Nimboli Ark : निंबोळी अर्क कसा तयार करावा?

NeemSeed : निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत.
Nimboli Ark
Nimboli Ark Agrowon

Nimboli Ark Prepartion : गावखेड्यात, शेताच्या बांधावर कडूनिंबाची (Neem) भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या (Neem Seed Kernal) सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन पाच टक्के निंबोळी अर्क (Neem Seed Kernal Extract) घरच्याघरी तयार करता येतो.

निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळीअर्क फवारला जातो. रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतूडे, पिठ्या ढेकून, पतंगवर्गीय किडींमध्ये गुलाबी बोंडअळी, घाटेअळी, शेंडे व फळे पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळअर्काचा उपयोग होतो.

Nimboli Ark
Silage Making: मुरघास कसा तयार करावा?

निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो?

निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत. निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात. कडुनिंबाची पाने व बियामध्ये ॲझाडीरेक्टीन, निंम्बिन व निंम्बिडिन, मेलियान ट्रीओल सालांन्नीन हे महत्त्वाचे घटक आहेत.

Nimboli Ark
Poultry Stress Management : कोंबड्यांतील ताण कसा कमी करावा?

कडुनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीली अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंधक, कीड वाढ रोधक व कीटकनाशक य विविध मार्गाने परिणाम साधतो.

निंबोळी अर्काचा परभक्षी किंवा परोपजीवी मित्र कीटकांवर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही. कडुनिंबाचे वातावरणात नैसर्गिक अपघटन होत असल्याने त्याचे पिकांमध्ये कुठलेही अवशेष राहत नाहीत.

पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत

उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात.

पाच किलो निंबोळी चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवाव्यात. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. गाळलेल्या अर्कात एक लिटर तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावं. हे मिश्रण एकूण शंभर लिटर होईल एवढं पाणी टाकावं.

म्हणजे हा ५ टक्के निंबोळी अर्क फवारणीसाठी तयार होतो. फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा. उरलेला चोथा जमिनीमध्ये मिसळावा त्याचा खत म्हणून चांगला उपयोग होतो

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत करता येते.

त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून मित्र किडींचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येतो. गावातला प्रत्येक शतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळेल.

स्त्रोत - कृषीपत्रिका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com