Paddy
PaddyAgrowon

Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

पिकाची उत्तम वाढ, तसेच जमिनीची जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकता टिकविण्यासाठी माती परिक्षण अहवालानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

पिकाची उत्तम वाढ, तसेच जमिनीची जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकता (Soil Fertility) टिकविण्यासाठी माती परिक्षण अहवालानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन (Integrated Fertilizer Management) करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा (Organic Priorities) वापर, जैविक आणि रासायनिक खतांचा (Fertilizer) संतुलित वापर करणे गरजेचे आहे.

१) सेंद्रिय खतांचा वापर - जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यामध्ये सेंद्रिय खते महत्त्वाची आहेत. हे दोन्ही गुणधर्म चांगले असल्यास जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेमुळे सूक्ष्म जिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहते. पाण्याचा निचरा पुरेसा होतो. जलधारणक्षमता वाढते. हे फायदे मिळवण्यासाठी नांगरणीवेळी हेक्टरी १० ते १२.५ मे. टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.

Paddy
Paddy : जुलैच्या पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्यात

२) भातपिकाच्या अवशेषांचा (पेंढ्याचा) फेरवापर : भात पेंढ्याचे बारीक तुकडे करून पहिल्या नांगरणीवेळी हेक्टरी २ टन प्रमाणात गाडावेत. पावसाळ्यातील पहिल्या काही पावसामध्ये कुजण्याची प्रक्रिया घडून चिखलणीवेळी मातीत उत्तम जातो.

फायदे :-

१. भात पिकांना सिलिकॉन १००-१२० किलो व पालाश २०-२५ किलो इतका पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थात वाढ होते.

२. रोपे निरोगी व कणखर होतात.

३. रोपांमध्ये खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

४. भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

३) हिरवळीची खते : शेतात लागवड केलेले हिरवळीचे पीक ४ ते ६ आठवड्याने फुलोऱ्यावर येते. ही पिके शक्यतो द्विदलवर्गीय असून, ती हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. ही पिके हलक्या जमिनीतसुद्घा जोमाने वाढणारे व कमी पाण्यावर येणारे असते. त्याची खोडे कोवळी व लुसलुशित असल्याने ती लवकर कुजतात.

खताची पिके :

अ) गिरीपुष्प - हे कुठल्याही जमिनीत चांगले येते. बांधावर अथवा पडीक जमिनीत लागवड शक्य. प्रत्येक झाडापासून छाटणीनंतर २५-३० किलो हिरवा पाला मिळतो. ३ टन पाला प्रति हेक्टरी चिखलणीवेळी गाडल्यास भातरोपांना सेंद्रिय-नत्र (हेक्टरी १० ते १५ किलो) वेळेवर मिळते. गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात, त्यामुळे पुढील काळातील उंदरामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते.

Paddy
Paddy : यंत्राद्वारे भात लागवड करून खर्चात बचत करावी

ब) ताग - सर्व प्रकारच्या जमिनीत ताग चांगले वाढत असले तरी पाणथळ जमिनीत चांगले वाढत नाही. हेक्टरी ५०-६० किलो बी लागते. पीक ६० ते ७० सें.मी वाढते. चिखलणीच्या वेळी हेक्टरी १० टन जमिनीत गाडावे. नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असल्यास हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र पिकाला मिळतो. या पिकाला सिंचनाची गरज असते.

क) धैंचा - हे पीक कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारयुक्त अथवा आम्लधर्मीय जमिनीतसुद्धा तग धरू शकते. मुळांवर गाठी असतात. लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बी लागते. पीक ९० ते १०० सें.मी. वाढते. १८ ते २० टन हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. त्यातून नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असल्यास हेक्टरी ८० किलो नत्र पिकास उपलब्ध होते. चिखलणीवेळी हेक्टरी १० टन हिरवळीचे धैंचा पीक जमिनीत गाडावे.

