Team Agrowon
कोंबड्यांच शरीर तापमान
ज्यावेळी कोंबड्यांना शरीर तापमान नियंत्रित करणे आवश्यक असते, अशावेळी कोंबड्या शेडमध्ये वापरलेली गादी म्हणजेच जामिनावर अंथरलेले तूस हे बाजूला सरकवून जमिनीवर पंख पसरवून बसतात. कोंबड्या पाण्याचे पाइप, पाण्याची भांडी यांना स्पर्श करतात.
वाढत्या तापमानात कोंबड्यांना सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत खाद्य द्यावे. दुपारच्या वेळात कोंबड्यांना खाद्य देऊ नये. कारण सकाळी कोंबड्यांच्या शरीरात उष्णता उत्पादन २० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी असते.
खाद्याद्वारे निर्माण होणारी उष्णता थंड वेळेत दोन तासापर्यंत परिणाम दाखवते, तर वातावरणातील तापमान हे ३५ अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम १० तासापर्यंत असतो. म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी कोंबड्यांतील ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
औषधोपचार करत असताना नंतर उपचार करण्याऐवजी कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व क आणि ई चा वापर करावा. जीवनसत्त्व ई चा साधारपणे २५० मि.ग्रॅ.प्रतिकिलो खाद्य आणि जीवनसत्त्व क चा वापर ४०० मि ग्रॅम प्रतिकिलो खाद्य करावा.सोबतच इलेक्ट्रोलाईटस व डेक्सट्रोज चा वापर अत्यंत आवश्यक आहे.
कोंबड्यांची शारीरिक ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक व संतुलित प्रमाणात सतत असणे आवश्यक आहे.अशावेळी प्रत्यक्ष कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा. याकरिता कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वनस्पती तेलाचा योग्य प्रमाणात वापर करावा.
जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा. यासाठी संत्री किंवा लिंबू ३० ते ४० ग्रॅम प्रति १०० कोंबडी या प्रमाणात वापरावे. उष्णतेचा ताण कमी करण्याकरिता लिंबू किंवा संत्र्याची साल देखील उपयुक्त आहे.
अश्वगंधा,तुळस,मंजिष्ठा,शतावरी या औषधी वनस्पतींचा वापर देखील कोंबड्यांच्या आहारातून करावा. अश्वगंधा- ४ ग्रॅम, तुळस-४ ग्रॅम, मंजिष्ठा-४ ग्रॅम, शतावरी-५ ग्रॅम घेऊन या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून १०० कोंबड्यांसाठी वापराव्यात.अशा प्रकारे उपाययोजना केल्यास कोंबड्यांना उष्णतेच्या ताणापासून वाचवता येते.