Agriculture Management : लागवडीसह विक्री पद्धतीतील सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ

अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनामध्ये उच्चशिक्षित असलेल्या ओंकार रानडे यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये भातशेतीमध्ये सगुणा पद्धतीचा वापर, नारळ-सुपारी बागेत मधमाशीपालन, आंबा फळांच्या विक्रीसाठी घरपोच वितरणाची पद्धत यांचा अवलंब केला आहे. यातून खर्च कमी राखतानाच उत्पन्नामध्ये वाढ मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न फलदायी ठरला आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

चार हजार लोकसंख्येच्या गावखडी (ता. जि. रत्नागिरी) येथील ओंकार गजानन रानडे याने अभियांत्रिकी (बीई, मॅकेनिकल) अभ्यासक्रम २०१० मध्ये पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी (Job) केली. त्यापेक्षा आपली वडिलोपार्जित ४० एकर शेती सांभाळण्याचा विचार त्यांच्या मनात होता.

आई, वडील दोघेही डॉक्टर असल्याने त्यांना शेतीकडे तितकेसे लक्ष देता येत नव्हते. २०१४ पासून ओंकारने शेतीची जबाबदारी खऱ्या अर्थाने स्वीकारली. शेतीमालाची विशेषतः आंब्याच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करत असतानाच त्यांनी व्यवस्थापनाचा (एमबीए) अभ्यासक्रमही २०१५ मध्ये पूर्ण केला.

एकूण शेती ४० एकर

भात शेती दोन एकर

नारळ, सुपारी दोन एकर

आंबा बाग ३५ एकर.

नवीन लागवड २००, (त्यात केसर २५ पायरी २५ उरलेली १५० झाडे हापूस.) जुनी १६०० हापूस झाडे

Agriculture
Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे रहस्य

शास्त्रीय पद्धतीसह उत्पादन खर्चावर नियंत्रण

‘एमबीए’ करतेवेळी चंद्रशेखर भडसावळे यांच्या नेरळ (रायगड) येथील शेतीवर जाण्याची संधी मिळाली. तिथे सगुणा भात लागवड तंत्र समजून घेतले. प्रथम केवळ दोन गुंठे क्षेत्रावर प्रयोग केला. त्यातून उत्पादन खर्च कमी करणे शक्य असल्याचे दिसताच दोन वर्षांत एक एकर क्षेत्रामध्ये सगुणा पद्धतीने भात लागवड केली.

त्यामुळे बियाणे कमी लागते, मजुरी खर्चही कमी होतो. त्यासाठी नांगरणी केल्यानंतर जून महिन्यात गादी वाफे तयार करून घेतात. भात बियाणे टाकण्यासाठी साचा बनविला आहे. चार ते पाच माणसांद्वारे तीन ते चार दिवसांत लागवडीचे काम पूर्ण होते. पूर्वी एकरी १२ किलो बियाणे लागे, ते कमी होऊन ९ किलो बियाण्यांमध्ये काम होते. भात लागवडीसाठी पूर्वी ५५ माणसे लागते. तेच काम आता १५ मजुरांमध्ये होते.

त्यामुळे उत्पादनखर्चात ६० टक्के बचत झाली. उत्पादन खर्च एकरी २० हजार रुपये होतो. या पद्धतीत तण व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे लागते. त्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. त्यामुळे महिनाभर तण येत नाही. पुढे ऑगस्ट महिन्यात बेणणी करावी लागते. मात्र पावसाच्या वाहत्या पाण्याचा व्यवस्थित बंदोबस्त केल्यास तणही जास्त येत नसल्याचा अनुभव ओंकार यांनी सांगितला. खासगी कंपनीच्या आणि लालभाताची स्थानिक सोरटी वाणाची लागवड ते करतात.