३) जैविक खते : जमिनीत असलेल्या अनेक प्रकारच्या सूक्ष्म जिवाणूंपैकी निवडक उपयुक्त जिवाणूपासून संवर्धके तयार केलेली असतात. त्यामुळे मुळांभोवती अनुकूल वातावरण तयार होते. जिवाणूंपैकी काही जिवाणू रोगप्रतिबंधक वातावरण निर्माण करतात. त्यामुळे पिकांना पोषकद्रव्ये अथवा रोगापासून संरक्षण मिळते.

अ) अ‍ॅझोटोबॅकटर : जमिनीमध्ये हे जिवाणू मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात. हवेतील मुक्त नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात. २५० ग्रॅम प्रति १० किलो भात बियाणे या पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

ब) स्फुरद विरघळणारे जिवाणू खत : जमिनीत विरघळण्यास कठीण

अशा अन्नद्रव्यांमध्ये स्फुरदाचा क्रमांक पहिला लागतो. रासायनिक खताद्वारे दिलेले स्फुरदही कोणत्या ना कोणत्या रासायनिक स्वरूपात मातीमध्ये स्थिर होते. त्यामुळे वनस्पती त्याचे शोषण करू शकत नाही. या स्थिर स्फुरदयुक्त खते विरघळवून पिकांना उपलब्ध करण्याचे काम हे जिवाणू करतात. (बीजप्रक्रियेसाठी प्रमाण ः २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. )

क) निळे-हिरवे शेवाळ : ही पिकांसाठी उपयुक्त अशी एकपेशीय लांब तंतुमय पाणवनस्पती आहे. तिच्या पेशीमध्ये हरितद्रव्ये असून ती सूर्यप्रकाशात स्वत:चे अन्न तयार करते. भाताची पूर्ण लागवड झाल्यावर ८-१० दिवसांनी शेवाळ शेतामध्ये फोकून द्यावे. भाताच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळ प्रति हेक्टरी वापरावे.

निळे-हिरवे शेवाळाच्या वापराचे फायदे :

१) हवेतील २५-३० किलो मुक्त नत्र प्रति हेक्टरी स्थिर केला जातो.

२) जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची वाढ होते. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते.

३) जमिनीमध्ये उपयोगी जिवाणू उदा. अ‍ॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची वाढ होण्यास मदत होते.

४) स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो.

५) पिकांच्या वाढीस उपयुक्त अशा वृद्धी संप्रेरकांचा पुरवठा केला जातो.

६) उत्पादनामध्ये १०-१५ टक्के वाढ होते. नत्राची मात्रा कमी करता येते. निळे-हिरवे शेवाळ तयार करण्याची पद्धत सोपी असून शेतकरी ते स्वत: तयार करू शकतात.

ड) अझोला :

अझोला ही नेचे वर्गातील एक पाणवनस्पती असून हवेतील नत्र स्वत:मध्ये साठवून ठेवते. ही वनस्पती निळ्या-हिरव्या शेवाळाच्या (अ‍ॅनाबेना अझोला) साहाय्याने नत्र स्थिर करते. भातशेतीमध्ये भरपूर पाणी असताना अझोल्याची वाढ भरपूर होते.

अझोल्याचे वापरामुळे हवेतील मुक्त स्वरुपातील नत्र स्थिर होते. पिकाची वाढ चांगली होते. दर हेक्टरी २५ ते ३० किलो नत्राची बचत होते. भातात पाणी साठून राहत असल्यामुळे अझोटोबॅक्टर काम करत नाहीत. अशा ठिकाणी अझोला नत्र स्थिरीकरणाचे कार्य उत्तम करते.

शेतामध्ये अझोला वापरताना घ्यावयाची काळजी :

१) चिखलणी पद्धत : या पद्धतीमध्ये अझोला तळ्यात किंवा डबक्यात कायमस्वरूपी वाढवितात व साठवून ठेवतात. भात लागवडीनंतर दोन दिवसात सर्व शेतभर पसरून चिखलणीद्वारे किंवा माणसांच्या साहाय्याने जमिनीत पुरतात. त्या जमिनीत पुन्हा पाणी साठवल्यास अझोला वाढतो. अशा प्रकारे अझोल्याचा भात शेतीमध्ये हिरवळीचे खत वापर होतो. स्वतःच्या शेतातच एक टन अझोला वाढविल्यास हेक्टरी १० टन तयार होतो.

