर आणि योग्य पाणी व्यवस्थापन याच रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपलब्ध उपाययोजना आहेत.

Citrus Pest
Citrus Pest : लिंबूवर्गीय फळपिकांतील सिट्रस सायला, ग्रीनिंगचे व्यवस्थापन

सिट्रस सायला :
(शा. नाव - डायफोरनियाना सिट्री)
संत्रावर्गीय झाडावर येणारी महत्त्वाची कीड.
झाडावर नवती, बहर फुटायला सुरुवात होताच प्रादुर्भावास सुरुवात.
जून, जुलैमधील मृग बहर आणि फेब्रुवारी, मार्चमधील आंबिया बहरावर प्रादुर्भाव जास्त असतो.

ओळख :
या किडीचा प्रौढ पिवळसर करड्या रंगाचा असून, पंखांच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो.
पिले मळकट रंगाची असतात. या किडींची पिले कोवळी पाने व फांद्या यातून रसशोषण करतात. त्यामुळे कोवळी पाने व कळ्यांची गळ होते. प्रादुर्भाव झालेल्या झाडावर बारीक साखरेसारखा पदार्थ दिसणे. ही या किडीचा प्रादुर्भाव झाल्याची ओळख आहे. त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

नुकसान :
१) पूर्ण वाढ झालेले कीटक व पिले हा कोवळी पाने, नवती, कळ्या, फुले, बारीक कोवळ्या फांद्यातून रस शोषतात. बारीक नवती व
कळ्यांची भारी गळ होते. फळ धारणेवर विपरीत परिणाम होतो.
२) नवतीची थोडी मोठी पाने वाकडी तिकडी चुरगळल्यासारखी दिसतात.
३) पिलांच्या शरीरातून स्रवलेल्या साखरेसारख्या चिकट पदार्थांवर काळी बुरशी वाढते. परिणामी, अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा येते.
४) अधिक प्रादुर्भावामध्ये शेंड्याकडील लहान फांद्यासुद्धा वाळतात. अशा फांद्यावर बहरावेळी फलधारणा होत नाही.
५) या किडीमुळे ग्रीनिंग रोगाचा प्रसार होतो. नवती आल्यावर व पाण्याचा खंड पडल्यास प्रादुर्भाव जास्त वाढतो. अशा वेळी सतर्क राहून त्वरित फवारणी करावी.

व्यवस्थापन :
१) झाडावर भरपूर पालवी राहावी, यासाठी अन्नद्रव्याचा शिफारशीनुसार वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास त्वरित पुरवठा करावा.
२) रोगमुक्त मातृवृक्षापासून कलम कांडी निवडाव्यात. रोगमुक्त प्रमाणित कलमांचाच लागवडीसाठी वापर करावा.
३) एखाद्या फांदीमध्ये ग्रीनिंगची लक्षणे दिसल्यास तेवढीच फांदी तत्काळ कापून नष्ट करावी. अधिक प्रमाणात प्रकोप असल्यास बाधित झाडे मुळासकट उपटून, जाळून नष्ट करावीत.
४) फांद्याच्या कापणीसाठी वापरली जाणारे अवजारे सोडिअम हायपोक्लोराइट (१ टक्का) द्रावणाने निर्जंतुक करावीत.
५) सिट्र्स सायला या किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे (३० बाय ४० सेंमी आकाराच्या फोमशीटपासून बनविलेले घरगुती किंवा तत्सम आकाराचे बाजारात उपलब्ध) ३० ते ४० प्रति एकर लावावे. हे चिकट सापळे फेब्रुवारी ते नोव्हेंबर दरम्यान लावावे.
६) ढालकिडा, क्रायसोपा, सिरफीड माशी, टॅमरॅक्सिया रॅडीयाटा इ. मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
७) पर्यायी खाद्य वनस्पती (कढीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये किंवा आजूबाजूस असू नये. कारण ही झाडे सायला किडीचे खाद्य असून, प्रजाननाचे फार मोठे स्रोत ठरू शकतात.
८) सिट्र्स सायला या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति १० लिटर पाणी
थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १ मि.लि.
गरज भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून दुसरी फवारणी करावी.
--------------------------------------------------
डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७,
डॉ. पी. एस. नेहरकर (विभाग प्रमुख), ९८२२९३६९८६
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com