Ragi Crop : महाराष्ट्रात नाचणी हे पीक (Ragi Crop) प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर आणि नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या तीन विभागात प्रामुख्याने रायगड, ठाणे सिंधुदुर्ग तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, नगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो.
एकूण क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील नागली पिकाचे (Nagli Crop) क्षेत्र सर्वात जास्त आहे. अलीकडे उन्हाळी नाचणी लागवडीचे प्रयोग झाले.
मात्र नाचणी हे प्रामुख्याने खरीप हंगामातील (Kharif Season) पीक आहे. खरीप हंगामात या पिकाची पेरणी जून ते जुलै महिन्यात केली जाते.
नाचणी लागवडीसाठी हलक्या ते मध्यम प्रतीची, चांगले सेंद्रिय पदार्थ असणारी, ५.५ ते ८.५ सामू असणारी जमीन योग्य असते. जमिनीची नांगरट करून पुरेसे शेणखत मिसळावे.
हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्याची गरज नाही.
जमिनीतील पूर्वीच्या पिकाची धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकावा, त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होत नाही.
लागवड तंत्र
३० x १० सें.मी. अंतरावर पाभरीने पेरणी केल्यास हेक्टरी दहा किलो बियाणे लागते.
पुनर्लागवड पद्धतीने बियाणे पेरणी केल्यास पाच किलो प्रतिहेक्टरी बियाणे लागते. जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात बियाणे गादी वाफ्यावर पेरून शेतात त्याची पुनर्लागवड करावी.
गादीवाफे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. ५ x १ मी. आकाराचे गादी वाफे तयार करून पेरणी करावी.
हळव्या जातीची रोपे २१ दिवसांची झाल्यानंतर २२.५ सें.मी. बाय १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.
गरव्या व निमगरव्या जातीची लागवडीसाठी रोपे २५ ते ३० दिवसांची वापरावीत. लागवडीसाठी व्ही. आर ७०८, व्ही. एल १४९, पी. ई. एस. ४००, दापोली १, एच. आर. ३७४, फुले नाचणीच्या सुधारित जातींची निवड करावी.
रोपवाटिका : एक हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. पाच गुंठे क्षेत्र रोपवाटिकेसाठी पाच क्विंटल शेणखत गादी वाफ्यावर मिसळावे. बियाणे गादी वाफ्यावर पेरणी केल्यानंतर १० ते १२ दिवसांनी प्रतिगुंठा ५०० ग्रॅम युरिया द्यावा.
पुनर्लागवड : पुनर्लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी पाच टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी २५ किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २५ किलो पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले २५ किलो नत्र प्रतिहेक्टर पुनर्लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.
आंतरमशागत : लागवडीनंतर साधारणपणे दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी दाट झाली असल्यास पहिल्या २० ते २५ दिवसांपर्यंत विरळणी करून एका जागी एकच जोमदार रोप ठेवावे. कारण दाट पेरणी झाल्यास फुटवा कमी होऊन उत्पादन घटते.
युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर
गादी वाफ्यावर रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागवड २० x ४० सें.मी. जोडओळ पद्धतीने करावी.
दोन ओळींतील अंतर २० सें.मी. ठेवून शिफारशीत खतमात्रेच्या ७५ टक्के खतमात्रा (नत्र ४५ किलो अधिक स्फुरद २२.५ किलो प्रतिहेक्टर) ब्रिकेट स्वरूपात द्यावी.
ब्रिकेट देताना २० सें.मी.च्या जोडओळीत ३५ सें.मी. अंतरावर ५ ते ७ सें.मी. खोलीवर २.७ ग्रॅमची एक ब्रिकेट खोचावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.