Grape Crop Management : द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील व्यवस्थापन

Vineyard Management : एप्रिल महिन्यात केलेल्या खरडछाटणीनंतर द्राक्षवेल ही वाढीच्या विविध अवस्थेमधून जात असते. त्यामध्ये शाकीय वाढ, सूक्ष्मघड निर्मिती व काडीची परिपक्वता या महत्त्वाच्या अवस्था असतात.
Grape Crop Management
Grape Crop ManagementAgrowon

डॉ. निशांत देशमुख, सुदर्शन गाट, डॉ. प्रशांत निकुंबे
-----------------------------------------------
Grape Crop : एप्रिल महिन्यात केलेल्या खरडछाटणीनंतर द्राक्षवेल (Grape Vine) ही वाढीच्या विविध अवस्थेमधून जात असते. त्यामध्ये शाकीय वाढ, सूक्ष्मघड निर्मिती व काडीची परिपक्वता या महत्त्वाच्या अवस्था असतात. खरड छाटणी साधारणत: १० ते १५ एप्रिलच्या दरम्यान केलेल्या बागा सध्या सूक्ष्मघड निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात असतील. या वेली आता काही दिवसांतच काडीच्या परिपक्वतेच्या अवस्थेत प्रवेश करतील.

या स्थितीमध्ये बागेत पाऊस झाल्यास घडनिर्मितीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. ज्या बागेत घडनिर्मितीची अवस्था संपून काडी परिपक्व होण्याच्या अवस्थेत प्रवेश केलेली असल्यास त्या वेलीची काडी परिपक्व होण्यास उशीर होतो. पावसाने वेलीच्या वाढीचा जोम जास्त प्रमाणात राहिल्यास वेलीतील तयार झालेले अन्नद्रव्यसुद्धा (Nutrients) नवीन फुटीमध्ये वाया जाते. अशा बागांमध्ये खालील प्रमाणे उपाययोजना महत्त्वाच्या असतील.

शेंडा पिंचिंग करणे :
बागेत या वेळी वाढत असलेली शेंडावाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. जोमाने वाढत असलेला नवीन शेंडा खुडून घ्यावा. हा शेंडा बऱ्याच वेळा वरून ३-४ पाने खुडला जातो. यामुळे लगेच बगलफुटी जोमात निघतात.

यालाच ‘हार्ड पिंचिंग’सुद्धा म्हटले जाते. वाढीच्या या अवस्थेत हार्ड पिंचिंगच्या ऐवजी टोकाकडील न उघडलेली टिकलीसारखी पाने खुडल्यास नवीन फूट वर येणार नाही. यालाच ‘टिकली मारणे’ सुद्धा म्हणतात. असे केल्यास काडीच्या पेऱ्यातील अंतर कमी राहण्यासोबत जाड काडी मिळण्यास मदत होईल.

बगलफुटी काढणे :
या वातावरणात बागेत बगल फुटींची वाढसुद्धा तितक्याच जोमात होताना दिसून येईल. या वेळी जरी काडीच्या परिपक्वतेचा कालावधी असला तरी बागेमध्ये सूक्ष्मघड निर्मितीही शेवटच्या टप्प्यात असते. अशा वेळी सूक्ष्म घडनिर्मिती चांगली होणे व सूक्ष्मघड निर्मितीचा डोळा मजबूत होणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात.

यासाठी काडीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडणे गरजेचे असते. काडीवर निघालेल्या बगलफुटीमुळे डोळ्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही. परिणामी काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल. दुसऱ्या परिस्थितीमध्ये काडीवर निघालेल्या बगलफुटींमुळे कॅनॉपीमध्ये गर्दी वाढेल. याच कॅनॉपीमध्ये पाने जुनी होत असताना भुरी रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढू शकतो. या दोन्हीवर नियंत्रणासाठी बागेत निघालेली बगलफूट कमी करणे गरजेचे असेल.

Grape Crop Management
Grape Management : द्राक्ष बागेत सध्या कोणत्या समस्या येऊ शकतात?

काडीच्या तळातील पाने काढणे :
वेलीच्या वाढीच्या या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. ओलांड्यावर असलेली साल या वेळी पावसामुळे कुजलेली दिसेल. अशा वेळी पाऊस आल्यानंतर ही साल पाणी धरून ठेवते.

ऊन पडायला सुरुवात झाल्यानंतर ओलांड्यावर जास्त प्रमाणात आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतो. तळातील २-३ पाने काढून टाकल्यास ओलांड्यावर आर्द्रता वाढणार नाही. म्हणजेच रोगाचे प्रमाणसुद्धा कमी राहण्यास मदत होईल.

काड्या तारेवर बांधून घेणे :
बऱ्याच बागेमध्ये फुटींची वाढ होत असताना काड्या एकमेकांवर पडलेल्या दिसतात. या काड्या मोकळ्या करून तारेवर सुतळीने बांधून घ्याव्यात. यामुळे कॅनॉपी मोकळी राहील. कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण व त्यावर आधारित रोगाचा प्रसारही कमी राहील.

मोकळ्या कॅनॉपीमध्ये प्रत्येक काडीवर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे काडीची परिपक्वता लवकर मिळण्यास मदत होईल. ही काडी सूक्ष्मघड निर्मितीच्या कालावधीमध्ये हिरवी व कच्ची असते. त्यामुळे त्या वेळी अलग करून बांधतेवेळी (तारेवर) तुटण्याची भीती असते. परंतु या वेळी काडी जुनी होत असल्यामुळे तुटण्याची समस्या नसते.