Agriculture
Onion Cultivation : रोपांच्या टंचाईमुळे उन्हाळ कांद्याच्या तुरळक लागवडी

दोन एकरमधून वर्षाला साधारणपणे एक टन भात मिळते. त्यातील ५०० किलो भाताची ते विक्री करतात. स्थानिक लोकांसह पुण्यातील लोकांकडून लालभाताला मागणी असते. कोथरूड (पुणे) येथील मामा प्रशांत करमरकर यांच्या स्टॉलवरून लाल भाताला सरासरी ८० रुपये किलो प्रमाणे विकले जाते. पारंपरिक भातालाही ४५ रुपये प्रति किलो दर मिळतो. निव्वळ नफा एकरी २० हजार रुपयांपर्यंत राहतो.

मधमाशीपालनातून नारळ, सुपारी उत्पादनात वाढ

भातासोबत नारळ, सुपारीची बाग सुमारे दोन एकरांवर आहे. नारळ, सुपारीच्या उत्पादनवाढीसाठी मधमाशीपालन उपयोगी ठरते, हे समजताच त्याने पाच वर्षांपूर्वी कृषी विभागातून मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतले.

आपल्या बागेत मध्यभागी सातेरी मधमाश्‍यांच्या चार पेट्या ठेवल्या. या मधमाश्या राहत्या ठिकाणापासून दीड कि.मी. परिसरात फिरतात. त्यांच्याकडे नारळाची १५० झाडे आहेत. २०१५ पूर्वी या दीडशे झाडातून दर दोन महिन्याला सरासरी ९०० नारळ मिळत. मधमाशीपालनानंतर त्यात वाढ झाली असून, आता दोन महिन्याला ११०० ते १२०० नारळ मिळतात.

Agriculture
Farmer CIBIL : ‘सीबील’चा मुद्दा केंद्र सरकार तपासणार

नारळाला सरासरी १५ रुपये दर मिळतो. उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्नातही वाढ झाल्याचे ओंकार सांगतात. मात्र आंब्यामध्ये या मधमाशा फारशा जात नाहीत. त्यामुळे आंब्यामध्ये पोयाची मधमाशीच्या (शा. नाव ः एपिस टेट्रागोनुला इरिडीपेनिस) चार वसाहती भाट्ये येथील संशोधन केंद्रातून प्रयोगासाठी आणल्या आहेत. या माश्या ३०० ते ४०० मीटरच्या रेंजमध्ये फिरतात. आंबा पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी त्यांचे प्रयोग केले जात आहेत.

हापूसची स्वतंत्र विक्रीची यंत्रणा

वडिलांना वैद्यकीय व्यवसायाच्या व्यापामुळे आंबा बागेकडे आवश्यक तितके लक्ष देणे होत नसे. त्यांची शेती केवळ मजुरांवर अवलंबून होते. त्यातही आंबा काढून मुंबईतील व्यापाऱ्यांना दिला जाईल. मात्र पुणे येथे असताना ओंकारला आंबा मार्केटिंगसाठी काय करता येईल, याकडे लक्ष दिले. त्या काळात इंटरनेट आधारित समाजमाध्यमे सुरू झाली होती.

त्यावर त्याने ‘मँगोमूड’ नावाचे स्वतंत्र पेज तयार केले. त्यावर तो हापूस आंब्याची माहिती देऊ लागला. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यातून मागणी वाढू लागली. मग रत्नागिरीतून बॉक्स, पेट्या आणल्या. त्यांच्या पुण्यातील घरोघर वितरणाची व्यवस्था बसवली. २०१४ मध्ये पहिल्याच वर्षी २०० पेट्या विकल्या.

Agriculture
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

थेट ग्राहकांना आंबा विक्री केल्यामुळे उत्पन्नात १० टक्के वाढ मिळाली. आंब्याची १८०० जुनी झाडे आहेत. त्यातून वर्षाला साधारणपणे ४ हजार पेटी आंबा मिळतो. कोरोनातील टाळेबंदीने थेट विक्री व्यवसायाला आणखी चालना मिळाली.