२) नांगरण पद्धत : शेतात अझोला भरपूर वाढविल्यानंतर त्यातील पाणी सोडून देतात. जमिनीवर बसलेल्या अझोलासह जमिनीची नांगरट करतात. शेतात पाणी पुन्हा अडवून धरतात. त्यामुळे आणखी अझोल्याची वाढ होते. तो अझोला नांगरट करून जमिनीत गाडतात. त्यानंतर नेहमीप्रमाणे भाताची लागवड करतात.

४. रासायनिक खतांचा वापर :

भात लागवडीसाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी शिफारस आहे.

(१) ही खत मात्रा हळव्या जातींमध्ये लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

(२)निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागवडीवेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

(३)संकरित जातींकरिता हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी शिफारस आहे. ही खत मात्रा लागवडीवेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

पेरणी पद्धत (पेरभात किंवा पेरसाळ) :-

खत व्यवस्थापन :

अ) कोरडवाहू पेरभात : कोरडवाहू भात पिकांची चांगली वाढ व उत्पादन येण्याकरिता ६० किलो नत्र ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. त्यापैकी अर्धे नत्र (३० किलो) व संपूर्ण स्फुरद व पालाश (प्रत्येकी ३० किलो) पेरण्याच्या वेळी व राहिलेले अर्धे नत्र (३० किलो) पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

ब) बागायती पेरभात : हेक्टरी १००:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश

पेरणीवेळी २० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश

पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० टक्के नत्र द्यावे.

पेरणीनंतर ६० दिवसांनी ३० टक्के नत्र द्यावे.

नत्राचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रभावी पर्याय :-

-निचऱ्याद्वारे होणारा नत्राचा ऱ्हास कमी करण्यासाठी नत्र खतांची मात्रा विभागून द्यावी.

-शेतात सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा.

-युरिया खताला निबोंळी पेंड किंवा करंज पेंड १:५ या प्रमाणात द्यावी.

-भात खाचरात नत्राच्या विघटनाने ७ ते २० टक्केपर्यंत ऱ्हास होतो. त्यामुळे नत्रयुक्त खते देण्यासाठी अमोनिअमयुक्त खते वापरावीत. खते जमिनीत खोलवर वापरावीत.

-जमिनीची धूप कमी होईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी शेत समपातळीत आणावे.

- युरिया ब्रिकेट्सचा वापर - नत्राचा ऱ्हास रोखून पिकाला अधिक उपयोग होण्यासाठी युरिया ब्रिकेट्स प्रभावी ठरतात. यामध्ये युरिया आणि डायअमोनिअम फॉस्फेट ६०:४० या प्रमाणात असते. भातासाठी १७० किलो प्रति हेक्टरी ब्रिकेट्स वापराव्यात.

५) सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर :

भात पिकाच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यासह कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्येही लागतात. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्येही आवश्यक असतात. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये खालील स्वरूपात देता येतात.

बोरॉन ः बोरॅकल ( १०-१५ टक्के बोरॉन)

लोह ः फेरस सल्फेट (हिराकस) (१९% लोह) किंवा चिलेटेड स्वरूपात (१२% लोह)

मंगल ः मँगनीज सल्फेट (३० टक्के मंगल)

जस्त ः झिंक सल्फेट (२१ टक्के जस्त), चिलेटेड झिंक (१२ टक्के जस्त)

ताम्र ः ताम्र सल्फेट (२४ टक्के ताम्र)

मॉलिब्डेनम ः अमोनिअम मॉलिब्डेनम (५२ टक्के मॉलिब्डेनम)

क्लोरिन ः सोडिअम क्लोराइड

सिलिकॉन ः सिलिकॉन डायऑक्साइड

अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थ, हिरवळीची खते, जैविक खते आणि रासायनिक खते यांचा वापर यांचा संतुलित प्रमाणात केल्यास पिकांचे उत्पादन शाश्वतपणे वाढवणे शक्य होते.

डॉ. नरेंद्र वि. काशीद, ९४२२८५१५०५

(प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगांव मावळ, जि. पुणे. )

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com