Grape Crop Management
Grape Management : द्राक्ष बागेत कलम करण्याची योग्य वेळ

अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे :
द्राक्ष बागेत वाढ नियंत्रणात ठेवून काडीची परिपक्वता आणण्याकरिता या वेळी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. या वेळी काडीची
वाढ गरजेची नाही. त्यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर कमी किंवा बंद करावा. पावसाळी वातावरणात वेल हवेतून नायट्रेट रूपातील नायट्रोजन घेऊन आपली गरज पूर्ण करते. म्हणूनच या काळात फुटीच्या वाढीचा जोम जास्त असतो. ही वाढ कमी राखण्यासाठी पालाशयुक्त खतांचा वापर करावा. एकतर स्फुरद + पालाश किंवा फक्त पालाश उपलब्ध असलेल्या खतांच्या ग्रेड वापराव्यात. सोबतच शिफारशीनुसार ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पालाश उपलब्ध असलेल्या खतांची २-३ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

त्याचा काडीची वाढ नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. काडीची परिपक्वता सुद्धा मिळते. बऱ्याच वेळा वेलीवर अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भावसुद्धा जास्त प्रमाणात दिसून येतो. विशेष म्हणजे पालाशच्या कमतरतेमुळे पानांच्या वाट्या झालेल्या दिसून येतात. यामुळे पानाची वाटी झालेल्या भागात भुरी रोगाच्या बिजाणूंचा प्रसार जास्त प्रमाणात होतो.

बुरशीनाशकांची फवारणी करतेवेळी व्यवस्थित कव्हरेज न मिळाल्याने रोगनियंत्रणही कठीण होते. त्यामुळे वेलीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता राहणार नाही याची काळजी घ्यावी. याकरिता खरड छाटणीनंतर ४५ व्या दिवशी काडीवर ५ व्या क्रमांकाचे पान काढून त्या पानाच्या देठाची तपासणी करावी.

काडीवर गाठी येणे किंवा चिरणे :
बागेमध्ये फलधारित काड्या तयार करण्याच्या काळात वेलीमध्ये जिबरेलिन्स आवश्यक त्या प्रमाणात असल्यास वेलीची शाकीय वाढसुद्धा प्रमाणात होते. मात्र जर सायटोकायनीन वेलीमध्ये जास्त झाल्यास वाढ खुंटेल. त्याचा दाब वेलीच्या वाढीवर निर्माण होईल. घडनिर्मितीकरिता या वेळी ६ बीए, युरासील व इतर वाढ विरोधकांची फवारणी केली जाते.

त्यामुळे सायटोकायनीनचा पुरवठा वाढतो. सोबत बाजारात उपलब्ध टॉनिकचाही जास्त प्रमाणात वापर केला जातो. जास्त तापमानाच्या काळामध्ये बागेत पाण्याचा तुटवडाही असतो. त्याच वेळी सायटोकायनीनची पातळी वाढल्यामुळे बागेत काडीवर गाठी येणे किंवा चिरण्याची समस्या दिसून येते. त्यासाठी खालील प्रकारे व्यवस्थापन करावे.


१) सायटोकायनिनयुक्त संजीवकाचा व टॉनिकचा जास्त प्रमाणात वापर टाळावा.
२) बागेत पाण्याचा वापर संतुलित असावा.
३) वरील परिस्थिती आढळताच शेंड्याकडील २ ते ३ पाने पुन्हा वाढू द्यावीत.
४) नत्राचा पुरवठा जमिनीतून करावा. सोबतच २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.

रोग व कीड नियंत्रण महत्त्वाचे :
या वेळी बागेत जुनी होत असलेली पाने व वाढलेल्या कॅनॉपीसोबत कमी झालेले तापमान भुरी रोगाच्या प्रसारास मदत करते. या रोगांचे बिजाणू पानांमधून व देठांमधून रस शोषून घेतात. परिणामी, पानगळ व्हायला सुरुवात होते. ज्या काडीवर पानगळ झाली अशा काड्या हिरव्या राहतात. या काड्या फळछाटणीच्या वेळी काढून टाकाव्या लागतात. काडीवर पाने नसल्यास प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे अन्नद्रव्यही तयार करणे शक्य होत नाही.


याच कॅनॉपीमध्ये २ ते ३ दिवस सतत पाऊस सुरू असल्यास व आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आढळून येतो. यावर उपाययोजना म्हणून बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. द्राक्षवेल सशक्त असल्यास सहजासहजी रोगास बळी पडणार नाही. या वेळी वातावरणात आर्द्रता ८० टक्क्यांपुढे आणि तापमानही ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असल्यामुळे जैविक नियंत्रणाचा वापर फायद्याचा ठरू शकतो. गर्दी असलेल्या कॅनॉपीमध्ये कव्हरेज अभावी लक्ष्यापर्यंत बुरशीनाशके पोहोचत नाही.

अशा स्थितीतही जैविक नियंत्रणाची फवारणी फायद्याची ठरते. कारण जिवाणू वाढीस पोषक वातावरण असल्यामुळे त्याचे परिणाम चांगले मिळतात. बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रायकोडर्मा व्हिरीडी, व्हर्टिसिलीयम लेकॅनी, बॅसिलस सबटिलिस, सुडोमोनस फ्लुरोसन्स किंवा बिव्हेरिया बॅसियाना या पैकी आवश्यक त्या जैविक नियंत्रक घटकाची २ ते ३ वेळा फवारणी २ ते ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

त्यामुळे द्राक्षवेल सशक्त होऊन रोगनियंत्रण करणे सोपे होते. या करिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने तयार केलेले मांजरी वाईनगार्ड द्रावण स्वरूपात व ट्रायकोशक्ती पावडर स्वरूपात उपलब्ध आहे.  फवारणीसाठी मांजरी वाईनगार्ड २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी आणि ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर  ठिबक  किंवा ड्रेंचिंगद्वारे द्यावे.  

डॉ. निशांत देशमुख, ८९७४०३६७४७
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com