सुमारे ७० टक्के आंबा घरपोच पाठवला जातो. पूर्वी पुण्यामध्ये पेटी घरपोच करण्यासाठी १२० रुपये खर्च येत होता. स्वतंत्र यंत्रणा विकसित केल्यामुळे हा खर्च ९० रुपयांपर्यंत कमी झाल्याचे ओंकार यांनी सांगितले. हापूस विक्रीसाठी ‘मँगोमूड’ ब्रॅण्ड तयार केला आहे. घरपोच विक्रीसह कोथरूड येथील स्टॉलवरही आंबा उपलब्ध केला जातो.

सेंद्रिय प्रमाणीकरण

२०१७ ते २०२० या काळात ओंकार यांनी भात व नारळसुपारीचे एकूण २.५ एकर शेतीक्षेत्र सेंद्रिय प्रमाणित करून घेतले आहे. भातासह बागायतीच्या सुमारे तीन एकर क्षेत्रावर बाजारातील तयार सेंद्रिय खताचा वापर ते करतात. नारळाला १० किलो, तर सुपारीला ४ किलो खत ते टाकतात. नारळ, सुपारीच्या क्षेत्रासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरली आहे. या क्षेत्राशेजारील ४० आंबा झाडांवर पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करण्यासंदर्भात प्रयोग सुरू आहेत.

नैसर्गिकतेचा फायदा

भातशेतीनंतर हिवाळ्यात ओलाव्यावर कडधान्यांची लागवड करतात. नोव्हेंबर महिन्यात लागवड केल्यानंतर तीन महिन्यांत कडधान्य तयार होते. या कालावधीत पाण्याची आवश्यकता भासत नाही. चवळी, मूग, मटकी, उडीद यांचे साधारण ७०० ते ८०० किलो उत्पादन मिळते. सरासरी १०० रुपये किलोने विक्री होते.

दर्जेदार फळ देण्यावर भर

१५ मार्चपासून आंबा काढणीला सुरुवात. काढणीनंतर एक दिवसाने आंबा पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबरमध्ये टाकतात. ७२ तास रायपनिंगनंतर एक ते पाच डझनच्या पेट्यांमध्ये भरून आंबा पुणे, मुंबईत पाठवला जातो.

Agriculture
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

पेटीमध्ये १८० ग्रॅम ते २७० ग्रॅमची फळे असतात. हंगामात सरासरी २५०० रुपये असा दर पाच डझनच्या पेटीला मिळतो. काही वेळा फळाला बाहेरून चिकाचा डाग असला तरीही आतून आंबा चांगला असतो. ज्यांना कमी दरात आंबा हवा आहे, अशा ग्राहकांसाठीही त्यांनी तीन ग्रेड केल्या असून, त्यानुसार ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दर आकारला जातो. त्यामुळे थेट ग्राहकांना सर्वाधिक आंबा दिला जातो. कॅनिंगला जाणाऱ्या आंब्याचे प्रमाण कमी राहते. परिणामी फायद्यात वाढ होते.

ग्राहकांशी वर्षभर संवाद

आंबा हंगाम हा फक्त तीन महिन्यांचा असला तरीही फेसबुक पेजशी जोडलेल्या ग्राहकांशी वर्षभर संवाद साधण्यावर ओंकार यांचा भर असतो. आंबा बागेमध्ये केलेले प्रत्येक काम, काळजी यांची माहिती छायाचित्रांसह दिली जात असल्याने पारदर्शकता राहते. लोकांमध्ये विश्‍वासार्हता वाढली.

पूर्वी मार्केटला आंबा पाठवत असताना पाच डझन पेटीला सरासरी १८०० ते २००० रुपये मिळत असे. मात्र स्वतः विक्री केल्यामुळे हाच दर सरासरी २५०० रुपयांपर्यंत गेल्याचे ओंकार आवर्जून सांगतात.

शेतीमध्ये उतरल्यानंतर प्रथम शास्त्रीय व्यवस्थापन, नंतर उत्पादन खर्चात शक्य तिथे कपात हे धोरण अवलंबले. मिळालेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी स्वतःच धडपड केल्यास, मार्केटिंगचे नवनवीन फंडे वापरल्यास बऱ्यापैकी उत्पन्नात वाढ होत असल्याचा माझा अनुभव आहे.

- ओंकार गजानन रानडे, ९९६०५०५१२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com